fbpx

नाना पटोलेंच्या विजयाच्या विश्वासाला एक्झिट पोलचा खोडा नागपूरचा गड गडकरीचं राखणार

टीम महाराष्ट्र देशा : साऱ्या देशाचे लक्ष २३ मे च्या निकालाकडे आणि देशात कोणाचे सरकार येणार याकडे लागले आहे. तसेच आता एक्झीट पोलनुसार लोकसभा निवडणुकीच्या स्पर्धेत असणाऱ्या पक्षांच्या संभाव्य विजयी उमेदवारांची आकडेवारी बाहेर येऊ लागली आहे.
‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या एक्झिट पोलनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा लोकसभा निवडणुकीत विजय होणार असल्याचं समोर आले आहे.

विशेष म्हणजे, नितीन गडकरी यांना आव्हान देणारे काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी आपल्या विजयाबाबत मोठा दावा केला आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरींना सुमारे पाच लाख मतांनी पराभूत करणार, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. "देशभरात मोदी सरकारविरोधात वातावरण होते. नागपूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास येथेही लोकांच्या मनात सरकारबाबत नाराजी होती. त्यातही नागपूर शहरात कमी मतदान झाले आहे. जे झाले ते काँग्रेसच्या बाजूने मतदान झाले आहे. त्यामुळे प्रचाराच्या आधी म्हटल्याप्रमाणे मी पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार आहे, असा दावा नाना पटोले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता.

इतकेच नव्हे तर, एक्झिट पोलचा अंदाज म्हणजे अंतिम निकाल नाही, पण भाजप सत्तेत येईल याचे ते संकेत आहेत, असं सांगतानाच देशात पुन्हा एकदा भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असून नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील. असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले होते.