साहेब माझी आई… रडत-रडत फोन केला अन् उपमुख्यमंत्री मुंडे साहेबांचा ताफा थेट हॉस्पिटलमध्ये धडकला !

Gopinath munde

नेता कसा घडतो यावरआदर्शवादी लिखाण भरपूर वाचायला मिळेल, पण वास्तव हे आहे की सामाजिक जाणीव, सेवाभाव असनारे कार्यकर्ते तयार होतात पण त्यांच्यापैकी कितींचा प्रवास नेते पदापर्यंत होतो? झाला तरी कुठपर्यंत? घराणेशाही च्या तुलनेत हे प्रमाण किती असते? हे सांगायलाच नको.

पण दीनदुबळयांचा शोषीतांचा आवाज, वयोव्रृध्द माणसां पासून ते तरूणांचा आवडता नेता, एका सामान्य कुटुंबात जन्मास येऊन कोटीकोटी जनतेच्या मनावर राज्य करणारे मुंडे साहेब कसे घडले याच्या दन्त कथा ग्रामीण व शहरी महाराष्ट्रात आजही सतत रंगताना दिसतात

त्याच कारण आस असावं की डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला घटना देऊन अधिकार दिले, पण तिचा वापर करून सामान्यांना अधिकार मिळवून देणारा, घटनेचा वापर करून सामन्यांच्या प्रश्नांची सोडवणूक खऱ्या अर्थाने करणारा नेता कोणी होऊन गेला असेल तर ते गोपीनाथजी मुंडे !

सत्ता असो अथवा नसो सदैव जनतेच्या गराड्यात राहणारे, प्रत्येक संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिहिलेले झुंजार नेतृत्व म्हनून गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाचा उल्लेख आवर्जून होतो आणि आजही संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी संकट समयी गोपीनाथराव मुंडेंची आठवण काढतोच !

वंचित, शोषित, पीडितांचे राजकीय पटलावरील एकमात्र आशास्थान म्हनून गेली काही दशक त्यांच्याकडे पाहिलं जायचं याचे काही उदाहरण इथे द्यावी लागतील जी खूप कमी लोकांना माहीत आहेत, नव्हे या गोष्टी साहेबानी कधीच चर्चिल्या नाहीत. मदत करायची पण या कानाची खबर त्या कानाला लागू द्यायची नाही असा शिरस्ताच त्यानी ठरवलेला, अशी हजारो लोक आहेत जे मुंढेसाहेबानीं केलेल्या मदतीचे आजही स्वानुभव सांगत असतात

त्यापैकीच एक प्रसंग आहे, मी उन्हाळ्याच्या सुट्टीत पारगाव या माझ्या अत्त्याच्या गावी गेलेलो. आम्ही तरुण मित्र मंडळी दुकानाच्या दारात उभे राहून चर्चा करत होतो,  मुंडे साहेबांनी 15 वर्ष रखडलेला भगवानगड ते पारगाव रस्ता केला आता भगवानगडावरू सायकलला एक पायडल मारला तर सायकल गावात येते, मोटारसायकल बंद केली तरी गावात येते, पैसे वाचले, जिथं पायी चालणं कठीण होत तिथं कितीतरी त्रास कमी झाला, प्रवास सुकर झाला, आणखी काय असतो विकास ? यावर बोलण चालू होतं हे ऐकून रस्त्यावरून चाललेला नागलवाडी ता. शेवगाव या गावातील तरुण आमच्या जवळ आला काहीही ओळख नसताना स्वतःचा अनुभव सांगण्यास सुरुवात केली.

1997 ला माझी आई खूप आजारी होती मुंबईच्या के. ई. एम. हॉस्पिटल मध्ये दाखल केल होत. 9 दिवस झाले माझ्या आईला बेडही मिळालं नव्हतं, डॉक्टर लक्ष देत नव्हते मी आठ दिवस प्रत्येकाला विनंती करत होतो माझी आई खूप आजारी आहे तिला ट्रिटमेंट ची गरज आहे पण कोणीच ऐकत नव्हतं. दवाखान्यात पेशंट जास्त आहेत, बेड उपलब्ध नाहीत, सर्वच पेशंट सिरीयस आहेत, आम्हाला सर्वांकडे पहायचाय, हवं तर तुम्ही सुसरीकडे घेऊन जा, असे सांगितलं जायचं! आठ दिवस झाले माझी आई व्हरांडयात होती, कुठलंच लक्ष नाही, घरून घेऊन गेलेल्या सतरंजीवर पडून होती.

