व्यंगचित्रकार राज ठाकरे ‘पार्टटाइम’ राजकारणाला आतातरी सिरियसली घेणार का? 

blank

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या राजकीय नेते कमी आणि विनोदी राजकीय व्यंगचित्रकार म्हणून चांगलेच नावारूपाला येत आहेत. एक व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कलेचा आदर करणार मोठा वर्ग सर्वत्र अगदी सेना-भाजपमध्ये देखील आहे.राज एक दोन दिवसातून एक व्यंगचित्र काढून वेगवेगळ्या मुद्य्यांवरून भाजप-सेनेवर कुंचल्याने वार करणे हा एककलमी अजेंडा राबवत असतांना दिसत आहेत.

एका बाजूला दिवसेंदिवस राज ठाकरे यांचे चाहते सोशल मिडीयावर वाढत आहेत मात्र दुसऱ्या बाजूला त्यांचे शिलेदार दिवसेंदिवस कमी होत आहेत.२०१७ मधील महापालिका निवडणुकीत पक्षाने डावलल्याची खंत पुढे करीत माजी आमदार शिशिर शिंदे यांनी मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. १९ जून या शिवसेनेच्या वर्धापनदिनाचा मुहूर्त शिंदे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. शिशिर शिंदे यांच्या घरवापसीमुळे मुलुंड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेची पोकळी भरून निघणार तर मनसेची ताकत आणखी कमी होणार अशी शक्यता वर्तविली जात आहे.

शिशिर शिंदे पक्ष सोडून जाऊन १० दिवस होण्याआधीच राज ज्या दिवशी ते नरेंद्र मोदींच्या विरोधातले कार्टून काढत बसले होते, त्याचवेळी त्यांचे जळगावमधील महापौरांसह तब्बल १२ नगरसेवक मनसेला राम राम ठोकून सुरेश जैन यांच्यासोबत गेले. त्याआधी शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेतले ६ नगरसेवक फोडले होते ज्याचं प्रकरण सध्या न्यायालयात आहे.

एकेकाळी शिवसेनाप्रमुखांचा वारसदार म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जात होतं. बाळासाहेबांनी पुत्रमोहापायी म्हणा नाहीतर अजून दुसऱ्या कारणाने म्हणा राज यांच्या हाती सेना दिली नाही हा निर्णय किती योग्य होता हे आता जनतेच्या लक्षात येवू लागले आहे. बेफिकीरपणे वागणाऱ्या राज ठाकरे यांच्या हातात सेना सुरक्षित नाही हे बाळासाहेब चांगलंच ओळखून होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

कोणतंही ध्येधोरण आणि राजकीय भविष्य नसलेल्या पक्षात दिवसरात्र मेहनत घेवून काम करणे म्हणजे वेळ वाया घालवल्या सारखेच असते. पक्षनिष्ठा,तत्व या सगळ्या गोष्टी आउटडेटेड होत चालल्या असतांना मनसेला पक्षांतर्गत संवाद वाढविणे गरजेचे आहे. मोदींवर टीका करणे हे आपण एक राजकीय विरोधक म्हणून आपण समजू शकतो,मात्र पक्षाचा एककलमी अजेंडा असणे मनसेच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे.

भाजपच्या निरंकुश कारभारावर जनतेमध्ये नाराजी आहे कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर अजूनही जनता विश्वास टाकायला तयार नाही अश्या परिस्थितीत नवा पर्याय जनता शोधत आहे. या दोन्ही मधली जी स्पेस आहे ती भरून काढली तर काय होऊ शकते हे कर्नाटकमध्ये दिसून आले आहे. शरद पवार यांची वाढलेली जवळीक ही देखील अनेक कार्यकर्त्यांना आवडलेली नाही, मात्र राज ठाकरेंना आरसा दाखविण्याची हिम्मत करणे म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटी बांधण्याचा प्रकार असल्याने कोणी मनसे नेता धजावेल असे सध्यातरी वाटत नाही.

जो वेळ व्यंगचित्र काढून आपला छंद जोपासण्यात आणि मोदींवर टीका करण्यात ते घालवत आहेत तो वेळ त्यांनी पक्षातील पदाधिकारी आणि शिल्लक राहिलेले नेते यांच्याशी  चर्चा करण्यात, त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आणि आत्मपरीक्षण करण्यात घालवला तर आणखी उत्तम होईल.

– दीपक पाठक

राज ठाकरे जेंव्हा वडापाव वर ताव मारत कार्यकर्त्यांशी सवांद साधतात