निलंग्यात पाणी पुरवठा विस्कळीत; संचारबंदी धुडकावत नागरिकांची बोअरवेल – टँकरवर गर्दी

निलंगा (प्रदीप मुरमे) : निलंग्यात मागील १०-१५ दिवसापासून शहरातील पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरल्याने शहरातील पाणी टंचाईची समस्या अत्यंत भीषण झाली आहे. राज्यात संचारबंदी लागू असतानाही नागरिकांना नाईलाजास्तव जीव धोक्यात घालून बोअरवेल – टँकरवर पाण्यासाठी गर्दी करावी लागत आहे. आता यावरून नागरीकांमधून पालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र असंतोष व्यक्त होऊ लागला आहे.

शहराला माकणी (जि.उस्मानाबाद ) येथील धरणातून पाणी पुरवठा केला जातो. निलंग्याचे आमदार डाँ.शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मुख्यमंत्री असताना तब्बल ५०-५५ कि.मी.लांबीच्या या योजनेला त्यांनी विशेष बाब म्हणून मंजूरी दिली होती. निलंगा शहरातील नागरीकांची पाणी टंचाईची समस्या या महत्वकांक्षी योजनेमुळे कायमस्वरुपी सुटली आहे. परंतु सदरील योजनेला आज जवळपास ३० वर्षापेक्षा जास्तीचा कालावधी झाल्याने ही पाणी पुरवठा योजना आता निकामी होत असल्याचं दिसून येत आहे.

सततची पाणी गळती व बिघाड या नित्याच्याच तक्रारीमुळे या योजनेची अवस्था म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी दयनीय झाली आहे.दरम्यान मागील भाजपा महायुती सरकारमध्ये कँबिनेट मंत्री असलेले निलंग्याचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी या योजनेच्या नूतनीकरणास विशेष बाब अंतर्गत मंजूरी मिळवून आपले आजोबा माजी मुख्यमंत्री निलंगेकर यांच्या हातावर हात मारले.

सदरील योजनेचे काम शहरात सध्या प्रगतीपथावर असल्याने शहरात अंतर्गत जलवाहीण्या टाकण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे.त्यामुळे शहरात जागोजागी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खोदकाम सुरु आहे.पाणी पुरवठा योजनेच्या या खोदकामामुळे शहरातील काही भागामध्ये मागील काही दिवसापासून शहरातील नळ योजना पूर्णपणे बंद आहे.विद्यानगर,शिवाजी नगर,गांधीनगर,पांचाळ काँलनी आदी भागातील नळाला मागील २०-२२ दिवसापासून पाणी येत नसल्याची येथील नागरीकांची ओरड आहे.नळाला पाणी येत नसल्याने या भागातील नागरीकांना नाईलाजास्तव पाण्यासाठी पालिकेचे बोअर व टँकरवरती गर्दी करावी लागत आहे.

‘करोना’ या भयावह संकटाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरीक पाण्यासाठी एकत्र येणे अत्यंत धोकादायक आहे.एकीकडे शासन ‘संचारबंदी’चा फतवा काढून नागरीकांना घरात थांबण्यासाठी दबाव आणत आहे.परंतु शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन नादुस्त झाल्याने शहरातील काही भागात मागील १०-१५ दिवसापासून निर्जळी झाली आहे. नागरीकांना घागरभर पाण्यासाठी गल्लोगल्ली भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र शहरात पाहायला मिळत आहे.परिणामी शासनाच्या संचारबंदीच्या या आदेशाची शहरातील नागरीकांकडून पाणी भरण्यासाठी पायमल्ली होताना दिसत आहे.

शहरातील जागरुक नागरीक तुकाराम गोमसाळे यांनी तर मागील २२ दिवसापासून शहरातील नळाला पाणी येत नसल्याची पोस्ट चक्क सोशल मिडियावर टाकून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे तर शिवाजी नगर येथील खलील लालटेकडे या युवकाने पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शिवाजी नगर येथे टँकरने होत असलेला पाणी पुरवठा करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तत्काळ बंद करावा अशी मागणी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना केली.

पाणी पुरवठा सुरळीत होणार

याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने पालिकेचे मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता पाणी पुरवठा योजनेची मुख्य जलवाहीनी किल्लारी येथे नादुरुस्त झाल्याने शहराचा पाणी पुरवठा खंडीत झाला होता.दरम्यान जलवाहीनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने शहराचा पाणी पुरवठा लवकरच सुरळीत होणार असल्याचे ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना सांगितले.

हेही पहा –