मुख्यमंत्री आणि भाजप टोळी युध्दाप्रमाणे निवडणुका लढवत आहेत : अशोक चव्हाण

blank

टीम महाराष्ट्र देशा- मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ टेपमुळे भाजपच्या पारदर्शकपणाचा बुरखा गळून पडला असून सत्तापिपासू भाजपचा ओंगळवाणा आणि विकृत चेहरा जनतेसमोर आला आहे. मुख्यमंत्र्यांनीही ही ऑडिओ क्लिप त्यांचीच असल्याचे मान्य केले आहे त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि निवडणुक आयोगाने त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई येथे पत्रकारपरिषदेला संबोधित करताना खा. चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्री आणि भाजप टोळी युध्दाप्रमाणे निवडणुका लढवत आहेत. भाजपने राजकारणाचे माफियाकरण केले आहे हे दिसून येते. राज्याच्या प्रमुखाने साम, दाम, दंड भेदाची भाषा करणे महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही. निवडणुक आयोगाने याप्रकरणाची दखल घेऊन तात्काळ चौकशी करून कारवाई करावी. उध्दव ठाकरे जर खोटे बोलत असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी. भाजप किंवा शिवसेना या दोन्ही पक्षांपैकी कोणीतरी खोटं बोलत आहे. याप्रकरणातील सत्य समोर आले पाहिजे. काळा पैसा आणि सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून भाजप निवडणुक लढवित आहे. पालघरमध्ये संपूर्ण सरकारी यंत्रणा भाजपचा प्रचार करीत आहे. निवडणूक आयोगाकडे काँग्रेस पक्षाने यापूर्वीच तक्रा केली आहे पण दुर्देवाने निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही. उद्या काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिप संदर्भात पालघर लोकसभा पोटनिवडणुक निर्णय अधिका-याकडे करणार आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

केंद्रातील भाजप सरकारला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मोदी सरकारच्या आपयशी कारकिर्दीची पोलखोल करणारी जुमला किंग नावाची सिरीज प्रदेश काँग्रेसच्य सोशल मिडीया विभागाने तयार केली आहे. या सिरीजचे प्रकाशन अभिषेक मनु सिंघवी आणि खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, सरचिटणीस व सोशल मिडीया विभागाचे प्रमुख अभिजीत सपकाळ, पृथ्वीराज साठे, सचिव जिशान अहमद उपस्थित होते.