fbpx

अरुण जेटलींची प्रकृती अस्वस्थ, फडणवीसांनी घेतली कुटुंबियांची भेट

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. ९ ऑगस्टला त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर डॉक्टरांचे पथक सातत्याने अरूण जेटली यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. परंतु आता पुन्हा त्यांची प्रकृती खालावली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अरुण जेटली यांची प्रकृती अस्थिर आहे. जेटली यांच्यावर किडनी संदर्भातील आजारावर उपचार सुरू होते. जेटली यांच्यावर सप्टेंबर २०१४ मध्ये बॅरिएट्रिक ऑपरेशन करण्यात आले होते. मधुमेहामुळे त्यांचे वजन वाढत होते आणि त्यामुळेच जेटली यांचे ऑपरेशन करण्यात आले होते. तेव्हा प्रथम मॅक्स रुग्णालयात नंतर AIIMS मध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, जेटली यांना कार्डियो-न्यूरो सेंटर मध्ये एक्सट्रॉकोर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सीजनेशन आणि इंट्रा-एओर्टिक बलून पंप सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एम्समध्ये जाऊन जेटलींच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना देखील केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन, माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, अश्विनी चौबे, लालकृष्ण अडवाणी, थावरचंद गहलोत यांच्यासह अनेक नेत्यांनी जेटली यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी AIIMS ला भेट दिली आहे.