‘ज्यांनी निवडणूक लढवली नाही त्यांनी ईव्हीएमवर बोलू नये’

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून पुन्हा एकदा शिळ्या कडीला ऊत आणण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून ईव्हीएमद्वारे निवडणुकीला विरोध करण्यासाठी राज्यातल्या सर्व विरोध पक्षांचे नेते एकत्र आले आहेत. विरोधकांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत ईव्हीएमला जोरदार विरोध दर्शविला आहे.

मुंबईत आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ईव्हीएमविरोधात मोर्चाची घोषणा करण्यात आली. २१ ऑगस्टला मुंबईत हा मोर्चा निघणार आहे. ‘हा मोर्चा कुठल्याही पक्षाच्या झेंड्याखाली नसेल, तर तो सर्वसामान्यांचा मोर्चा असेल,’ असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राज्यातील सर्वच विरोधीपक्ष या मोर्चात सहभागी होणार आहेत. मात्र आता यावर सत्ताधाऱ्यांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे.

“ज्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही त्यांनी ईव्हीएमवर भाष्य करु नये,” अशा शब्दांत शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. , “ईव्हीएमविरोधात राज्यातील विरोधीपक्षांनी घेतलेली पत्रकार परिषद मी पाहिली. यावर माझी प्राथमिक प्रतिक्रिया हीच आहे की, अशी पत्रकार परिषद घेण्याआधी जे या ईव्हीएमद्वारेच निवडून आले आहेत त्याविरोधी पक्षातल्या बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ आणि अजित पवार यांनी आधी राजीनामे द्यावेत तसेच या पत्रकार परिषदेत इतर जे कोणी होते त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही त्यांनी तर ईव्हीएमवर बोलूच नये,” अशा खोचक शब्दांत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.

“विरोधकांना जनाधार राहिलेला नाही, लोक त्यांना स्विकारायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली आहे. त्यामुळे ते ईव्हीएमवर टीका करीत आहेत. त्यांनी आधी स्वतःचे आत्मपरिक्षण करावे. भाजपा आणि शिवसेनेविरोधात एकत्र येऊन ते तोंडावर पडले आहेत. आपल्या निवडणूक आयोग नावाच्या संविधानिक यंत्रणेचे जगात कौतूक होत असताना त्यावर हे अविश्वास निर्माण करीत आहेत,” अशा शब्दांत शेलार यांनी विरोधकांना झापलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

ईव्हीएमविरोधात मोर्चेबांधणीसाठी राज ठाकरे सक्रीय, ममता बॅनर्जींची घेणार भेट

तनुश्री दत्ताच्या विरोधात मनसे आक्रमक ; दाखल केला अदखलपात्र गुन्हा

कॉंग्रेस म्हणजे वादळात भरकटलेलं जहाज : गिरीश महाजन

कर्नाटकाचा पेपर भाजपने फोडला; निवडणूक आयोगाआधी जाहीर केली निवडणुकीची तारीख