आगरकरांचे हिंदू-मुस्लिम संबंधावरील विचार

गोपाळ गणेश आगरकर थोर समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. आधी समाजसुधारणा की आधी राजकीय स्वातंत्र्य हा टिळक-आगरकर वादही प्रसिद्ध आहे. आगरकरांची समाजसुधारणा त्यांच्या बुद्धीप्रामाण्यवादातून आली होती; ‘हिंदू-मुस्लिम संबंध’ ह्याविषयावर आपले विचार मांडताना त्यांनी हाच बुद्धीप्रामाण्यवाद उपयोगात आणल्यामुळे ते विचारही समाजसुधारणे इतकेच जहाल होते.

‘हे विचारीपणाचे कृत्य नव्हे’ ह्या लेखात आगरकर म्हणतात,’हिंदुस्थानच्या तीस कोटी प्रजेत सहा कोटी मुसलमान आणि चोवीस कोटी हिंदू असतील तर त्यांना त्या मानाने कौन्सिलात प्रतिनिधी निवडण्याचे हक्क मिळतील. दोघांचीही संख्या सारखी असणे ही बरोबरी नव्हे.'(पृष्ठ ३२४) म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात हिंदू-मुस्लिमांना कौन्सिल प्रतिनिधीत्व द्यावयास आगरकर तयार होते पण समसमान प्रतिनिधीत्वाला त्यांचा विरोध होता. तसेच त्याच लेखात हेही स्पष्ट करतात की,’हिंदुस्थानचे राज्य इंग्रजांनी मुसलमानांपासून घेतले हे म्हणणे बरोबर नाही. रजपूत, मराठे व शीख यांनी इंग्रज येण्यापूर्वी मुसलमानांची बादशाही जमीनदोस्त केली होती’. (पृष्ठ ३२४)

Loading...

इंग्रजी विद्या हिंदूंनी त्वरित आत्मसात केल्यामुळे त्यांना मोठमोठ्या सरकारी जागा मिळाल्या व मुसलमानांनी ती तितक्या प्रमाणात आत्मसात न केल्यामुळे ते सरकारी पदापासून वंचित राहिले. त्यावर एच. एम. इस्माइलखान सारख्या काहींनी आमच्यावर अन्याय होत आहे अशा आशयाचे पत्र ‘लंडन टाइम्स’ मध्ये लिहिले, त्यावर आगरकरांनी पुढीलप्रमाणे सणसणीत उत्तर दिले होते, ‘अगदी अक्षरशत्रू लोकांस सरकार मोठमोठ्या जागांवर नेमीत नाही, ही सरकारची चूक आहे काय? तुम्ही शूर आहा, तुम्ही स्वधर्माभिमानी आहा, तुम्ही एकदा या देशाचे सार्वभौम राजे होता- हे सारे खरे आहे. पण तुमची तलवार, तुमचे कुराण, किंवा तुम्ही पूर्वी उपभोगलेले मोठमोठे अधिकार आजमितीस रेव्हिन्यू कमिशनरच्या दप्तरदाराचे, ओरिएंटल ट्रान्सलेटरचे, मेडिकल कॉलेजातील ऍनॅटमीच्या प्रोफेसराचे, केमिकल ऍनलायझरचे अथवा एखाद्या ठिकाणच्या सिव्हिल सर्जनचे काम हातून चांगल्या रीतीने निभण्यास कसे उपयोगी पडणार?’…..‘तुम्हाला विद्येची अभिरूची लागेतोपर्यंत आम्ही हात जोडून स्वस्थ बसावे की काय?’….‘अडाण्यांनी आपणांस ज्ञान प्राप्त होईतोपर्यंत कोणीही ज्ञान प्राप्त करून घेऊ नये असा आग्रह धरला तर अज्ञानाचा निरास कधीही होणार नाही’.(पृष्ठ ३२६) येथे आगरकरांनी मुसलमानांच्या मागासलेपणाची अचूक मीमांसा केली आहे.

आगरकरांनी हिंदू-मुस्लिम दोघांनाही पुढीलप्रमाणे समंजसपणाचा सल्ला दिला आहे. ‘तुम्ही उभयतांनी सख्ख्या भावांप्रमाणे वागण्यातच तुमचे कल्याण आहे’.(पृष्ठ ३२६) व ‘ज्याप्रमाणे पूर्व वैभवाचे स्मरण करून मुसलमानांनी आजमितीस शेखी मिरविण्यात अथवा हिंदूंशी अरेरावी करण्यात अर्थ नाही, त्याप्रमाणेच मुसलमानांनी पूर्वी केलेली अनन्वित कृत्ये आज ध्यानात आणून हिंदूंनी त्यांचा द्वेष करण्यांत किंवा त्यांना खिजवण्यात शहाणपण नाही.’(पृष्ठ ३०९)

