#होस्टेल_डेज : वसतिगृहाच्या जीवनात आपण हक्काची माणसं कमावतो

student

स्नेहल सावंत-वसतिगृहात राहणे म्हणजे बेड्या घालणे असा विचार काही लोकांच्या मनात येतो. मग अस वाटतं की घरी राहणं चांगलं. पण या एकट्याच्या प्रवासात भरपुर सामाजिक अनुभव येत असतात. नवीन जग असतं. तिथे आपल्यासाठी सगळं नवीन असतं. आपला एक व्यक्ति म्हणुन मानसिक व सामाजिक दृष्ट्या विकास होतो. आयुष्याचे निर्णय ठरवणे, आजुबाजुच्या वातरणाचा अनुभव घेणे यामुळे आपला बौद्धिक विकासही होतो. आपण मुक्तपणे तेथे रहायला लागतो. चार वेगळ्या ठिकाणच्या, वेगळ्या स्वभावाच्या लोकांबरोबर रहायला आपल्याला कोणताचं त्रास होत नाही. आयुष्यात एकदा तरी वसतिगृहाचा अनुभव घ्यावा. आपण एकटे असताना परिस्तिथी कशा हाताळायच्या, इतरांबरोबर मिळूनमिसळून वागणे, घरून दिलेले पैसे काटकसर करून वापरणे, प्रत्येक चांगल्या वाईट परिस्तिथीशी स्वताला जुळवून घेणे, हे आपण इथेचं शिकतो.

वसतिगृह हा एक आधार असतो दुर्गम भागातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थ्यांसाठी हक्काचे ठिकाण, शिस्त, सहकार्य, मैत्री, दुनियादारी इथं सगळ काही शिकायला मिळतं. वसतिगृहाचे वातावरण ते शिकायला प्रवृत करते. घरापासून लांब चार भिंतींमध्ये, चार नव्या लोकांसोबत राहणं हे सोपं नसतं. आणि त्यात राहण्याची मजा पण वेगळीच असते. रोज आपण नव्या लोकांशी भेटतो. एकमेकांचे अनुभव, ज्ञान, सुख;दुख या सगळ्यांच गोष्टी आपण व्यक्त करतो. आणि त्यासाठी वसतिगृहाच्या जीवनात आपण हक्काची माणसं कमावतो.

एका रूममध्ये ३ बेड, ३ कपाट, 3 खूर्च्या आणि आपल्याबरोबर आपल्या २ रूममेट्स. मी १०वी झाल्यावर पहिल्यांदा वसतिगृहात प्रवेश घेतला. घरापासून दीड तासाच्या अंतरावर असलेल्या महाविद्यालयात मी ११वी विज्ञानसाठी मी प्रवेश घेतला. रोजच्या येण्याजाण्यात भरपुर वेळ जाईल, आणि वाहनांची व्यवस्थित सोय नसल्याने मी त्या महाविद्यालयच्या वसतिगृहात प्रवेश घेतला. जेव्हा पहिलं पाउल ठेवलं तेव्हा शेकडो प्रश्न आणि विचारांची गर्दी माझ्या मनात झाली होती. जवळजवळ पूर्ण दिवस माझ्या मनात भीती साठली होती. घरचे सोडून गेल्यावर मला त्या रूममध्ये घाबरल्यायासारखा वाटू लागलं . काही वेळाने दोन मुली रूम मध्ये आल्या. मग त्यांच्यासोबत थोड्या गप्पा, ओळख झाली. मला तेथे करमत नव्हते पण आपल्याकडे दूसरा पर्याय नाही हे माहीत होते. ते वसतिगृहाचे नियम सुरवातीला ओझं वाटायचे पण नंतर आवडायला लागले. हळूहळू सगळ्यांशी ओळख होत गेली त्यामुळे करमत होत. पण घरी जाण्यासाठी शनिवारची वाट मी नेहमी बघायचे.

सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंतचे सगळं ठरलेलं असायच. नाश्ता, चहा, जेवण, कॉलेज, प्रार्थना, हजेरी हे ठरलेल होत. त्या जेवणाच्या टेबलावरील मस्ती, विनोद, रात्रीच्या उशीरपर्यंत मारलेल्या गप्पा, एकत्र बसुन केलेला अभ्यास सगळं काही आवडु लागलं. रात्रीच जोरजोरात विनोदांवर हसणं आणि गप्पा आणि यामुळे रोज रेक्टरचं ओरडण हे ठरलेलं असायचं. माझ्या बरोबरच्या आणि मोठ्या मैत्रिणी आम्ही सोबत असायचो. माझ्या वसतिगृहात मोबाइल वापरण्यास सक्त मनाई होती. त्यामुळे आमचा जो काही उरलेला वेळ असायचा तो आम्ही एकमेकींना द्यायचो. तिथे मजा, मस्ती बरोबर शिस्तीलाही महत्व दिले जाते. वसतिगृहात येण्या- जाण्याच्या वेळा ठरलेल्या असतात. वेळेच्या बंधनात राहुन जगणं वसतिगृहाच्या आयुष्यात समजतं. रोज घरी ये-जा न करता वसतिगृहात राहुन अभ्यासासाठी वेळ वाचवता येतो. आपली पुस्तक, वह्या नीट ठेवल्यापासुन कपडे, रूम, आरोग्य सर्व काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. आपण आत्मनिर्भर बनण्यासाठीची ही चांगली संधी असते. २ वर्ष खूप आनंदात गेली. वर्षभरात खूप कार्यक्रम कॉलेजबरोबर वसतिगृहात व्हायचे. व्यक्तीमहत्व विकास, स्त्री सुरक्षा, याबद्दलची व्याख्यानांचे कार्यक्रम व्हायचे. स्नेहसंमेलन, नवरात्री, नवीन वर्ष यावेळी नृत्य, गायन स्पर्धा व्हायच्या, या वेळी वसतिगृहातील मुलींना एक व्यासपीठ मिळायचं. विद्यार्थिनी आणि रेक्टर, मेस मधील मॅडम, कामगार, शिपाई याच्यामध्ये चांगला नात निर्माण होत. आपला एक कुटुंब असल्यासारखा वाटायचं. विद्यार्थिमध्येही मैत्रीची भावना, सहानुभूती ठरलेलं असायच.

