सुजय विखेंचा भाजप प्रवेश? वडील काँग्रेसमध्ये म्हणून मी देखील त्याच पक्षात राहावं अस काही नाही – सुजय विखे

टीम महाराष्ट्र देशा : ‘माझे आईवडील काँग्रेसमध्ये आहेत म्हणून मी देखील त्याच पक्षात राहावं अस काही नाही, शेवटी मला जे नेतृत्व मान्य असेल तिकडे मी जाईलच भले त्याला माझ्या घरच्यांचा विरोध असेल तरी मी माझा निर्णय घेईल’ अस वक्तव्य करत सुजय विखे यांनी एकच खळबळ उडवली आहे. सुजय विखे हे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र असून ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात काँग्रेस कडून इच्छुक आहेत.

माझे वडील हे काँग्रेस पक्षाचे विरोधीपक्ष नेते आहेत, आई जिल्हा परिषदेची अध्यक्ष आहे. पण तो माझ्या आई वडिलांच्या प्रश्न आहे. कोणता पक्ष घ्यायचा हा प्रत्येक व्यक्तीचा निर्णय असतो. वडील काँग्रेसमध्ये असले आणि मुलगा दुसऱ्या पक्षात असल्यास त्याचा असा अर्थ होत नाही की वडील ज्या पक्षात आहेत त्याच पक्षात मुलाने राहिले पाहिजे. माझं स्वतंत्र मत आहे मला स्वतंत्र नेतृत्व मान्य असेल तर मी माझ्या मानणाऱ्या नेतृत्वाकडे जाईल. भलेही माझ्या कुटुंबाचा विरोध असला तरी मी तिकडे जाईल. शेवटी राजकारणामध्ये प्रत्येकाला स्वतःचा निर्णय घेण्याचे स्वतंत्र आहे , आईवडिलांनी घेतला तसा मी देखील घेईल. अस सुजय विखे म्हणाले आहेत.

दरम्यान, दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्षाकडे घेवून या मतदारसंघातून डॉ.सुजय विखे पाटील यांनाच उमेदवारी देण्यासंदर्भात पक्षाचे अध्यक्ष खा.राहुल गांधी यांच्याकडे आपण व्यक्तीगत पाठपुरावा करू, अशी ग्वाही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव चेल्लावामशी चांद रेड्डी यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. महासचिव रेड्डी यांनी शिर्डी येथे भेट दिली. जिल्हा काँग्रेस कमिटी व राहाता तालुका कॉँग्रेस कमिटीच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही ग्वाही दिली आहे.

Loading...

मात्र, राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक सर्व ज्ञात आहे. त्यामुळे सुजय विखे यांच्या या वक्तव्याचा नगरकरांनी उचित अर्थ घेतला आहे. दरम्यान, विखे पाटलांवर भाजपच्या ‘बी’ टीमचा कॅप्टन म्हणून होणारी टीका या वक्तव्यातून पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर येत आहे.