fbpx

जयसिद्धेश्वर स्वामींना घरात बसण्याचा सल्ला, मग साहेब थोड नातवाला पण सांगा

विरेश आंधळकर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने लिंगायत धर्म गुरु जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे. यामध्ये आता राजकारण हे महाराजांचे काम नसून निवडणूक लढणे देशाच्या हिताचं नसल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे, तसेच राजकारण करणे हे महाराजांचे काम नाही, त्यामुळे त्यांनी पाच रुपयाची नोट घेवून मठात जाऊन बसावे, असा सल्ला देखील पवारांनी दिला होता.

शरद पवार यांनी भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांना उद्धेशून केलेल्या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका बाजूला महाराज लोकांनी राजकारण करू नये सांगणाऱ्या पवारांनी आपल्या नातवाला देखील चर्च आणि पाद्रींकडे जाऊन भोंदूगिरी करू नये, असा सल्ला देण्याची खोचक मागणी सोशल मिडीयावर केली जात आहे. शरद पवार यांच्या विधानामुळे लिंगायत धर्मियांच्या भावना दुखावल्याचा सूर देखील उमटत आहे.

शरद पवारांना पुरोगामी नेतृत्व म्हणून ओळखले जाते, पवार यांनी देखील आपल्या पुरोगामी प्रतिमेला कधी धक्का लागू दिलेला नाही. त्यामुळे एखाद्या धर्मगुरूने निवडणूक लढणे हे त्यांना रुचणार नाही हे निश्चित आहे, मात्र लोकशाहीने देशातील सर्व नागरिकांना समान अधिकार दिलेला आहे. मग तो फकीर असो कि कोणी महाराज. प्रत्येकाला भारतीय लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जयसिद्धेश्वर स्वामी यांनी मठात बसायचं कि निवडणुकीत उतरायचं हा सल्ला देण्याचा अधिकार पवारांना उरत नाही. स्वामी यांच्यावर टीका करण्यापूर्वी त्यांनी उभारलेले सामाजिक काम पवारांनी बघायला हवे होते, अशी भावना एका वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे पवार इतर धर्मियांच्या सणाला हजेरी लावतात, दर्ग्यात जातात मग महाराजांनाच विरोध का, असा प्रश्न देखील येथे उपस्थित होत आहे. दुसरीकडे पवार यांनी केलेली टीका हि सोलापुरातील लिंगायत समाजाला देखील पटलेली नाही, सोलापूर लोकसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, स्वामी यांच्या उमेदवारीने आधीच शिंदे यांच्याशी जोडलेले लिंगायत नेते काहीशे दुरावलेले दिसत आहेत. तर आता पवार यांच्या विधानाने भाजपला अधिकचा फायदा होण्याची शक्यता दिसत आहे.

एका बाजूला पवार संविधान वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा आभास निर्माण करतात तर दुसऱ्या बाजूला त्याच घटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करण्यापासून स्वामींना रोखतात हा दुटप्पीपणा यानिमित्ताने समोर आला आहे. खर तर हे विधान करून पवारांनी शिंदे यांच्या अडचणी वाढविल्या आहेत त्यामुळे पवार शिंदेच्या प्रचारासाठी आले होते कि पाडण्यासाठी हाच सवाल आता उपस्थित झाला आहे.

1 Comment

Click here to post a comment