एकनाथ खडसेंचे कॉंग्रेसमध्ये स्वागतच-अशोक चव्हाण

ashok chawan

टीम महाराष्ट्र देशा: नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी एकनाथ खडसेंना पक्षात येण्याची ऑफर दिली होती.आता तर थेट कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीच एकनाथ खडसेंना कॉंग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आले तर त्यांचं स्वागत करु, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

दरम्यान, जळगावात एकनाथ खडसे आणि अजित पवार एकाच मंचावर उपस्थित होते. त्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचा दावा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती.

भोसरी एमआयडीसी जमीन खरेदीची चौकशी चालू असल्याने एकनाथ खडसे सध्या मंत्रिमंडळातून बाहेर आहेत. त्यात पक्षात होणारी घुसमट एकनाथ खडसे यांनी वारंवार बोलून दाखवली आहे. सध्या एकनाथ खडसे मुख्यमंत्री आणि सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे आधी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि आता कॉंग्रेस मधून ऑफर आलेले खडसे नक्की काय निर्णय घेणार याकडे सगळ्या राज्यच लक्ष लागून आहे.