‘जोपर्यंत सत्तेची लालसा जिवंत आहे तोपर्यंत हे महाविकास आघाडीचे सरकार टिकेल’

बुलढाणा : राज्यावर आलेली नैसर्गिक आपत्ती, त्यात शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने काल पुकारलेला महाराष्ट्र बंद आणि राज्यातली वीजटंचाई अशा अनेक मुद्द्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपली नाराजी व्यक्त केली आहे. मी सध्या कोणावरच खूश नाही, असं विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलं आहे.

मी सध्या कुणावरच खुश नाही, कारण निसर्गाने शेतकऱ्यांचे लचके तोडले आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे वाटोळे केलेले आहे, राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतेय. मग मी कोणावर खुश असावं? आता शेतकऱ्यांचा आक्रोश थांबत नाही तोपर्यंत तरी मी समाधानी राहू शकत नाही”, असे वक्तव्य राजू शेट्टी यांनी आज बुलढाणातल्या भेटीदरम्यान केले आहे

जोपर्यंत सत्तेची लालसा जिवंत आहे तोपर्यंत हे महाविकास आघाडीचे सरकार टिकेल,असा निशाणा राजू शेट्टी यांनी ठाकरे सरकारवर साधला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता मराठवाडा दौऱ्यावर होते, आणि आज त्यांनी बुलढाण्यात धावती भेट दिली. शेतकरी संघटनेचे विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन यांचे काही दिवसापूर्वी दुःखद निधन झाले त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना शेट्टी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. त्यावेळी पत्रकारांसोबत ते बोलत होते.

शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी तात्काळ 25 टक्के ॲडव्हान्स नुकसान भरपाई देण्याचे राज्य सरकारने विमा कंपन्यांना आदेशित करावे, विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना पैशाची मागणी करत आहेत, त्यामुळे हे तात्काळ थांबावे आणि विमा कंपन्यांच्या मुसक्या राज्य सरकारने आवळाव्यात, अन्यथा आम्हाला कायदा हातात घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

माहाविकास आघाडीने पुकारलेल्या बंद मध्ये स्वाभिमानीचे कार्यकर्ते कुठे आहे या आंदोलनामध्ये सहभागी दिसले नाहीत असा प्रश्न शेट्टी यांना विचारला असता, हा केवळ शेतकऱ्यांसाठीचा बंद होता त्यामुळे आम्ही या बंदला पाठिंबा दिला, मात्र महाविकास आघाडीच्या कुठल्याच नेत्याने स्वाभिमानीच्या नेत्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्याचे साधे औचित्यही दाखवले नाही, त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते रस्त्यावर दिसले नाहीत, केंद्र सरकार ने शेतकऱ्यांचं वाटोळं केलं, आणि राज्य सरकार देखील शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही त्यामुळे मी सध्या सर्वांवर नाराज असल्याचेही ते यावेळी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या