धर्मा पाटलांचे निधन म्हणजे सरकारी हत्या – अशोक चव्हाण

सरकार विरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करा

मुंबई : मंत्रालयात विष प्राशन केलेले धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. धर्मा पाटील यांच्या निधनानंतर विरोधकांकडून सरकारविरोधात टिकास्त्र सोडले जात आहे.

शेतकरी धर्मा पाटील यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी सरकार जबाबदार असून सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यात रहिवाशी. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. त्यासाठी त्यांनी मंत्रालयात हजारोवेळा खेटे घातल्या पण पदरी निराशाच आल्याने अखेर धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं. त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तीन वेळा धर्मा पाटील यांचं डायलिसीस करण्यात आलं होतं.धर्मा पाटील यांचे प्राण वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले होते, मात्र ते अपयशी ठरले.