दुसरीकडे घेऊन जावं तर पैसे नाहीत, होते ते पैसे संपले मी रडायला लागलो,आस वाटलं आता आपली आई वाचू शकत नाही. मला रडताना पाहून एक व्यक्ती जवळ आली आणि माझी चौकशी करू लागली, स्वत:च जेवण मला दिल, फार बर वाटल. माझी व्यथा समजून घेतली त्यातही मला खूप आधार वाटला, मला गाव कुठलं? कुठून आले हे विचारलं. तर त्त्यांना समजेना माझं गाव मग मी सांगितलं माझं गाव नागलवाडी, भागवानगडाच्या पायथ्याला आहे. तो क्षणभर थांबला आणि बोलला तुला एक माणूस मदत करू शकतो तू त्यांना भेट. मी विचारलं कोण? तर ते म्हणाले ग्रामीण भागातून आलेल्या पेशंट ला मदत करतात तू त्यांना भेट त्यांचं नाव होतं ‘गोपीनाथराव मुंडे’ तत्कालीन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री!

मी मनात म्हटलं कस शक्य आहे? मी पहिल्यांदा मुंबईत आलोय मी कुठे जाऊ? कसा भेटू मी त्यांना? एव्हढा मोठा माणूस कसा भेटेल मला? त्यांनी सांगितलं माझ्याकडे त्यांचा फोन नं. आहे तू फक्त फोन करून तर पहा. मला हे शक्य वाटत नव्हतं पण आईची अवस्था पाहून मी ठरवलं एक फोन करू, झाली मदत तर ठीक नसता आईला घेऊन गावाकडे जायचं! शेवटी आपलं नशीब! मी 1रु चे सुट्टे कॉइन घेऊन टेलिफोन बूथ शोधत निघालो.  टेलिफोन बुथवरून फोन डायल केला, फोन लागला मी बोललो मला मुंडे साहेबांशी बोलू द्या नसता माझी आई मरेल! समोरून आवाज आला ‘मी गोपीनाथ मुंडे बोलतोय’ मी क्षणभर थबकलो आणि फक्त रडायला लागलो, मी रडत रडत कस बस माझं नाव सांगितलं गावाचं नाव सांगेपर्यत 3 कॉइन संपले होते, फोन कट झाला! नशीब फुटल्यासारखं वाटलं आणि मी बाजूला जाऊन रडत उभा राहिलो. काही वेळात त्या एस.टी.डी. बूथ वाल्याचा आवाज आला आरे त्या रडणार्या मुलाला बोलवा मुंडे साहेबांचा कॉल आहे. मी धावतच फ़ोन कडे पळालो, साहेबानी मला प्रॉब्लेम विचारला, हॉस्पिटलच, माझ्या आईच नाव विचारून घेतलं आणि मला सांगितलं मी तुझ्या आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये येईल, काळजी करू नको तू बिनधास्त राहा.

हे शब्द ऐकले आणि आनंदाला पारावर नाही राहिला मी क्षणभर विसरून गेलो माझी आई मृत्यूच्या दारात उभीआहे. मी तिथून बाहेर पडलो, थोडं मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं पण परत विचार केला, एव्हढा मोठा माणूस येईल खरच माझ्या आईला भेटायला? म्हटलं ठीक आहे, नाही आले तर नाही आले, पण फोन तरी करावा म्हणजे आईला बेड भेटेल, ट्रीटमेंट तरी चालू होईल.

आईला ज्युस घेऊन जावं म्हणून दुकांन शोधत गेलो, ज्युस घेतला आणि हॉस्पिटल कडे निघालो. साधारण एक तासाचा वेळ गेला असेल, मी परत हॉस्पिटल ला पोहचलो आता जयला लागलो तर पोलिसांनी अडवलं… आत पोलीस चेकिंग चालू आहे थोडा वेळ बाहेर थांबा. पोलीसांच्या गाडया व बॉम्बशोधक पथकाचे कुत्रे संपूर्ण दवाखाना फिरत होते. थोडा वेळ वाट पाहून मला आत सोडलं मी आई झोपली होती त्या व्हरांड्यात गेलो तर आई गायब, मी घाबरलो पुन्हा रडायला लागलो, इकडे तिकडे सैरा वैरा पळत सुटलो, आई काही दिसेना मला संशय आला बॉम्ब शोधक पथक पण आलय काही तरी हॉस्पिटल मध्ये प्रॉब्लेम झालेला दिसतोय पण आता आईला कुठे शोधू? मी नर्स ला विचारु लागलो तर सर्वांची पळापळ चालू माझ्याकडं कोणी लक्ष द्यायला तयार नव्हते. मी एका नर्स मॅडमला विचारलं अहो काय झालंय? माझी आई कुठाय? त्यांनी नाव विचारलं व चौकशी करून सांगतो म्हणून थांबायला सांगितले.

