fbpx

राजकारण एका बाजूला, भाऊ म्हणून उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या पाठीशी : संजय राऊत

udhav & raj thackeray

टीम महाराष्ट्र देशा : कोहिनूर स्क्वेअर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. राज ठाकरे यांच्या ईडीच्या चौकशीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हाय व्होल्टेज वातावरण निर्माण झाले आहे. तर मनसे कार्यकर्त्यांनी ईडी ऑफिसच्या बाहेर गर्दी केली आहे. राज ठाकरे यांच्या चौकशीबाबत शिवसेना खा. संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.राज ठाकरेंची ही चौकशी एक परिक्षा आहे, त्यातून ते तावून सुलाखून निघतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच आपण या चौकशीकडे तटस्थपणे पाहिलं पाहिजे. उद्धव ठाकरेंचे या कडे व्यवस्थित लक्ष्य आहे, असे ते म्हणाले.

तसेच उद्धव ठाकरेंनी राज यांच्या चौकशीबाबत काल दिलेली प्रतिक्रिया ही भावनिक होती. उद्धव ठाकरे हे हळवे आहेत. त्यामुळे राजकारण वेगळ्या बाजूला आहे. राजकारणात मतभेद असू शकतात. पण जेव्हा कुटुंबाचा विषय येतो, तेव्हा कुटुंबाचा प्रमुख म्हणून प्रत्येकजण आपआपल्या भूमिका पार पाडत असतो. त्यामुळे उद्धव ठाकरे हे एक भाऊ म्हणून राज ठाकरे यांच्या पाठीशी आहेत.याआधी ही राज ठाकरे शिवसेनेत असताना देखील त्यांच्यावर काही प्रकरणांमध्ये दोषारोप झाले होते. त्यावेळी सीबीआयने त्यांना चौकशीला बोलावले होते. तेव्हा उद्धव ठाकेर, मी आणि इतर काही नेते त्यांच्यासोबत सीबीआय कार्यालयापर्यंत गेलो होतो, असे संजय राऊत म्हणाले .

दरम्यान राज ठाकरे यांच्या चौकशीवरून विरोधाकांनी सत्ताधारी भाजपला लक्ष केले आहे. राज ठाकरे यांना ईडीची नोटीस पाठवून सरकार नीच राजकारण करत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. तर भाजप आपल्या सत्तेचा वापरकरून सरकार विरोधी नेत्यांना त्रास देत असल्याची टीका समाजमाध्यमांतून होत आहे.