पौर्णिमेच्या रात्री रायगड प्रदक्षिणा – एक अविस्मरणिय अनुभव

एक महिन्यापूर्वी भारतीय सैन्यदलातील सैनिक आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी विक्रमराव कणसे यांनी फोनवर ‘रायगड परिक्रमेच’ आमंत्रण दिले अन मीही लगेच होकार कळविला.दिवस ठरला होता. शनिवार दि. २१ मे २०१७  बौध्दपोर्णिमा. मुंबईहून रायगडाच्या मार्गावर असताना शिवप्रतिष्ठानचे ज्येष्ठ धारकरी श्री. मिलिंददादा तानवडे यांचा फोन आला. मिलिंददादांनी आपुलकीच्या स्वरात प्रदक्षिणेबाबत काही सुचना दिल्या.

मुंबईहून मी एकटाच जाणार होतो. पण चुनाभट्टीच्या रोहितराव महाडिकांनी सोबत येण्याची इच्छा व्यक्त केली अन त्यानंतर विनायकराव बालगुडे, गणेशराव मोदी, प्रणितराव परब अशी एक एक धारकऱ्यांनी माझी साथ देण्याचे ठरविले. पण मला आश्चर्याचा धक्का दिला तो लालबाग येथील पुरूषोत्तमदादा बाबर आणि अजयराव चव्हाण यांनी. बाबर येणार हे मला ठाउकच नव्हते. अशी ८ मुंबईकरांची टीम रायगडाच्या दिशेने सकाळी १० वा. निघाली.

Loading...

पाचाड येथील जिजाउसाहेबांची समाधी अन वाडा पाहुन आम्ही ५ च्या आसपास चित्त दरवाजापाशी पोहचलो. अंगापुर येथील धारकरी थोड्याच वेळात पोहचले. त्यांच्यासोबत होते माजी सैनिक हेमंत नाईक पुंडे सर.

विक्रमराव कणसे यांनी सर्वांची ओळख करुन दिली. आमच्य सोबत महाराष्ट्र केसरी कुस्तीत सहभागी झालेले पैलवान अमरराव कणसे हेही होते. विक्रमरावांनी प्रदक्षिणेसाठी काही सुचना दिल्या….. तेव्हा आमच्या लक्षात आले की आम्ही सोडून इतर सर्वांनी पायात शूज घातले होते. लालबागचे अजयराव चव्हाण तर कोल्हापुरी चप्पल घालून आले होते. पुंडे सरांनी चव्हाण यांना, तुम्हाला कोल्हापुरी घालून प्रदक्षिणा करता येणार नाही. वाट फार अवघड आहे. तुम्ही इथेच थांबा आम्ही येइपर्यंत. आम्ही सारेच एकमेकांकडे पाहु लागलो. मी पुंडे सरांच्याकडे पाहून म्हंटले, सर ते पोलीस आहेत. जमेल त्यांना. कणसे आणि सरांचे चेहरे खुलले, अरे वाह मग काही चिंता नाही. पण उतार फार आहे तेव्हा संभाळा. हे ऐकताच आम्हीही सुटकेचा श्वास सोडला.

प्रेरणामंत्र म्हणून सायंकाळी ६.४५ वा. चित्तदरवाजा येथून रायगड प्रदक्षिणेला सुरुवात झाली. रायगड उजव्या हाताला ठेवून ‘पिवळ्या आणि केशरी रंगाचे बाणाच्या चिन्हावर’ लक्ष देउन ३४ शिवभक्त धारकरी निघाले. सर्वात पुढे विक्रमराव कणसे, माऊली गुरव आणि सर्वांच्या मागे नाईक पुंडे सर.पहिला टप्पा टकमकाखालील रायनाकाच्या स्मारक येथे थांबला. मी रायनाकाच्या इतिहासाबद्दल थोडी माहिती दिली. जमलेल्या धारकऱ्यांना मी उद्देशून म्हणालो,
तुम्ही महाराजांना पाहिले आहे काय ?
सर्वांनी माना नाही म्हणून डोलावल्या.
“आज एक अशी व्यक्ती इथे आपल्या सोबत आहे ज्याने महाराजांना पाहिले आहे. आणि ती व्यक्ती आज आपल्या सोबतच ही रायगड प्रदक्षिणा करणार आहे”. मी पुढे काय बोलणार हे ऐकण्यासाठी सर्वांचे कान टवकारले…
” तो बघा …. तो पोर्णिमेचा चंद्र दिसतोय ना त्याने पाहिले आहे आपल्या राजाला. तो तेव्हाही होता अन आजही आहे. त्याने शिवछत्रपतींना हसताना पाहिले आहे, रागावताना पाहीले आहे आणि जिजाऊ मांसाहेब जेव्हा गेल्या तेव्हा महाराजांना रडतानाही याने पाहिले आहे. आज तोच पोर्णिमेचा चंद्र आपल्यासोबत प्रदक्षिणा करणार आहे. आज त्यालाही आपला हेवा वाटेल असे कार्य आपण करणार आहोत. सर्वांनी त्या पौर्णिमेच्या पुर्ण चंद्राकडे पाहात डोळे मिटले आणि शिवछत्रपतींचे स्मरण करत ‘पुण्यश्लोक छत्रपती श्रीशिवाजी महाराज की जय !’ म्हणत हात जोडले !

