आमदाराची धास्ती की पंकजा मुंडेंचा उद्दामपणा ?

अभिजीत दराडे : स्टेज सजला होता, पहाटेपासून गावातील रस्त्यांवर ‘सडा’ टाकण्याची लगबग सुरू होती. गावातील रस्ते रांगोळीने नाहून निघाले होते. ना दसरा, ना दिवाळी, ना पाडवा तरी गावात एखाद्या सणा प्रमाणे चैतन्य होत. सगळी तयारी पूर्ण झाली होती. गावात ही तयारी का सुरू आहे हे बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्यांना काही कळत नव्हतं. पण गावकऱ्यांची लगबग अशी होती की जणू ज्या देवाचा धावा आयुष्यभर केला त्याचा दूत आज आपल्याला भेटायला येणार आहे. गावातील माय माऊली आज आपल्या लेकीला डोळे भरून पाहणार होत्या. होय मी सांगतोय ते अहमदनगर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी टाळलेला वंजारवाडी दौऱ्याबद्दल.

नेवासा तालुक्यातील जेमतेम तीन हजार लोकसंख्या असलेल्या वंजारवाडी गावात पंकजा मुंडे आणि त्या ज्या समाजातून येतात तो समाज दैवत मनात असणाऱ्या भगवान बाबा आणि वामानभाऊ यांचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता. या सप्ताह च्या शेवटच्या दिवशी अर्थात काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हजर राहण्याच आश्वासन दिलं, आणि गावातील प्रत्येक गावकऱ्यांचा अंगात जणू 18 हत्तीचं बळ संचारल असे कामाला लागले. अवघे 2 दिवस आधी पंकजा मुंडेंनी गावात येण्याचं आश्वासन दिल्याने वेळ कमी होता. पण गावकऱ्यांची पंकजा ‘ताई’ आणि गावातील माय माऊलींची ‘लेक’ माहेरला येणार होती. तिच्या पाहुनचारात कोणतीही कमी या गावाला ठेवायची नव्हती, आपल्या ऐपतीच्या कितीतरी अधिक पटीने जय्यत तयारी गावाने केली होती.

सोशल मीडियावर ‘समजू नका कोणी मुलगी आहे. जिजाऊची लेक आहे, बिन भावाची समजायची चूक नका करू लाखो भावात एक बहीण आहे,
होय!
मी माझ्या बहिणी सोबत आहे. पंकजाताई ताकत महाराष्ट्राची’
अशा आशयाचे मेसेज वाऱ्याच्या वेगाने पसरायला सुरवात झाली होती. वातावरण तर असं होतं की आयुष्यभर ज्या नेत्याच्या शब्दाच्या पुढे हे गाव गेलं नाही ते लोकनेते गोपीनाथ मुंडेंच पंकजा मुंनडेंच्या रूपाने गावात येणार आहेत.

योगा योगाने त्याच दिवशी राष्ट्रसंत वामनभाऊ महाराजांची पुण्यतिथी होती. हा दिवस म्हणजे पंकजा मुंडेंसह गावकऱ्यांच्या श्रद्धेचा दिवस. त्यामुळे गावातील तमाम जनता सकाळपासूनच भूक तहान हरपून ताईंची वाट पाहत कार्यक्रम स्थळी जमली होती. गावातील लेकी माहेराला आल्या होत्या. सुवासिनी ताट सजून औक्षण करण्याच्या तयारीत होत्या. कारण लोकनेत्याची लेक आणि गावाची ताई येणार होती. पण माशी शिंकली आणि चैतन्यमय वातावरणात विरजण पडलं. साधारण 4 ते 5 वाजल्याच्या सुमारास हळू आवाजात कुजबुज सुरू झाली ताईंचा दौरा रद्द झालाय.

आता गाव ज्यावेळेस ही तयारी करत होत त्यावेळेस परळी ते अहमदनगर पंकजा मुंडेंचे दौरे होते या काळात नक्की असं काय झालं की हा दौरा रद्द झाला त्यासाठी आपल्याला पंकजा मुंडेंचा सविस्तर दौरा काय होता याकडे पाहवं लागेल. मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे राष्ट्रसंत वामनभाऊंची पुण्यतिथी असल्याने पंकजा मुंडे सर्वात आधी गहिनीनाथ गडावर दर्शनासाठी गेल्या. त्यानंतर भाजप आमदार आणि स्व. राजीव राजळे यांच्या पत्नी मोनिका राजळे यांच्या घरी त्यांची भेट घेण्यासाठी गेल्या आणि शेवटी अहमदनगर येथे महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी त्या पोहचल्या. या सगळ्या दौऱ्यात एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे गहिनीनाथ गडापासून ते अहमदनगर पर्यंत एक व्यक्ती पंकजा मुंडेंच्या बरोबर होती. आणि गावकऱ्यांच ऐकाल तर हीच ती व्यक्ती होती जिने पंकजा मुंडेंना गावात येण्यापासून रोखलं. ही व्यक्ती म्हणजे नेवासा तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे.

