नीरा डावा-उजवा पाणी नक्की कोणाच्या हक्काचे ?

blank
प्रविण रघुनाथ काळे– मागच्या काही दिवसात नीरा-उजवा डावा कालवा आणि त्याच्या पाण्यावरून बरच राजकारण पेटलेलं दिसत आहे. माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सध्याचे भाजपा आणि पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळायला पाहिजे अशी भूमिका घेतली. बारामतीचे पाणी कमी होणार अशी शक्यता दिसताच शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. एकंदरीत परिस्थिती पाहता येत्या काळात पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात पेटणार हे दिसत आहे. मग प्रश्न आहे. हे पाणी नक्की कोणाच्या हक्काचे ?

पाणी नक्की कुठले ?

पुणे जिल्हातील भाटघर, नीरा-देवधर आणि गुंजवणी या तीन धरणातून पाणी वीर धरणात येवून तिथून ते दोन कालव्यातून इतरत्र पोहचवले जाणार होते. ते दोन कालवे म्हणजे नीरा उजवा आणि नीरा डावा कालवा.

पाणीवाटपाची कायद्यातील तरतूद काय ?

१९५४ साली पाणीवाटपाच्या करारानुसार उजव्या कालव्यातून एकूण पाण्यापैकी ५७ टक्के पाणी साताऱ्यातील फलटण आणि सोलापूर जिल्हातील माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्याला पाणी मिळणार होते. तर डाव्या कालव्यातून ४३ टक्के पाणी बारामती आणि इंदापूर या तालुक्याला मिळणार होते

प्रश्न निर्माण झाला कधी ?

२००७ साली तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मूळ करारात बदल करून नीरा देवधर धरणातले ६० टक्के पाणी बारामती-इंदापूरला आणि उर्वरित ४० टक्के पाणी फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या चार तालुक्याला देण्याचा निर्णय केला. त्यावेळी उजव्या कालव्याच अपूर्ण काम, असं कारण देण्यात आले होते. त्यातही पाणी नेण्यासाठीच जाणीवपूर्वक काम अपूर्ण ठेवण्यात आले, असा देखील आरोप केला जातो आहे. दहा वर्षासाठी केलेला हा करार ३ एप्रिल २०१७ रोजी संपला पण करार संपल्यानंतर देखील पाणी बारामती-इंदापूरला बेकायदेशीररित्या नेले जात आहे. असा आरोप आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून केला जात आहे.

आता चर्चेत येण्याच कारण काय ?

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोलापूर-सातारा जिल्ह्यातील लोकांना हक्काचे पाणी मिळवून देणार असं आश्वासन दिले होते. जिंकून आल्यानंतर नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेवून या पाण्याबाबत निर्णय घेण्याची विनंती केली होती. गिरीश महाजन यांनी देखील पवारच्या राजकारणाला शह देण्यासाठी बारामती-इंदापूर भागात जाणारे ज्यादाचे पाणी बंद करण्याचे आदेश दिले. त्याचा फायदा सोलापूरातील उर्वरित भागाला होणार आहे. पण त्यामुळे बारामती-इंदापूरच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शरद पवार, अजित पवार यांनी निर्णयात बदल होवू नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

नुकतीच लोकसभा संपून गेली आहे, विधानसभा समोर आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यासोबत पाणी प्रश्न पेटत राहणार आहे. पण राजकारणापलीकडे विचार करून पाण्याचा प्रश्न संपवायला हवा, असा विचार देखील करायला हवा. शरद पवारांनी बारामतीला पाणी नेले. पण उर्वरित भागाचा देखील विचार करायला हवा. कारण त्याच माढा मतदारसंघाच प्रतिनिधित्व शरद पवारांनी देखील केलं होते. शेवटी प्रत्येकाला हक्काचं पाणी मिळायला पाहिजे !!