टकमकाला वळसा घालून पुढे एका धनगराच्या घरासमोरुन आमचा ताफा निघाला. रात्रीच्या वेळी इतकी लोक अचानक कुठुन आली आणि कुठे चालली आहे हे त्या धनगरांच्या कुत्र्याला समजेना. त्याने त्याचे भुंकणे सुरु केले. त्याचे भुंकणे ऐकून घरधनी आणि त्याची घरधनीण बाहेर आली. आम्ही एवढ्या रात्री कुठं चाललो आहे हे त्यांना सांगत बसण्याचा वेळ नव्हता तरीही त्यांना काहीतरी विचारावं म्हणून घरधनीला विचारलं हे कुठल गाव ? उत्तर आले,  टकमक वाडी

पुन्हा थोडी विश्रांती आणि घोट घोट पाणी पिउन पुन्हा पुढे मार्गक्रमण सुरु झाले. आता मात्र आम्हाला प्रदक्षिणेच्या मार्गाची खरी ओळख होणार होती. बाणाच्या चिन्हाकडे दुर्लक्ष न करता एकामागोमाग एक असे दाट जंगलात शिरलो. निवडुंगाचा खळगा, सातबिणिचा खळगा उजव्या हाताला ठेवून त्या दाट जंगलातून पाय सांभाळत तर कधी आजूबाजूला असणारे काटे संभाळत आम्ही घामाने भिजलेल्या अंगाने भवानी टोकाखाली पोहचलो. नाईक पुंडे सर सर्वांना धीर आणि उत्साह देत होते. पुन्हा घोट ….. नाही …. घोट नाही तर गटागट पाणी पिउन काही वेळ विश्रांती घेउन पुन्हा वाघोली खिंडीकडे आम्ही निघालो.

पुन्हा गच्च जंगलातील वाट. प्रत्येकाकडे टॉर्च होते. माझ्याकडेही टॉर्च होती….. पण आकाशी पुर्ण चंद्र असताना मी टॉर्च वापरणार नव्हतो हे मी पक्क ठरवले होते. पुढच्या आणि मागच्या धारकऱ्याच्या टॉर्चचा प्रकाश मला पुरेसा होता.

रात्री १० च्या सुमारास उभा कडा चढून आम्ही वाघोली खिंडीत पोहचलो. एक एक करत सर्वांनी जागा मिळेल तिथे पाठ टेकवली. घामाच्या धारांनी कपडे भिजले होते. इथे सर्वांनी आराम करून घ्या. आता पुढे मोठा उतार आहे. दोघांच्या मध्ये अंतर ठेवून उतरा. इथे घसरण असल्याने दगडापासून संभाळून रहा. एक घसरला तर पुढच्याला इजा होण्याची दाट शक्यता आहे. विक्रमराव कणसे आणि नाईक पुंडे सरांनी सर्वांना सूचना दिल्या.काही मुलांनी शिवचरित्रावरिल प्रश्न विचारले त्यांची उत्तरे देत असतानाच खिंडीत येणाऱ्या गार वाऱ्याने अंग पुन्हा ताजतवाने झाले.

उतार म्हणजे घसरगुंडीच होती. पाय ठेवल्या ठेवल्या पायाखालची माती घसरत होती. स्वतःला सावरत मागच्याला आवाज देत अंदाजे १०० – २०० फूटाचा उतार उतरून आम्ही काळकाईच्या खळग्याच्या दिशेने निघालो. मध्ये एका सुकलेल्या ओढ्याच्या काठी थोडी विश्रांती घेत शेवटचा टेपाड पार केल्यावर आम्ही रोपवेच्या मार्गावर आलो. आता थांबायचे नाही असे ठरवून सर्व रोपवेच्या दिशेने निघाले.

रोपवेला लागून असलेल्या घरात अविकिरकरांकडे रात्री उठवून पाणी मागितले. पुन्हा चित्त दरवाजाच्या दिशेने प्रवास सुरु केला. रात्री सव्वा एकच्या सुमारास रायगड प्रदक्षिणा पूर्ण झाली. आम्हाला साडे सहा तास लागले ही परिक्रमा पुर्ण करण्यासाठी.

रायगडाकडे पाहून हात जोडले….
कधीकाळी तुला शिवछत्रपतींनी चहूबाजूनी निरखून ‘बहूत बेलाग दुर्ग. तख्तास जागा चखोट’ म्हणाले होते. आज आम्हीही तुला पाहिलं. आता तुझा आणि माझा परिचय पुर्ण झाला….
……. डोळे भरून आले होते.

चित्त दरवाजापाशी सर्वांनी आणलेल्या शिदोरीवर ताव मारला. काही काळ पाठ टेकवली. अन इतक्यात अंगापुरचे धारकरी रात्री दिड वाजता गड चढु लागले. अंगापुरच्या धारकऱ्यात जणू सह्याद्रिच्या वाघाच बळ संचारले होते.मुंबईकर मात्र चित्त दरवाजाशेजारीच झोपण्याची तयारी करत होते….अन मी रात्री २ वाजता मुंबईकरांना आवाज दिला.मी गडावर जातोय तुम्ही आराम करा, पहाटे लवकर या गडावर.  मी गड चढू लागलो…. मागे वळून पाहिले तर …..एक एक करत सर्व मुंबईकर रायगडाच्या पायऱ्या चढत होते…..रायगड प्रदक्षिणा पुर्ण झाली होती…..

– आपला शिवभक्त
बळवंतराव दळवी

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले