आषाढी एकादशी : पुणे जिल्ह्यातून उद्या संतांच्या पादुकांचे होणार पंढरपूरला प्रस्थान

Ashadi Ekadashi

पुणे : देशासह संपूर्ण राज्यावर कोरोनाचे गंभीर संकट उभे आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा प्रथमच शासनाने पायी पालखी सोहळा रद्द केला. परंतु तब्बल साडे तीनशे वर्षांची परंपरा लक्षात घेऊन शासनाने मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत प्रमुख संताच्या पादुका पंढरपुरला घेऊन जाण्यास परवानगी दिली.

मंगळवारी (दि.30) रोजी एसटी बसमधून पुणे जिल्ह्यातून कडक पोलीस बंदोबस्तात पंढरपुरला केवळ श्री संत ज्ञानेश्वर महाराज, जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज, श्री संत सोपानदेव आणि श्री चांगावटेश्वर महाराज या चार संताच्या पादुका परंपरेनुसार पंढरपुरला रवाना होणार आहेत. दरम्यान पालख्या दर्शनासाठी कोणी कोठेही प्रयत्न करू नये , प्रवासात कोठेही पालख्या दर्शनासाठी थांबू नये असे स्पष्ट आदेश देखील देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील या चार संताच्या पादुका एस.टी बसमधून घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये एका पालखी सोहळ्यात प्रत्येक संस्थानच्या केवळ 20 व्यक्तींना सहभागी होता येणार आहे. या 20 व्यक्तींची निवड करताना देखील अनेक निर्बंध घातले आहेत. यात परवानगी देण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तींची कोरोना चाचणी करणे बंधनकारक, 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व कॉमर्बिडीटी असलेल्या यात हायपरटेन्शन, बी.पी व अन्य आजार असलेल्या व्यक्तीला सहभागी होता येणार नाही. याशिवाय पालखी सोहळ्यात सहभागी होणा-या सर्व सरकारी अधिकारी, कर्मचारी, पोलीस, एस.टी बस व सर्व्हीस व्हॅनचे चालक या सर्वांचो कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

दरम्यान, संतांच्या पादूका असलेली वाहने प्रवासात कोठेही दर्शनासाठी थांबवता येणार नाही, नागरिकांनी देखील दर्शनासाठी रस्त्यांवर येण्याचा प्रयत्न करू नये, सहभागी होणा-या प्रत्येकाने सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कडक कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे.

संतांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्यासाठी इन्सीडेंट कमांडरच्या नेमणूका

सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी न्यायालयीन खटल्यांचे कामकाज आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 

रेड झोनमध्ये येण्यास व जाण्यास पास दिला जाणार नाही