भाजपने शिवाजी महाराजांच्या स्वप्नांचा चुराडा केला – केजरीवाल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागणाऱ्या भाजपने राज्यातील शेकडो शाळा बंद करून शिवरायांच्या स्वप्नांचा चुराडा केल्याची घणाघाती टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. आम्ही मागील तीन वर्षात दिल्लीतील एकही शाळा बंद केली नाही तर नवीन शाळा सुरु केल्या हे दिल्लीत होवू शकत तर मग महाराष्ट्रात का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने केजरीवाल यांनी सिंदखेडराजा येथे मातृतीर्थाचे आज दर्शन घेतले यानंतर झालेल्या सभेत त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे.

हिंदू मुस्लिम शीख इसाई हे भारत मातेचे चार पुत्र आहेत मात्र भावा भावात भांडण लावण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. पाकिस्तान गेली ७० वर्ष भारतात जातीय दंगली घडवण्याचे स्वप्न बघत आहे, मात्र त्यांना जे जमल नाही ते अवघ्या 3 वर्षात भाजपने केल्याचा घणाघातही अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

भाजप आणि आरएसएसने कोरेगाव भीमाची दंगली घडवली, भाजप म्हणजे देशद्रोही आणि गद्दार पार्टी असून जनतेला आणखीन दंगे हवे असतील तर त्यांना मतदान करावे. तर शांतता आणि विकास हवा असल्यास ‘आप’ला साथ देण्याच आवाहन यावेळी केजरीवाल यांनी केले.

पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रातील युवकांनी एकत्र येण्याची गरज आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्या मुलांना समान शिक्षण मिळणारा भारत निर्माण करायचा आहे. त्यामुळे युवकांनी एकत्र येवून गावागावात आप च्या शाखा उभ्या कराव्यात आणि भाजपाला लाथ मारून हाकलून लावाव.