नैतिक मुल्यांवर अढळ श्रध्दा असणारा, अजातशत्रू लोकनेता गमावला !

मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने नैतिक मुल्यांवर अढळ श्रध्दा असणारा, अजातशत्रू लोकनेता गमावला, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, सुमारे पाच दशकाच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अटल बिहारी वाजपेयी यांनी तीन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषवले. खासदार, केंद्रीय मंत्री लोकसभेतील विरोधी पक्षनेते अशा विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले. आपल्या अमोघ वक्तृत्वाने वाजपेयी यांनी दीर्घकाळ संसद गाजवली. अटलबिहारी वाजपेयी संवेदनशील कवी व विशालह्रदयी व्यक्तीमत्व होते.

मनमिळावू स्वभावामुळे स्वपक्षासोबतच इतर पक्षातही वाजपेयींचे अनेक मित्र होते. देशाचे माजी गृहमंत्री व आमचे वडील स्व. डॉ. शंकरारव चव्हाण साहेबांशी अटलबिहारी वाजपेयी यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. डॉ. शंकरराव चव्हाण साहेबांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित होते. पक्षाच्या पलीकडे जाऊन त्यांनी डॉ. शंकरराव चव्हाण यांनी केलेल्या कामाची प्रशंसा केल्याचे आजही आपल्या स्मरणात आहे. त्यांच्या निधनामुळे देशाच्या राजकारणात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रध्दांजली!

भारताने एक महान सुपुत्र गमावला : राहुल गांधी