अरुण जेटलींची प्रकृती पुन्हा खालावली, राष्ट्रपती घेणार भेट

blank

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. ९ ऑगस्टला त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर डॉक्टरांचे पथक सातत्याने अरूण जेटली यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. परंतु आता पुन्हा त्यांची प्रकृती खालावली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अरुण जेटली यांची प्रकृती अस्थिर आहे. जेटली यांच्यावर किडनी संदर्भातील आजारावर उपचार सुरू होते. जेटली यांच्यावर सप्टेंबर २०१४ मध्ये बॅरिएट्रिक ऑपरेशन करण्यात आले होते. मधुमेहामुळे त्यांचे वजन वाढत होते आणि त्यामुळेच जेटली यांचे ऑपरेशन करण्यात आले होते. तेव्हा प्रथम मॅक्स रुग्णालयात नंतर AIIMS मध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते.

आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद एम्समध्ये जाऊन अरूण जेटलींची भेट घेतील. अरूण जेटलींनी एम्समध्ये दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही त्यांची भेट घेतली होती. तसेच आता राष्ट्रपतीही भेट घेणार असल्याने त्यांची प्रकृती आणखीच खालावली असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रकृतीच्या अस्थिरतेमुळेचं अरुण जेटली यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमधून माघार घातली होती. जेटली यांनी पंतप्रधान मोदींनी पत्र लिहून मंत्रिपदासाठी आपला विचार करू नये अशी विनंती केली होती. या पत्रात त्यांनी गेल्या १८ महिन्यांपासून प्रकृती खराब असल्याचे म्हटले होते. प्रकृती ठिक नसल्यामुळे आपण जबाबदारी पार पाडू शकत नाही. त्यामुळेच मंत्रिमंडळात आपल्या नावाचा विचार करू नये असे त्यांनी म्हटले होते.