वसतिगृहातील आठवणीत राहणारे दिवस म्हणजे कॉलेज मधील कार्यकमांवेळी वेशभूषा करण्यासाठी केलेली एकमेकींना मदत, सकाळी लवकर उठून एकमेकीना आवरायला मदत करणे, एकमेकींचा मेक-उप करणे. यावेळी कुटुंबाची कमी कधी वाटलीच नाही ते नवीन कुटुंब तयार झाल होत. परीक्षेच्या वेळी रात्रभर एकत्र बसून चर्चा करून अभ्यास करताना कधी कुणी अभ्यास कर यासाठी बंधन घातलेलं नसायचं  पण एकमेकींच्या सानिध्यात ते होऊन जायचं. मेस मध्ये जेवायला गेल्यावर कधी जेवण कमी पडला असेल तर लगेच आतमध्ये जाऊन पोळपाट लाटनं मुद्दाम वाजवून चपाती बनवणं, तेथील मावश्यांना तुम्ही जरा आराम करा म्हणुन बाजूला बसवणे, हे अनुभव कधी कोणत्या पुस्तकात मिळाले नव्हते ते वसतिगृहाने दिले. मनात आलं तर मेसच्या बाहेर येऊन निवांत हवेला बसून मोकळ्या हवेत जेवणं आणि त्याबरोबर मैत्रिणीसोबत गप्पा स्वप्नात सुद्धा हे जगता येत नाही ते मला तिथे जगायला मिळाल. सीनियर लोकांबरोबर मस्तीसोबत आयुष्याचे धडे शिकायला मिळाले. नेहमी लहान बहिणीसारखं समजून घेणं, गरज पडली तर ओरडनं हे त्यांचं चालूच असायचं. आठवड्यातून एकदा मार्केटमध्ये जायचो बाहेरून खाऊन, फिरून, शॉपिंग करून यायचो. कुणी आजारी असेल तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं. खूप सुंदर जग तिथे पाहिलं .

१२वीच्या परीक्षेआधी निरोप समारंभाची तयारी सुरू झाली. तासनतास ज्या बेडवर, कट्ट्यांवर बसून हसायचो त्यावर बसून एकमेकींजवळ रडलो, पुढे आपली भेट होईल का आपण नंतर भेटू का असे प्रश्न सतावत होते. निरोप समारंभाच्या कार्यक्रमावेळी निशब्ध झालो होतो. काहीचं बोलायच समजत नव्हतं डोळ्यातून प्रत्येक थेंब आठवणी आठवून टपकत होता. एकमेकींचे हात घट्ट पकडून बसलो होतो. भाषण चालू होती. वातावरण नाराज झाल होत सगळेजण मनोगत व्यक्त करत होते. रेक्टर, वसतिगृह प्रमुख, शिपाई, मेस मधील मावश्या, कामगार सगळ्यांशी तयार झालेल नात नेहमी आठवणीत राहण्यासारखा होत. कुटुंब तयार झाल होत परंतु भविष्यासाठी तिथून जाण म्हत्त्वाच होत. आजही त्या ठिकाणी गेली तरी ते झाडाखालचे कट्टे, मेस मधले टेबल, रूम मधले बेड बघितले की पुन्हा त्याच आठवणीत रमून जाव वाटत. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपल्या रेझुमसाठी जितका अनुभव महत्वाचा असतो तितकाच आयुष्याचे धडे गिरवताना वसतिगृहाचा अनुभव देखील महत्वाचा असतो.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या उपचारासाठी लागणारी औषधे केंद्र सरकारने मोफत उपलब्ध करून द्यावीत : नीलम गोऱ्हे

ही बनवाबनवी थांबवून तात्काळ कृती करा ; किरीट सोमय्यांचे राजेश टोपे यांना पत्र

जे विकेल ते पिकेल संकल्पना प्रत्यक्षात आणणार – दादा भुसे

छातीवर दगड ठेवून शासनाला हा निर्णय करावा लागला, मुश्रीफांचे अण्णा हजारेंना उत्तर

‘उद्धव ठाकरे आयोध्येला जाणारच’, राष्ट्रवादीच्या आडकाठीनंतर संजय राऊतांची रोखठोक भूमिका