बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कलाकरांचा पुढाकार

best mumbai

मुंबईः मुंबई महापालिकेची बेस्ट सेवा सध्या आर्थिक तोट्यात आहे. बेस्टला या कठीण आर्थिक आणीबाणी च्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी मराठी इंडस्ट्रीतील नावाजलेले कलाकार आता बेस्टचे ॲम्बॅसेडर बनणार आहेत.

बेस्टचे माजी कर्मचारी आणि प्रसिद्ध मराठी कलाकार प्रशांत दामले, माधवी जुवेकर, अरूण नलावडे, शरद पोंक्षे हे आता बेस्ट ॲम्बॅसेडर पदाची धुरा सांभाळणार आहेत. त्याचबरोबर ‘भाऊजी’ अर्थात आदेश बांदेकर आणि सुबोध भावे हे कलाकारही बेस्टचे ॲम्बॅसेडर होणार आहेत. विशेष म्हणजे हे सर्व कलाकार यासाठी कोणतंही मानधन घेणार नाहीत .

ऐंशीच्या दशकात अभिनेते प्रशांत दामले हे बेस्टमध्ये नोकरीला होते. 1983 पासून ते नोकरीसोबत नाटकात काम करू लागले. ‘टूरटूर’ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले होते. बेस्टमध्ये काम करत असताना कलेला खूप प्रोत्साहन मिळत होते. त्यामुळेच नोकरी आणि नाटक दोन्ही करू शकलो, असे प्रशांत दामले यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. नोकरीच्या काळातही त्यांनी आठ ते नऊ नाटके केली होती.