आतापर्यंत भावनेत अडकलेला हा दौरा आता राजकीय गलबोटाने व्यथित झाला होता. आणि याच कारण म्हणजे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि जेष्ठ साहित्यीक यशवंतराव गडाख यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त गावकाऱ्यांकडून गडाख यांना देण्यात येणारा ‘समाजभूषण’ पुरस्कार. हा पुरस्कार पंकजा मुंडे यांच्या हस्ते देण्यात येणार होता अर्थात मुंडे आणि गडाख एकाच स्टेजवर हे आमदार मुरकुटे यांच्या राजकीय अस्तित्वाला आव्हान निर्माण करणारे ठरणार होते.

नगरला सक्षम महिला महोत्सव व साईज्योती स्वयंसहायता यात्रा या उपक्रमांतर्गत प्रदर्शनास पंकजा मुंडे यांनी भेट दिली. कार्यक्रम पत्रिकेत दुपारी अडीच वाजता येणार, अशी वेळ दिली होती. तसा शासकीय दौराही निश्चित झाला होता. गहिनीनाथ गडावर सकाळी सुरू होणारा कार्यक्रम उशिरा सुरू झाला. त्यानंतर मुंडे पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे आमदार मोनिका राजळे यांना भेटण्यासाठी गेल्या. तेथे झालेला उशिर लक्षात घेऊन जिल्हा माहिती कार्यालयाने सुधारीत दौरा पाठविला. त्यामध्ये पंकजा मुंडे साडेतीन वाजता नगरला पोचतील असे सांगितले होते. परंतु, तिही वेळ मुंडे यांनी पाळली नाही. त्या नगरला पोचल्या पाच वाजता. हा कार्यक्रम उशिरापर्य़ंत चालला. आणि येथे झालेल्या भाषणात पंकजा मुंडेंचे शब्द होते,

तिथे उपस्थित असलेल्या खासदार दिलीप गांधींकडे पाहत पंकजा म्हणाल्या ”गांधी साहेब, तुम्ही तीन टर्म खासदार आहात. मी कधी वेळेवर आले का ? माझा बाप कधी वेळेवर आला का? आपण म्हणतो ना, तुझ्या बापाला जमलं नाही, तर तुला काय जमनार? त्याचं गुढ मला आता कळलं. माझ्या वडिलांना नाही जमलं, ते का नाही जमलं, ते मला आज कळालं. मी सकाळी वेळेत बाहेर पडले. पोलिसांची गाडी आली नव्हती, सिक्युरिटी नव्हती, तरीही मी माझी गाडी घेऊन सकाळी आठ वाजता निघाले. पण मला येथे तीन वाजता पोचायचे होते, पण मी येथे आले साडेपाच वाजता. पण काय करणार ? लोक प्रत्येक चौकात, प्रत्येक गावात झुंडीच्या झुंडीने थांबून माझा सत्कार करतात. मग त्यांचे फोटो, सेल्फी हे चालू असते. लोकांना नाराज करायचं आमच्या घराला कधी जमलंच नाही कधी’

एकीकडे हे भाषण सुरू होत जिथं पंकजा मुंडे नाराज न करण्याची गोपीनाथ मुंडेंची परंपरा सांगत होत्या तर दुसरीकडे त्यांची चातकासारखी वाट पाहणाऱ्या वंजारवाडीला त्यांनी कायमच नाराज करून त्यांच्यापासून तोडलं होत.

यानंतर आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पंकजा मुंडेंच्या भाषणाचा दाखला देत उशीर झाला त्यामुळे दौरा रद्द झाल्याचं सांगून या प्रकरणात आपले हात वर केले.

तर आयोजक महादेव दराडे हे सांगतात की आमच्या दैवताची लेक आमची ताई गावात येणार होती म्हणून आमच्या ऐपती पेक्षा मोठा लवाजमा गोळा गेला होता. आज या तायरीवर तर फेरलेलं पाणी तर आम्ही सहन करू पण आमच्या डोळ्यात तारलेल्या पाण्याचं काय ? याच उत्तर ना आमदारकडे आहे ना खुद्द पंकजा मुंडेंकडे

गावचे सरपंच कैलास डोळे यांच्याकडे संपर्क साधला असता ते म्हणतात हा कार्यक्रम राजकीय नव्हता सामाजिक आणि भावनिक कार्यक्रम असताना राजकारण करणाऱ्या लोकप्रतिनिधींना याच उत्तर द्यावे लागेल.

तर तालुक्यात हा विषय आता आयत कोलीत मिळाल्याने गडाख गटाने आमदार मुरकुटे यांना कोंडीत पकडून टीकेची झोड उठवली आहे.

या भावनेत अडकलेल्या लोकांना तालुक्याच राजकारण काही कळालं नाही पण लोकनेते गोपीनाथ मुंडे गेल्यापासून ताईच्या भेटीसाठी आसुसलेल्या नजरेत पंकजा मुंडेंनी आजतरी फक्त अश्रूच दिलेत. तायरीवर फेरलेलं पाणी आम्ही पुसू पण आमच्या डोळ्यातील पाण्याचं काय ? असा प्रश्न गावकरी पंकजा मुंडेंना विचारत आहेत. आता ग्रामविकास मंत्री या गावकऱ्यांची आर्त हाक ऐकतील का हा खरा संशोधनाचा विषय आहे.