मोदी सरकारचे खातेवाटप: शिवसेनेच्या पदरी पुन्हा एकदा अवजड खातेच

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. तर आज मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात आले. या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या वाट्याला पुन्हा एकदा अवजड उद्योग खाते आले आहे. शिवसेनेचे अरविंद सावंत यांना मोदी सरकारच्या या मंत्रिमंडळात अवजड उद्योग खात्याची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.

काल शपथविधी झाल्यानंतर आज सर्व मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले जात आहे. यामध्ये शिवसेनेचे अरविंद सावंत यांना अवजड उद्योग खाते देण्यात आले आहे. मात्र या खात्यावरून शिवसेनेत नाराजी असल्याच चित्र आहे. कारण शिवसेनेच्या पदरात सलग दुसऱ्यांदा अवजड उद्योग खाते पडले आहे. तसेच यावेळी शिवसेनेला अन्य दुसऱ्या खात्याची अपेक्षा होती. त्यामुळे शिवसेनेचा यावेळी अपेक्षाभंग झाला असल्याच म्हंटल जात आहे.याबाबत अद्याप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही.

मोदी सरकार एकमध्ये अवजड उद्योग खाते हे शिवसेनेचे आनंत गीते यांच्याकडे होते. तर या वेळेस या खात्याची जबाबदारी अरविंद सावंत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. अरविंद सावंत हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार असून त्यांना विधी मंडळातील कामकाजाचा दांडगा अनुभव आहे.