‘माझे पाय भारतात पडताच कोरोना नष्ट होणार’, अत्याचारातील फरार नित्यानंदचा अजब दावा

नवी दिल्ली : अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी नित्यानंद स्वामी नेहमी चर्चेत येण्यासाठी वादग्रस्त विधाने करत असतो. आता मात्र त्याने एक वेगळाच दावा केला आहे. ‘आपल्या शरीरात देवाच्या आत्म्याने प्रवेश केला असून आपण भारतात पाऊल ठेवताच भारतातील कोरोना संपणार असा दावा स्वयंघोषित स्वामी नित्यानंदने केला आहे. याबाबतीला त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भारतातून कोरोना महासाथीचा आजार कधी संपुष्टात येईल, असा प्रश्न प्रवचनादरम्यान नित्यानंदला त्याच्या शिष्याने विचारला. त्यावर उत्तर देताना नित्यानंदने हास्यास्पद दावा केला. माझ्या शरिरात देवाच्या आत्म्याने प्रवेश केला आहे. भारतात माझे पाऊल पडताच भारतातील करोना संपुष्टात येईल, असे त्याने म्हटले.

नित्यानंदचे कैलासा देशात वास्तव्य
स्वामी नित्यानंदविरोधात अत्याचार केल्याचा आरोप आहे. दोन वर्षांपूर्वी तो भारतातून फरार झाला आहे. त्यानंतर स्वामी नित्यानंदने दक्षिण अमेरिकेतील देश इक्वॅडोरमध्ये एक बेट विकत घेतलं असून या बेटाला स्वतःचा स्वतंत्र देश घोषित केले. नित्यानंदने या बेटाचे नाव कैलासा ठेवले आहे.

स्वत:चे चलनही आणले
कैलासाच्या वेबसाईटनुसार, हे बेट त्रिनिदाद आणि टोबॅगो देशांच्या जवळ आहे. यामध्ये एखाद्या देशातील व्यवस्थेप्रमाणे विविध सरकारी पदांवर लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री, लष्कर प्रमुख आणि इतर पदांचा यात समावेश आहे. नित्यानंदने माँ नावाच्या एका निकटवर्तीयाला पंतप्रधानही नियुक्त केलं आहे. ऑगस्ट २०२० मध्ये नित्यानंदने आपल्या स्वत:च्या मालकीच्या रिझर्व्ह बँक ऑफ कैलासा ची स्थापना केली आणि कैलाशियन डॉलर चलनाचीही घोषणा केली.

‘कैलासा’वर भारतीयांना बंदी
भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता १९ एप्रिल रोजी कथित स्वामी नित्यानंदने स्वत:च्या मालकीचा देश जाहीर केलेल्या ‘कैलासा’वर भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली होती. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे भारत, ब्राझिल, मलेशिया आणि युरोपियन युनियनमधील प्रवाशांनी कैलासावर येऊ नये असं त्याने सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या

IMP