मयांक मार्कंडे… मुंबई इंडियन्सचा ‘गेमचेंजर हुकमी एक्का’

Dhoni-Out mayank

दीपक पाठक-  आयपीएलच्या 11व्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली असून दरवर्षी नवीन गुणी क्रिकेटर्स हि स्पर्धा समोर आणते. आज आपण यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी करत असलेल्या अशाच एका गुणी क्रिकेटर्सबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या फिरकीच्या जाळ्यात भल्या भल्या दिग्गज फलंदाजांना अडकविणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या मयांक मार्कंडेविषयी.

२० वर्षांच्या मायांकला लिलावामध्ये फक्त २० लाख रुपयांमध्ये मुंबईने विकत घेतले होते.मयांकने आयपीएलच्या 11व्या हंगामात चेन्नईविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केले. आपल्या पहिल्याच सामन्यात या गोलंदाजाने संधीचे सोने करत 23 रन्सच्या मोबदल्यात 3 विकेट मिळविल्या यात सर्वात महत्वाची विकेट महेंद्रसिंग धोनीची.

काल झालेल्या हैदराबाद सनरायजर्सविरुद्धच्या सामन्यात आपल्या कामगिरीत सातत्य राखत निर्णायक क्षणी त्याने २३ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट्स घेतल्या. या दोन्ही सामन्यात मुंबईला पराभव स्वीकारावा लागला असला तरी या युवा गोलंदाजाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले असून सध्या पर्पल कॅप मयांककडे आहे.

मयांक मार्कंडे हा मूळ भटिंडाचा असून पंजाबच्या अंडर-१९ संघात त्यानं वयाच्या १६व्या वर्षी पदार्पण केलं होतं तसेच २०१६ मध्ये तो १९ वर्षांखालील भारतीय संघाचा सदस्य होता. सर्वसाधारणपणे गुगली बॉल हा टप्पा पडल्यानंतर स्लो होऊन दिशा बदलतो मात्र मयांक ज्यावेळी गुगली बॉल टाकतो त्यावेळी अतिशय वेगात चेंडू आपली दिशा बदलतो.कमालीचा आत्मविश्वास असलेल्या या गोलंदाजाची बॉलवर पकड आणि बॉल स्पिन करण्यावर कमालीचे नियंत्रण आहे. मुंबईचा दोन्ही सामन्यांमध्ये पराभव झाला असला तरी हिरो म्हणून मयांक समोर येत आहे.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मयांकनं पाच विकेट्स मिळवल्या होत्या आणि विजय हजारे ट्रॉफीत बळींचं दशक पूर्ण केलं होतं.या कामगिरीची दखल घेऊन, मुंबई इंडियन्सनं आपल्या संघात दाखल करून घेतलं. याआधी मार्कंडे लिस्ट ए मधील सहा आणि चार स्थानिक टी-२० सामने खेळला होता. त्याच्या गोलंदाजीवर असणारे त्याचे नियंत्रण कमालीचे असून मुंबईचे कोच महेला जयवर्धने त्याच्या या कामगिरीवर प्रचंड खुश आहेत.