हॉस्पिटलची साफसफाई करायची आहे कोणीमंत्री येणार आहेत म्हणून सर्व हॉस्पिटल सज्ज करण्याचे आदेश डीन सरांनी दिले आहेत. मला काहीच समजेना तो पर्यंत माझं नाव विचारत एक डॉक्टर आले आणि पाहतो तर काय त्यांनी मला एकदम आलिशान ऐ. सी. च्या रूममध्ये घेऊन गेलो, पाहतो तर काय माझ्या आईच्या आजूबाजूला डॉक्टरांचा गराडा पडलेला, सलाईन चालू केलेले, माझ्या आईला स्वच्छ अंघोळ घालून स्पेशल रूम मध्ये शिफ्ट केलेलं . काय अश्चर्य! कालपर्यंत एक नर्सही नीट मला बोलत नव्हती, माझ्या आईकडे डुंकून कोणी पाहत नव्हतं आणि आज डॉक्टरांच्या गराड्यात आई आहे मलाच तिच्यापर्यंत पोहचता येईना ! आनंदाश्रू !

मग मला समजल उपमुख्यमंत्री मुंडे साहेबांचा मुख्य डॉक्टरांना फोन आलेला आणि त्यांनी सांगितले माझ्या भागातील, माझ्या अत्यंत जवळचे पेशेंट ऍडमिट आहेत आणि दुपारी 3.00 वा. साहेब त्यांना भेटायला येणार आहेत. मग समजलं की आपल्या फोन चा हा झालेला परिणाम आहे, साहेब खर्च आस करतील हे मला वाटलं नव्हतं पण हे वास्तव पाहून मी अवाकच झालो. साहेब येतील याची मलाच गॅरंटी नव्हती अन ते डॉक्टर म्हणायला लागले आम्हाला सांगायचं ना साहेब तुमच्या एव्हढे जवळचे आहेत आम्ही मदत केली असता, मनात म्हटलं मला तरी कुठं माहीत होत साहेब माझ्याही एव्हढे जवळचे आहेत!

आता बाहेर जाऊन पाहतोय तर हॉस्पिटलची साफसफाई व दर्शनी भागाची रंगरंगोटी पण चालू झाली होती. सर्व वातावरणच बदलून गेलं होतं, हॉस्पिटल एकदम टकाटक ! ठरल्याप्रमाणे 3 वाजले साहेब आले नव्हते पण व्ही. आई. पी. चा वावर वाढलेला, पोलिसांच्या शिट्ट्यानी परिसर किर्रर्र झालेला आणि 4.00 वाजता साहेबांचा गाड्यांचा ताफा हॉस्पिटल परिसरात घुसला..! साहेब थेट आईकडे भेटायला आले, आईची चौकशी केली, मोठ्या आवाजात सांगितलं तुम्हाला आता काहीही होणार नाही हे हॉस्पिटल नामांकित आहे, डॉक्टर फार हुशार आहेत, आता तुम्ही इथून बरे होऊनच जाणार! मला घेऊन मुख्य डॉक्टरांच्या केबिनला गेले, डॉक्टरांना सांगितलं काय पैसे लागले तर मला मागा पण पेशंट चांगलं झालं पाहिजे, या पोराला काही त्रास देऊ नका आणि 10 मिनिटात साहेब भेट देऊन निघूनही गेले. त्या 10 मिनिटांनी मला आणि हॉस्पिटलला ही सुखद धक्काच!

दुसरा प्रसंग असाच आहे 2002 चा, बीड जिल्ह्यातील एक गरीब घरातील होतकरू, हुशार मुलगा नामांकित ‘वेलींगकर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट’ ला मेरिट वर एम. बी. ए. ला नंबर लागलेला पण घरची परिस्थिती हलाकीची फिस भरायला पैसे नाहीत, गावात, नातेवाईकांना सर्वाना विचारून झालं पण पैसे काही अरेंज होईनात. जमीन विक्रीस काढली पण भावकी जमिनीची किंमत पाडून मागायला लागली. काहीच होत नाही हे पाहून तो एक दिवस अगोदर सरळ मुंबईत कॉलेजला पोहचला. कॉलेजला विनंती केली पण त्याकाळी एम. बी. ए. ची क्रेझ होतीच, चांगलं डोनेशन असायच मग ते ही फारस सहकार्य करेणात.

