#व्यक्तीविशेष : शंभर आमदारांच्या तोडीचा एकच भिडू.. नाव नामदार बच्चूभाऊ कडू

bacchu-kadu

नेते, आमदार , नामदार म्हटलं की, त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा एक दृष्टिकोन निर्माण झाला आहे. एक समज तयार झाला आहे. पण महाराष्ट्राच्या इतिहासात त्या दृष्टिकोनाला छेद देणारं आणि त्या समजाला गैरसमज ठरवणारं एक व्यक्तिमत्त्व आहे, तसा आगळावेगळा एक आमदार आहे, त्या मातीशी नाळ आणि जनसेवेला आपलं आभाळ समजणाऱ्या माणसाचं नाव म्हणजे ‘नामदार बच्चूभाऊ कडू’

जी माणसं यांना भेटतात, यांची काम करण्याची पद्धत पाहतात, ती माणसं कुणीही असो, कोणत्याही पक्षाची, जातीची, धर्माची, कोणत्याही मतदारसंघाची.. ती माणसं हे सगळं विसरून बच्चूभाऊ कडू यांच्या प्रेमातच पडतात, त्यांची फॅन होतात. कारण संपूर्ण महाराष्ट्राला आपला मतदारसंघ मानून काम करणारा , प्रश्न सोडवणार एकमेव आमदार म्हणजे बच्चूभाऊ कडू.

नामदार बच्चूभाऊ यांचा जन्म ५ जुलै १९७० ला मु. बेलोरा ता.चांदूरबाजार जि.अमरावती या गावी एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. इंदिराबाई कडू व बाबाराव कडू या शेतकरी दाम्पत्याच्या पोटी झाला. एकूण सहा मुले आणि पाच मुली यांमध्ये बच्चूभाऊ हे त्यांचे दहावे अपत्य आहेत. . आई बाबांनी आवडीने मुलाचे नाव "ओमप्रकाश" ठेवले. तर बच्चूभाऊ त्यांच्या मामांचे खूप लाडके, त्या मामांनी भाऊंचे नाव ‘बच्चू’ ठेवले व महाराष्ट्राला हक्काचे ‘बच्चूभाऊ’ मिळाले.

आजोबां पासून घरचा व्यवसाय म्हशी सांभाळून दूध विक्री करणे, हा होता. हा वसा आणि वारसा मिळालेले बच्चूभाऊ कॉलेजला जाऊ लागले आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढणारा एक लढाऊ विद्यार्थी नेता भेटला. कॉलेजात विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणूक बच्चूभाऊ लढले, ती त्यांची पहिली निवडणूक.. आणि तिथे ते ‘विद्यार्थी प्रतिनिधी’ म्हणून निवडून ही आले. पुढे विद्यार्थी जीवन संपल्यावर बच्चूभाऊ शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरू लागले, पण एक नुकतेच ‘कॉलेज संपलेलं नवख पोरगं’ एवढीच त्यांची ओळख जुन्या पुढाऱ्यांना वाटायची.

पण श्वासात आंदोलन भिनलेला हा तरुण शेतकऱ्यांसाठी लढू लागला. त्यावर्षी अमरावती जिल्हा सहकारी बॅंकेने शेतकऱ्यांचे हप्ते थकल्याने त्यांचे ट्रॅक्टर जप्त केल्याच्या प्रकरणात बच्चू कडूंनी आपल्या आगळ्या वेगळ्या आंदोलनाने जिल्ह्याला घाम फोडला. ते आंदोलन होते बॅंकेत ‘सुतळी ॲटमबॉम्ब’ फोडून केलेल्या अभिनव आंदोलन. या तरण्याबांड पोराच्या अनोख्या आंदोलनाने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर परत मिळाले. या घटनेने परिसरात बच्चू कडूंच्या नेतृत्वावर खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब झाले. त्यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव असल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश करुन आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला.

राजकारणात येताच बच्चू कडूंनी आपल्या गावातील ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. घरून मिळालेला सामाजिक कार्याचा वारसा आणि राजकीय ताकद या माध्यमातून त्यांनी समाजहिताची अनेक कामे केली. आपल्या गावासोबतच ते शेजारच्या गावातील लोकांच्याही समस्याही सोडवू लागले. दरम्यान चांदूरबाजार पंचायत समिती निवडणुकीतही बच्चू कडू निवडून आले. थेट सभापती पदावर काम करण्याची त्यांना संधी मिळाली.

