‘सावधगिरी म्हणून मी माझा फोन प्लास्टर केलाय!’, ममता बॅनर्जींची केंद्रावर टीका

नवी दिल्ली : पेगासस स्पायवेयरमुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. केंद्रीय मंत्री, न्यायाधीश यांच्यासह पत्रकारांवर त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून पाळत ठेवली जात असल्याचा आणि हेरगिरी होत असल्याचा आरोप आहे. यावरून विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. तर सरकारनं याबद्दलच्या वृत्तावर आणि ते प्रकाशित झाल्याच्या टायमिंगवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

या वादात आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही उडी घेतली आहे. पेगासस प्रकरणावरून त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सावधगिरी म्हणून मी माझा फोन प्लास्टर केला आहे. केंद्र सरकारलाही प्लास्टर करण्याची वेळ आली आहे. अन्यथा देश उद्ध्वस्त होईल अशी टीका त्यांनी केली. हुतात्मा दिनाच्या निमित्ताने ७ राज्यांमधील तृणमूलच्या कार्यकर्त्यांशी ममता बॅनर्जी यांनी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, ‘आपले फोन टॅप केले जात आहेत. पेगासस प्रकरण हे धोकादायक आणि भयानक आहे. यामुळे मी कोणाशीही बोलू शकत नाही. सरकारनं हेरगिरीसाठी जनतेचा खूप पैसा खर्च केला आहे. माझा फोनही मी प्लॅस्टर करुन ठेवलाय. आपल्याला आता केंद्र सरकारलाही प्लॅस्टर केलं पाहिजे, नाहीतर देश उद्ध्वस्त होईल. भाजपनं भारताच्या संघराज्य पद्धतीवर बुलडोझर चालवला आहे.

‘लोकशाही तीन घटकांची मिळून बनते. प्रसारमाध्यमे, न्यायपालिका आणि निवडणूक आयोग. पेगाससने या तिघांनाही निगराणीखाली आणले आहे. येत्या २७ आणि २८ जुलै रोजी मी दिल्लीमध्येआहे. जर केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांची बैठक बोलावली गेली, तर मी त्यासाठी दिल्लीत उपलब्ध असेन’, असे म्हणत त्यांनी विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP