अद्भुत इतिहासाला जागवणारं कोकण…

“येवा कोकण आपलचं असा!” असं म्हणत पर्यटकांना आकर्षित करणारं कोकण सध्या त्याच्या प्रसिद्ध अशा रत्नागिरी ( देवगड ) हापूससाठी ह्या उन्हाळ्यात चर्चेत नसून जगाच्या पातळीवर कोकणच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव सध्या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. कोकण प्रांताला मिळालेल्या सह्याद्रीच्या वरदहस्तावर इतिहासात लुप्त झालेल्या भारतीय संस्कृतीचे जवळपास १०,००० ते ४०,००० हजार वर्ष जुने दाखले सापडले आहेत. हे दाखले सह्याद्रीच्या पठारांवर चित्राच्या रुपात कोरलेले असून जवळपास १२०० पेक्षा जास्ती दगडीचित्र किंवा ज्याला पेट्रोग्लिफ असं म्हणतात ते मिळाले आहेत. ‘सुधीर रिसबुड आणि धनंजय मराठे’ ह्या दोन मराठमोळ्या व्यक्तींनी हा खजिना शोधला असून जागतिक पातळीवर त्यांच्या ह्या शोधाची दखल घेतली गेली आहे.

ह्या दगडी चित्रांमध्ये प्रामुख्याने प्राणी जीवन, शिकार, देवांची चित्रे आहेत. प्राण्यामध्ये हरीण, मासे, कासव, वाघ, हत्ती ह्यांचा समावेश आहे. ह्या चित्रांसोबत काही नक्षीकाम ही मिळालं आहे. जगभरात माणसाच्या पूर्व संस्कृतीचे दाखले देणारी अनेक भित्तीचित्र किंवा दगडावर कोरलेली चित्र आढळून येतात. कोकणात मिळालेली दगडी चित्र मात्र ह्याला अपवाद आहेत कारण सामान्यतः अशी चित्रे उभ्या भिंतीवर, दगडावर आढळून येतात पण कोकणातली चित्रे मात्र सपाट दगडावर कोरण्यात आली आहेत. ह्यामुळे ती खूप दुर्मिळ आहेत. काही दगडी चित्रे तर प्राणांच्या मूळ आकाराएवढी मोठी काढण्यात आलेली आहेत. तसेच त्यात त्यांचा आकार ते त्याचं लिंग हे आज जवळपास १०,००० हजार पेक्षा जास्ती वर्षांनी आपण बघू आणि ओळखू शकतो. इतके वर्ष निसर्गाच्या सगळ्या प्रवासाला पुरून उरत, आजही ही दगडी चित्र स्पष्टपणे त्या काळच्या संस्कृतीचे दाखले आपल्या पर्यंत पोहचवत आहेत.

ह्या दगडी चित्रे काहीतरी उद्देश ठेवून काढली आहेत. ह्यावरून नक्कीच स्पष्ट होते की कोकणात तब्बल १०,००० हजार ते ४०,००० हजार वर्षापूर्वी एक संस्कृती नांदत होती. ज्या कोकणाचा आपण कॅलिफोर्निया करायला निघालो आहोत ते कोकण, त्या केलिफोर्नियाचा शोध लागायच्या आधीपासून माणसाला आपल्याकडे आकर्षून घेतं आलेलं आहे. माझ्या मते इजिप्त मधील पिरॅमिड ला जेवढं महत्त्व त्यांच्या संस्कृतीत आहे तितकीच महत्वाची ही दगडीचित्र आपल्या संस्कृतीसाठी असायला हवीत. काळाच्या ओघात आलेल्या सात बारा आणि मालकी हक्कामुळे ज्या जागेवर ही दगडी चित्र आहेत त्या जागा लोकांच्या मालकीच्या आहेत. इतकंच काय ह्याचा शोध लागल्यावर त्याची दखल घेण्याची पात्रता ही आपल्याकडे नाही. आजही ह्या चित्रांबद्दल अपुरी माहिती उपलब्ध आहे. रत्नागिरी टुरिझम च्या साईटवर ह्याची चित्रं उपलब्ध असली तरी त्या ठिकाणी कसं जायचं ह्याची जास्त माहिती उपलब्ध नाही. ह्यासाठी आजही तिथल्या स्थानिक लोकांचा आधार घ्यावा लागतो ही आपली शोकांतिका आहे.

