२०१९ च्या निवडणुकीतील तरुण चेहरे, ज्यांच्या हातात असेल राज्याचे भविष्य

बापू गायकवाड – राज्यातील निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. सर्वच पक्षांनी उमेदवारी जाहीर करताना वेगवेगळे निकष लावलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी अनुभवी उमेदवारांवर विश्वास दाखवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी तरुण उमेदवारांची क्षमता पाहून त्यांना उमेदवारी देण्यात आहे. या उमेदवारांना आपले राजकीय कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली आहे. आज आपण अशाच तरुण तडफदार उमेदवारांची माहिती घेणार आहोत.

रोहित पवार रोहित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आहेत. त्यामुळे त्यांना मोठा राजकीय वारसा आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. या मतदारसंघात पाण्याची समस्या आहे. तसेच पायाभूत सुविधांचा विकास झालेला नाही. त्यामुळे त्यासाठीच त्यांनी हा मतदारसंघ निवडलेला आहे. या मतदारसंघात त्यांचा सामना फडणवीस सरकारमधील मंत्री आणि विद्यमान आमदार राम शिंदे यांच्याशी होत आहे. त्यामुळे ही लढत राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या लढतींपैकी एक असणार आहे. या लढतीत रोहित पवार यांच्या युवा नेतृत्वाचा कस लागत आहे.

आदित्य ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे वरळीमधून निवडणूक लढवत आहेत. ठाकरे कुटुंबीयातून निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे हे पहिले उमेदवार ठरले आहे. आदित्य ठाकरे यांना वडील आणि आजोबा राजकारणात असल्यामुळे मोठा राजकीय वारसा आहे. ही निवडणूक लढवण्याआधी आदित्य ठाकरे हे युवसेना प्रमुख म्हणून काम करत होते. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी त्यांनी जनआशीर्वाद यात्रा काढली होती. या यात्रेत त्यांनी महाराष्ट्रभर फिरून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. आणि आता ते लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात जाण्यास तयार आहेत. त्यामुळे शिवसैनिकांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

संदीप क्षीरसागर संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे युवा नेते आहेत. ते बीडमधून निवडणूक लढवत आहेत. संदीप क्षीरसागर यांनी राजकारणाची सुरुवात आपले काका म्हणजे त्यांचे राजकीय विरोधक आणि शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत केली होती. परंतु राष्ट्रवादीशी झालेल्या मतभेदानंतर जयदत्त यांनी शिवसेनेची वाट धरली. परंतु संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीसोबत आपले काम सुरु ठेवले. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ते आपल्या काकांविरूद्ध कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

धीरज देशमुख धीरज देशमुख हे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत. ते लातूर ग्रामीण या विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यांच्या पाठीशी भक्कम राजकीय वारसा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत. राज्यातील कॉंग्रेस सध्या संकटात आहे. त्यामुळे त्यांना विजय मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यांच्या प्रचारासाठी त्यांचे बंधू रितेश देशमुख हेही सक्रीय झालेले आहेत. ते मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असल्याने कसे नेतृत्व करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.

अनिकेत देशमुख अनिकेत देशमुख हे विक्रमी ११ वेळा आमदार राहिलेल्या गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. ते शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर सांगोला मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांचे आजोबा गणपतराव देशमुख यांना संसदीय कामकाजाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. गणपतराव देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर भाऊसाहेब रुपनर यांना उमेदवारी मिळाली होती. परंतु कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे आयत्यावेळी अनिकेत देशमुख यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या त्यांच्यावर चांगली कामगिरी करण्याचा दबाव असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते या निवडणुकीत कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीत उतरलेले हे सर्व तरुण उमेदवार निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागलेले आहेत. ही निवडणूक त्यांचे राजकीय भविष्य ठरवणार आहे. या सर्वच नेत्यांना मोठा राजकीय वारसा असल्याने यातील काही युवा नेते भविष्यात राज्याचे नेतृत्व करताना दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सर्वजण आपल्या पहिल्या निवडणुकीत कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या