fbpx

अरुण जेटलींचे निधन, राज ठाकरे झाले भावूक

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, विख्यात कायदेतज्ज्ञ आणि संसदेपासून सडकेपर्यंत पक्षाला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढणारे राजकारणातील चाणक्य अरुण जेटली (वय 67) यांचे आज दुपारी पाऊणच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

अरुण जेटलींवर २०१८ मध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना या वर्षाच्या सुरुवातीला एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. खराब प्रकृतीमुळे त्यांनी १७ व्या लोकसभेच्या निवडणुकीत सहभाग घेतला नव्हता. त्यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी टाकण्यात येऊ नये अशी विनंती केली होती. २०१४ च्या मोदी सरकारमध्ये त्यांनी अर्थ आणि संरक्षण ही महत्वाची दोन खाती सांभाळली होती.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील जेटली यांना आदरांजली अर्पण केली आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी अर्थमंत्री आणि स्वतःच्या उत्तम संवादशैलीने संसदेतील चर्चांमध्ये जिवंतपणा आणणारे अरुण जेटली ह्यांचं निधन झालं. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.