रत्नागिरी इथे असलेल्या एका जागी ज्याचं नाव ‘देवचे गोठणे’ असं आहे तिकडे असचं एक दगडी चित्र असून त्या चित्रावर कोणतही होकायंत्र काम करत नाही. होकायंत्र अश्या तऱ्हेने चुकीच दिशादर्शक करण्यात महत्वाची भूमिका हे तिकडे असलेलं चुंबकीय क्षेत्र अनेकदा कारणीभूत असते. पण त्याकाळी अशा ठिकाणी चुंबकीय क्षेत्र आहे अथवा त्याचा प्रभाव ह्या ठिकाणी पडतो ह्याची जाणीव कशी झाली असेल? कारण त्याच ठिकाणी एक दगडी चित्र कोरलेलं आहे. जर विचार केला तर चुंबकीय क्षेत्र त्याचा होणारा प्रभाव वगरे गोष्टी ज्ञात त्याकाळी असाव्यात कारण ते माहित असल्याशिवाय त्याच ठिकाणी अशी चित्रे का कोरली असावीत? अर्थात ह्या जर तर चा शोध अजून सुरु आहे.

कोकणातल्या ह्या दगडी चित्रांवर अजून संशोधन होणं गरजेचं आहे. पण ९९%-१००% च्या शर्यतीत जुंपलेली पिढी ह्याचा अभ्यास करू शकेल का? ह्या बद्दल मन मात्र सांशक आहे. जगाचा इतिहास शिकून तो बदलवायला निघालेली पिढी आपल्याच इतिहासाबद्दल किती उदासीन आहे ते आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. जगातील इतिहास दाखवणाऱ्या जागांबद्दल सजग असलेला भारतीय मात्र स्वतःच्या संस्कृतीने उभारलेल्या आणि मागे सोडलेल्या खुणांच्या बाबतीत तितकाच निष्क्रिय आहे. आयफेल टॉवरच्यासमोर असो वा पिसाच्या कललेल्या मनोऱ्या समोर उभा राहून सेल्फी घेणारा भारतीय मात्र वेरुळच्या कैलास लेण्यासमोर किंवा कंबोडिया इथल्या ‘अंगकोर वाट’च्यासमोर सेल्फी घेण्यात तितकाच उदासीन असतो हे टोचणारं पण सत्य आहे. त्यामुळे कोकणातल्या ह्या ठेव्याची दखल बी.बी.सी. ते न्यूयॉर्क टाईम्स ने घेतल्यावर पण भारतातल्या सजग मिडीयाला ह्यावर काही लिहावसं वाटलं नाही ह्यातच सगळं आलं.

दोन मराठी माणसांनी आपल्या भूमीवर एकेकाळी नांदणाऱ्या संस्कृतीच्या खुणा शोधण्यात मोलाची भूमिका बजावली आहे ही खूप समाधान देणारी गोष्ट आहे. आज ह्या ठेव्याला सरकार ते स्थानिक अशा सगळ्याच पातळीवर जपून तो समृद्ध वारसा पुढच्या पिढीकडे हस्तांतरण करण्याची गरज आहे. ह्या शोधाच्या मागे महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सगळ्यांना माझा सलाम. आपलं कोकण हे इतिहास जागवणारा एक महत्त्वाचा दुवा आहे हे पुन्हा एकदा ह्या निमित्ताने ठळकपणे अधोरेखित झालं आहे!

माहिती स्रोत:- बी.बी.सी., न्यूयॉर्क टाईम्स

फोटो स्रोत:- गुगल, न्यूयॉर्क टाईम्स

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

महत्वाच्या बातम्या 

राज्यातील पावसाची स्थिती जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

महाराष्ट्र लुटणाऱ्या तसेच कारखाने मोडून खाणाऱ्यांची चौकशी करणार : पाटील

कॉंग्रेसमध्ये राष्ट्रवादीचं विलीनीकरण करा, ‘या’ बड्या नेत्याने केली मागणी

’35 अ’च्या रक्षणासाठी संघटित व्हा आणि प्राणांची आहुती द्या : मेहबुबा मुफ्ती