अरविंद केजरीवाल सहा मंत्र्यासह घेणार शपथ; रामलीला मैदानावर उद्या सोहळा

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला घवघवीत यश मिळाले असून भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे हॅटट्रिक करत, तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. दुसरीकडे ‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे.

अरविंद केजरीवाल हेच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं. त्यांचा शपथविधी सोहळा उद्या दिल्लीतील रामलीला मैदानावर होणार आहे. अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. उद्या रामलीला मैदानावर सकाळी १० वाजता हा सोहळा पार पडणार आहे. तसेच इतर सहा मंत्र्यांचाही शपथविधी त्यांच्यासोबत होणार आहे. या सहा मंत्र्यांमध्ये मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसेन आणि राजेंद्र गौतम यांचा समावेश आहे.

अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रण दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही ते स्पष्ट झालेलं नाही. आपच्या वतीने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.

दरम्यान, इतर कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री किंवा नेत्यांना या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण दिलं नाही, कारण हा सोहळा दिल्लीसाठी असणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी वृत्तपत्रांमध्ये जाहिरातींद्वारे दिल्लीकरांना शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे.