वाझे बिझेला आम्ही घाबरत नाही, वाझे वाजवत जाऊदे; आशिष शेलार आक्रमक

sachin vaze

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी २५ फेब्रुवारीला सापडली होती. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकानंतर आता नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक असून हा फार मोठा कट असू शकतो अशी शंका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत गृहमंत्री अनिल देशमुख यांना याबाबत सवाल केला होता.

हिरेन यांचा मृतदेह सापडला असून त्यांचे हात बांधलेले होते. त्यांच्या मृतदेहाचे फोटो मी पाहिले आहे. हात बांधून कोणी जीव देत नाही. एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांच्याकडेच या प्रकरणाचा तपास कसा ? ते मुकेश अंबानींच्या घराबाहेर कसे पोहोचले ? तुम्ही कुणाला वाचवत आहात? असा सवाल फडणवीसांनी केला होता.

यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर देताना अर्णब गोस्वामींना आत टाकलं म्हणून तुमचा वाझेंवर राग आहे का? असं प्रत्युत्तर दिलं. यानंतर भाजप नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत हे विधान अनिल देशमुख यांनी मागे घ्यावं अशी मागणी केली होती. भाजप नेते व आमदार ऍड आशिष शेलार यांनी देखील आक्रमक होत चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

‘मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीन कांड्यांच्या चौकशी मधील हिरेन हे मुख्य मोहरे होते. या मागे काही आंतरराष्ट्रीय कट आहे का ? याची सखोल चौकशी होण्यासाठी ते महत्वाचे होते. त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी करून देखील गृह खात्याने कानाडोळा केला. वाझे कोण आहेत याच्याशी आमचं घेणं देणं नाही. वाझे बिझेला आम्ही घाबरत नाही, वाझे वाजवत जाऊदे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या