अरविंद शिंदेंना भिमालेंचा 48 तासांचा अल्टीमेटम; अन्यथा 101 कोटींचा मानहानीचा दावा

शिंदेवर कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्याचा युवा मोर्चाचा इशारा

पुणे: पुणे महापालिका सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांच्यामध्ये सुरू असणारा कलगीतुरा थांबताना दिसत नाही. अरविंद शिंदे यांना एवढे वर्ष सत्तेची सवय असल्याने आता त्यांना त्रास होत आहे, त्यामुळेच भाजप नेत्यांना बदनाम करणे आणि सभागृह बंद पाडण्याच काम ते करत असल्याची टीका श्रीनाथ भिमाले यांनी केली आहे, तसेच येत्या 48 तासात शिंदे यांनी माफी न मागितल्यास 101 कोटींच्या मानहानीच्या दाव्याला तयार राहण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मागील आठवड्यात महापालिका सभागृहात कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्यामध्ये चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यानंतर शिंदे आणि भिमाले यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी तक्रार दाखल केली. दरम्यान, आता हा वाद आणखीन वाढणार असल्याच दिसत असून सोमवारी अरविंद शिंदे यांनी भिमाले यांच्यावर २५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्यानंतर, भिमाले यांनी देखील शिंदे यांच्यावर १०१ कोटींचा दावा दाखल करण्याची नोटीस दिली आहे.

दरम्यान, आज भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी महापौर मुक्ता टिळक यांची भेट घेत अरविंद शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे, तसेच त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.