त्यावेळी शौचालय योजनेतील एक मोठा भ्रष्टाचार त्यांनी उघडकीस आणल्याने राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न व्हायला लागले. अपंग बांधवांसाठीच्या सायकलींच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाबाबत कुरघोडीचे राजकारण झाले. त्यानंतर स्थानिक नेत्यांशी मतभेद झाल्याने त्यांनी शिवसेना सोडली. अपंग, रुग्ण, विधवा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी त्यांनी प्रहार संघटना काढली. १९९९ साली विधानसभा निवडणुकीत अचलपूर मतदारसंघातून त्यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला.

लोकसभा निवडणुकीतही ते थोडक्यात पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी पाच वर्षे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले, महाराष्ट्रभर गाजलेली अनोखी आंदोलने केली. त्या जोरावर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू प्रचंड मतांनी विजयी झाले. परंतु आपली संघटना राजकारणासाठी नसून समाजकारणासाठी आहे, असा आदेश त्यांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना दिला आणि आपले समाजसेवेचे व्रत चालू ठेवले. २००४ नंतर २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग चार वेळा अपक्ष आमदार म्हणून ते निवडून आले.

#महाराष्ट्र_द्रोही : फडणवीसांचं आंदोलन म्हणजे स्वतःच घर सांभाळेना अन् हे निघाले गावाचा कारभार करायला !

मतदारसंघ, जातपात, धर्म याचा विचार न करता, कोणताही लाभ नसताना नामदार बच्चूभाऊ कडू संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग बंधू भगिनींसाठी जे आमूलाग्र कार्य करतात त्याला तोड नाही. दिव्यांगांच्या प्रश्नासाठी त्यांनी गेल्यावर्षी थेट दिल्लीतील ‘महाराष्ट्र सदन’ च ताब्यात घेतले होते. मग शेवटी त्यांच्या मागण्या मान्य करत केंद्र सरकारलाही नमते घ्यावे लागले. हजारो दिव्यांग त्यांना आपला देव मानतात व त्यांच्या फोटोची पूजा करतात हे एक सत्य आहे. आजच्या महाराष्ट्रात स्वतःचा मतदारसंघ सोडून अखंड राज्यातील जनतेसाठी खास करून दिव्यांग, विधवा, अबला, अनाथ व शेतकरी प्रश्नावर लढणारे आ. बच्चूभाऊ कडू हे एकमेव नेते आहेत.

२०१९ साली लोकसभा निवडणुकीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवा पत्नीला त्यांनी आपल्या प्रहार पक्षाच्या वतीने उमेदवारी देऊन त्यांनी ‘शेतकरी आत्महत्या’ या गंभीर विषयाकडे सर्वांचे लक्ष वेगळ्या व लोकशाही पध्दतीने वेधून घेतले.

2020 साली महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर महाविकास आघाडीचा जन्म झाला व ‘शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस’ यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. आणि यात आनंदाची बाब म्हणजे या सरकार मध्ये शेतकरी पुत्र, दिव्यांगांचा तारणहार बच्चूभाऊ कडू यांना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या मंत्रिपदाची शपथ घेतानाही त्यांनी एक वेगळी छाप सोडली.

आपल्या मंत्रिपदाचा जनतेला पुरेपूर फायदा व्हावा , यासाठी बच्चूभाऊ जीवाचं रान करताना दिसत आहेत. त्यांच्यात कधीच आमदारकीचा, आज मंत्रिपदाचा अविर्भाव किंवा डामडौल दिसला नाही. ते कायम सर्वसामान्यांना, गरिबांना, दिव्यांगांना आपल्यातीलच एक वाटतात. असे नेते महाराष्ट्रासाठी अभिमानाची व गरजेची बाब आहेत.

– जगदिशब्द
(जगदीश ओहोळ हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते, कवी व लेखक आहेत)
संपर्क – 9921878801
jgdishohol@gmail.com

केंद्राच्या पॅकेजमधील फोलपणा फडणवीसांच्या लक्षात आल्याने वेगळ्या पॅकेजची मागणी करतायत : पाटील