शरद पवार, नरेंद्र मोदी एकाच नाण्याच्या दोन बाजू- खा. अशोक चव्हाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी टीका करून ‘एमआयएम’चे पार्सल हैदराबादला परत पाठवावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे केले. नोटाबंदीच्या विषयावरून कॅशलेस भारत करून शेतकरी, शेतमजूर व सरकारी कर्मचाऱ्यांना दारोदारी भिक्षा मागण्याची वेळ आली असून बडे लोक सोडून सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचे, मेहनतीचे पसे काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे, असेही चव्हाण म्हणाले. उद्योगपती विजय मल्ल्याचे दीड लाख कोटीचे कर्ज या सरकारने माफ केले. तो पसा तुमचा असताना ते कर्ज माफ करण्याचा या सरकारला अधिकार आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गुरुवारी माहूर, हदगाव, धर्माबाद व कुंडलवाडी येथे घेतलेल्या प्रचारसभांमधून ते बोलत होते. राष्ट्रवादी व त्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ‘एमआयएम’वरही खासदार चव्हाण यांनी कडाडून हल्ला चढवला. भाजप-सेनेमुळेच ‘एमआयएम’ला येथे रुजण्यास मदत मिळत आहे. राज्यात एमआयएम काँग्रेसमध्ये विलीन झाली असून काही ठिकाणी काँग्रेसची मते फोडण्याचे उपद्व्याप त्यांच्याकडून होत असल्याचे खासदार चव्हाण म्हणाले.