मग शेवटचा पर्याय म्हणून संध्याकाळी वरळीला मुंडे साहेबांच्या सुखदाच्या ऑफिस वर तो गेला, बरेच लोक वेटिंग वर होतें. त्याचाही नंबर आला, त्याने कहाणी सांगितली व उद्या शेवटची तारीख आहे फिस भरली नाही तर ऍडमिशन हातची जाईल हे सांगितलं. त्याच वेळेला आणखी एक व्यक्ती तिथे आलेले आणि त्यांच्या पाल्ल्याला ऍडमिशन पाहिजे होते डोनेशन द्यायची तयारी आहे पण साहेबाची शिफारस पाहिजे म्हणून फोन लावण्याचा आग्रह करत होते.

साहेबानी त्यांना विचारलं मेरिट आहे का? उत्तर होत नाही पण तुम्ही बोललात तर मॅनेजमेंट कोटामधून ऍडमिशन मिळेल व डोनेशनची तयारी असल्याचं त्यांनीं सांगितलं. साहेबांनी लगेच त्या मुलाला उभं केलं आणि सांगितलं पहा एका साईडला हा मेरिटवर नंबर लागलाय पण गरिबी मूळे पैसे भरू शकत नाही आणि तुमच्याकडे पैसे आहेत पण मेरिट नाही, सांगा आता मी दोघांपैकी कोणाची मदत करू? सर्वांसमोरच विचारलं, त्या व्यक्तीने सांगितलं साहेब त्या गरीब होतकरु मुलालाच मदत करा!

लगेच साहेबानी सांगितलं उद्या 3 वाजण्याच्या पहिले तुझी फिस भरली जाईल काही अडचण असली तर.मला फोन कर मो. नं. दिला आणि त्यांचे सहायक सुनील राणे यांना सांगितलं यांचे पूर्ण डिटेल्स घ्या. दुसऱ्या दिवशी तो विद्यार्थी कॉलेजवर गेला 3.00 वा. ऍडमिशन राउंड संपणार होता, 2.30 झाले, फिस नाही तर ऍडमिशन जाणार आणखी काहीच हालचाल नव्हती. म्हणून तो साहेबांना फोन करण्यासाठी टेलीफ़ोन बुथवर गेला, सहेबांना सांगितलं तर म्हणाले माझा माणूस येऊन तुझी फिस भरून जाइल तो पोहचेलच.

आता 2.40 झालेले तो मुलगा अस्वस्थ झालेला परत कॉलेजकडे गेलेला तर कॉलेजचे संचालक साळुंखे सर विष्णू कोण आहे म्हणून विचारत बाहेर आलेले. जाऊन पाहतोय तर काय साहेबांचा माणूस येऊन कॉलेज ची फिस भरून गेलेला. ही होती मुंडे साहेबांची सर्वसामान्य, अडचणीत सापडलेल्या माणसाला मदत करण्याची व कुठेही त्याचा गाजावाजा न करण्याची काम करण्याची पद्धत!

हे झालं फक्त उदाहरणादाखल पण असे कितीतरी प्रसंग, घटना महाराष्ट्रभर चर्चिल्या जातात पण दुर्दैवाने आशा सर्व प्रसंग एकत्रित करून त्याच पुस्तक रुपात मांडणी झालेली नाही, हे झालं तर खरच जनसामान्य जनता मुंडे साहेबांवर का एव्हढ प्रेम करत होती, हा महाराष्ट्राचा लोकप्रिय लोकनेता कसा घडला हे समजून घेणं व सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणारांसाठी याचा निश्चितच खूप चांगलं उपयोग होईल.

साहेबांना, सामन्याच्या व विशेषतः ग्रामीण प्रश्नांची जाण होती. कामाचा आवका खुप मोठा होता आणि अशातघ 2014 ला देशाचे ग्रामविकास मंत्री म्हणून आवडत खातही त्याना मिळालं होतं, बीड जिल्हा तर देशातील ग्रामीण विकासच रोल मॉडेल बनविण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला होता. पुढची 5 वर्ष त्यांना मिळाली असती तर नक्कीच त्यांनी विकास कामांचा झपाटा दाखवला असता आश्या बहुतांश लोकांच्या अपेक्षा होत्या, पण दुर्दैवाने ते स्वप्न हे स्वप्नच राहील!

आयुष्याच्या परमोच्च क्षणाला जाऊन त्यांनी एक्झिट घेतली हे त्यांच्या लाखो चाहत्यांना आजही सहन होत नाही. म्हणूनच आज सहा वर्षे झाली मुंढेसाहेबांना जाऊन पण महाराष्ट्रातील नेते, कार्यकर्ते व जनता त्यांची प्रत्येक प्रसंगात आठवण काढल्याशिवाय राहात नाही म्हणूनच सर्व म्हणतात "असा लोकनेता होने नाही !

डॉ. रवींद्र खेडकर,
डिजिटल कंम्युनिकेशन एक्स्पर्ट व राजकीय अन्यालिस्ट
पुणे.