fbpx

नव्या महाराष्ट्र निर्मितीच्या लढाईचे नेतृत्व करायला तयार – अशोक चव्हाण

ashok chawan

नांदेड : माजी केंद्रीय गृहमंत्री, जलसंस्कृतीचे जनक दिवंगत डॉ.शंकरराव चव्हाण यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांच्या 100व्या जयंतीनिमित्त नांदेड शहर व जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जलदिंड्या, महारक्‍तदान शिबिर,वृक्षारोपण आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून डॉ.शंकरराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आले. शहरातील चार भागातून निघालेल्या जलदिंड्या नांदेडकरांसाठी आकर्षणाचा विषय ठरल्या होत्या.

याप्रसंगी डॉ. शंकरराव चव्हाण यांचे कार्य मराठवाडा कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी सिंचन क्षेत्रात केलेले कार्य सदैव लक्षात राहणारे आहे. मराठवाड्याच्या पाणी प्रश्‍नावर पुन्हा एकदा संघर्ष करण्याची वेळ आली असून डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या संकल्पनेतील महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण लढाई करत राहू. या लढाईचे नेतृत्व करण्यास मी तयार आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. शंकरराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारातून मराठवाड्याच्या विकासासाठी मार्गक्रमण करत राहू,असे यावेळी ते म्हणाले. नुकतेच प्रदेशाध्यक्ष पदावरून गच्छंती झाल्यावर अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा नेतृत्वाची भाषा केल्याने राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या आहेत.