नवी मुंबईचा गड काबीज करण्यासाठी आशिष शेलार सरसावले; मंदा म्हात्रेंच्या घरी तासभर खलबत

नवी मुंबई:- येत्या काही दिवसांत राज्यातील 5 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर होणार आहेत. यामध्ये नवी मुंबई, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकांसाठी भाजपने हुकमी मोहरे निवडले आहेत.

नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बैठकांमध्ये भाजपने महापालिका निवडणुकांसाठी रणनीती ठरवली. त्यानुसार आशिष शेलार यांना नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या दोघांमध्ये समन्वय ठेवून पालिका निवडणुका जिंकण्याचं आव्हान आशिष शेलार यांच्यासमोर आहे.

गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. या दोघांमध्ये समतोल राखत पालिका निवडणुका जिंकून द्यायचे आव्हान आता आशिष शेलार यांच्यापुढे आहे.

दरम्यान, आता भाजप नेते आशिष शेलार यांनी मिशन नवी मुंबई हाती घेतले आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमधील मतभेद दूर करण्यासाठी आशिष शेलार आज नवी मुंबई दौऱ्यावर आहेत. आशिष शेलार यांनी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. शेलार आणि म्हात्रे या दोघांमध्ये आगामी निवडणुकांसंदर्भात जवळपास एक तास चर्चा केल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या