fbpx

पटोले नंतर भाजपमध्ये अजून एक बंड , आ.आशिष देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: खा. नाना पटोले यांनी पक्षाचा राजीनामा देऊन 24 तास झाले असतानाच काटोलचे आ.आशिष देशमुख यांनीही बंडखोर पवित्रा घेतला आहे. वेगळ्या विदर्भाच्यामुद्यावरून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सहा पानी पत्र पाठवले आहे. तसेच वेगळा विदर्भ न झाल्यास जनता तुम्हाला क्षमा करणार नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

आ. आशिष देशमुख यांचे पत्र

वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आपण 2013 साली उपोषणाला बसलो असता भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनी विदर्भासाठी काढलेल्या युवा एल्गार रॅलीत आपण मला तसेच जनतेला भाजपा सत्तेत आल्यास विदर्भ राज्याच्या निर्मितीचे आश्वासन दिले होते. त्यावेळी आपण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होता. भाजपने वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिल्यामुळे विदर्भातील जनतेने विदर्भातून भाजपचे 44 आमदार निवडून दिलेत. आता या पाठिंब्याचे व आश्वासनांचे काय झाले, असा प्रश्न जनतेला पडला आहे. केंद्रात भाजपला बहुमत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी आपले उत्तम संबंध आहेत. त्यामुळे आता आपण स्वत:च कृतिशील व्हावे. या दोन्ही नेत्यांकडे विदर्भाचे स्वतंत्र राज्य होण्यासाठी शिष्टाई करावी आणि विदर्भ राज्याचा मंगल कलश घेऊन यावा, असे आवाहनही देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे. वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती माझ्या हातात नाही, असे आपण अलीकडेच म्हणालात. मात्र, आपण पुढाकार घेतला तर नक्की यशस्वी व्हाल व विदर्भाचे मुख्यमंत्रीही व्हाल,याची मला खात्री वाटते.

पूवीर्चे राज्यकर्ते बदलून लोकांनी नव्या राज्यकर्त्यांना संधी दिली. परंतु, आपल्या नेतृत्वातील सरकारने तीन वर्षे प्रामाणिक प्रयत्न केल्यानंतरही परिणामकारक बदल लोकजीवनात झालेला नाही. शेतकरी सुखी नाही, युवकांना रोजगार नाही, पिकांना भाव नाही, कायदा-सुव्यवस्था अधिक बिघडली आहे. प्रश्नांची, समस्यांची मालिकाच आहे. विदर्भाचे राज्य निर्माण केल्यावरच हे प्रश्न सुटू शकतात,

संतापले देशमुख या संदर्भात बोलताना शहर भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिका-याने देशमुख यांच्या विरोधात खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. आ. आशिष देशमुख यांचे वडील रणजित देशमुख यांच्या सावनेरयेथील हेटी-सुर्ला साखर कारखान्याकडील थकबाकी न मिळाल्याने शेतक-यांनी त्यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सावनेरच्या दिवाणी न्यायालयाने पैसे वसुलीसाठीकुडकी आणण्याचा आदेश काढला. त्यानुसार 7 डिसेंबर रोजी जप्ती पथकाने देशमुखांच्या नागपुरातील बंगल्यावर धडक दिली. यावेळी देशमुखांनी एक लाख रुपये भरून उर्वरित रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ही जप्तीची कारवाई 11 डिसेंबरपर्यंत टळली. या प्रकरणी देशमुखांनी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली होती. परंतु, त्यांना अपेक्षित मदत न मिळाल्यामुळे संतापलेल्या आ. आशिष देशमुखांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्याची प्रत ‘सोशल मिडीयात’ व्हायरल केली आहे.