संसर्ग रोखण्यासाठी इतर बाबींवरील खर्च थांबवून तो आरोग्य सुविधेवर करणार : अशोक चव्हाण

congress state president ashok chavan

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील आरोग्य सुविधांना अधिक बळकटी आणण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून २० टक्के रक्कम दिली जाणार आहे. तसेच आमदार निधीतून मिळणाऱ्या रक्कमेतून कोरोना रुग्णांची तपासणी, उपचारासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक साहित्यांची खरेदी केली जाईल. आरोग्य सेवेतील कामे अधिक गतीने होण्यासाठी इतर बाबींवरील खर्च थांबवून तो आरोग्य सुविधेवर करणार केला जाईल. अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडला जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली.

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आयोजित बैठकीत आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले, त्यानंतर बोलताना ते म्हणाले की, नांदेडपासून दूर असणाऱ्या किनवट, देगलूर, मुखेड या तालुक्यांच्या ठिकाणी ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी डायलसिसची सुविधा लवकरच उपलब्ध करुन दिली जाईल. तसेच केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ प्रती व्यक्ती देण्याबाबत नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळात मान्यता दिली आहे. त्याचबरोबर दुर्गम भागातील नागरिकांनाही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत असून शिधापत्रिका नसणाऱ्या गरजूंना अन्न-धान्य देण्यासाठी सेवाभावी संस्थांचा पुढाकार महत्वाचा आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहनही केले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनतेचे सहकार्य खूप महत्वाचे आहे. नागरिकांनी नको तेंव्हा घराबाहेर पडू नये, घरातच रहावे असे भावनिक आवाहन करुन त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास नाईलाजाने नागरिकांना घरी बसण्यासाठी बळाचा वापर करावा लागेल, असा इशाराही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला. या बैठकीला आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.