१८९३-९४च्या हिंदू-मुस्लिम दंगलींसाठी राष्ट्रसभा व गोरक्षण चळवळीला कारणीभूत ठरवण्यात आल्यावर आगरकरांनी ‘हिंदूत व मुसलमानांत तंटे का होतात?’ ह्या लेखातून टिळक व गोखल्यांप्रमाणे ठामपणे हिंदूंची बाजू घेतली. ‘ज्याप्रमाणे पूर्वी तयार करून ठेवलेल्या सुरूंगात ठिणगीचे अखेरीस निमित्तमात्र कारण लागते त्याप्रमाणे स्वाभाविक कारणांमुळे ज्या लोकांची एकमेकांशी भांडणाची सर्वदा तयारी असते अशा लोकांसच गोरक्षणासारखी शुष्क कारणे पुढे करून भांडणाचा उपक्रम करता येतो. गोरक्षण हे या भांडणाच्या मुळाशी असेल तर त्याची चळवळ होऊ लागण्यापूर्वी मुसलमानांत व हिंदूंत तंटे का होत होते?…. तेथे (मुंबईला) मुसलमानांकडून प्रथम आगळीक घडली व निरूपायास्तव हिंदूंना दुसरे दिवशी भांडणात पडावे लागले असे दिसते…..तात्पर्य, हिंदूंचे व मुसलमानांचे अलिकडील तंटे पुरातन कारणांमुळेच होत असावे आणि राष्ट्रसभा व गोरक्षण वगैरे चळवळींशी त्यांचा काही एक संबंध नसावा असे आमच्या अल्प समजुतीस वाटते.'(पृष्ठ ३१३-३१४)

‘रास्त गोष्टीस भितो कोण?’ या लेखात आगरकर म्हणतात,’हिंदू मुसलमानांचे तंटे होण्यास शेकडो कारणे आहेत, हे ठाऊक असून गोरक्षणासारख्या एखाद्या चळवळींशी जाणूनबुजून त्यांचा सारा संबंध लावून देणे हे अत्यंत गर्हणीय कृत्य होय. अशा वर्तनामुळे हे तंटे कमी न होता उलटे अधिक होत जाण्याचा संभव आहे………हिंदू लोकांस आपण पादाक्रांत करून चारपांचशे वर्षे त्यांवर सार्वभौम सत्ता गाजविली इतकेच नाही, तर त्या अवकाशांत त्यांना अनेक प्रकारे छळले. तेव्हा जर करता पुढे मागे हिंदू लोकांची हिंदुस्थानात सरशी होईल तर ते आपल्या दुष्कृत्यांबद्दल आपला सूड उगवतील अशी शंका मनात येऊन आम्हांस ज्या गोष्टी इष्ट वाटतात त्यांना ते आडवे येत असावे; याशिवाय ते आमच्या राजकीय चळवळीस जो अडथळा करतात त्यांचे काय कारण देता येईल कोण जाणे, साऱ्याच मुसलमानांचे विचार किंवा वर्तन अशा तऱ्हेचे आहे असे आम्ही म्हणत नाही; पण बहुतेकांचे तसे आहे हे निर्विवाद आहे. पण आमच्या मनांत त्या लोकांविषयी तसा पीळ राहिलेला नाही. वास्तविक पाहता हिंदूंना मुसलमानांबद्दल खरे बंधुप्रेम उत्पन्न व्हावे हे काही अंशी अशक्य आहे; कारण व्यवहारातील शेकडो गोष्टीत यांचे त्यांच्याशी पटत नाही.(पृष्ठ ३४१-३४२) हा लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे.

हिंदू-मुस्लिम ऐक्यात नेहमी हिंदूंनाच ऐक्य करण्यासाठी पुढाकार घेण्यास वा नमते घेण्यास सांगितले जायचे अशावेळी आगरकरांचे पुढील प्रतिपादन आगरकरांचा नि:पक्ष बुद्धीवाद सिद्ध करतो ‘मुसलमान लोकांचा खरा तरणोपाय हिंदू लोकांशी एकमत करण्यात आणि जोडीचे ज्ञान, संपत्ती व राजकीय हक्क संपादण्यात आहे, असे आम्हांस वाटते.'(पृष्ठ ३२४)

‘सुशिक्षित हिंदूंनी हिंदू लोकांच्या हक्कासाठी भांडावयाचे नाही तर कोणी भांडावयाचे?’(पृष्ठ ३२६) असा थेट प्रश्न करणारे आगरकर हिंदूविरोधकांना अंर्तमुख होण्यास भाग पाडतात.

आगरकरांचे हिंदू-मुस्लिम संबंधावरील विवेचन थोडक्यात असे करता येईल की, हिंदू-मुस्लिम ऐक्य हे मुसलमानांच्याच हिताचे आहे त्यामुळे मुसलमानांनीच हिंदूसोबत ऐक्यासाठी पुढाकार घ्यावा. भौतिकदृष्ट्या हिंदू प्रगत व मुसलमान अप्रगत आहेत हा हिंदूंचा दोष नाही त्यामुळे त्यासाठी हिंदूंना दोषी धरून स्वतःच्या मागासलेपणासाठी ब्रिटिशांशी युती करून राजकीय सवलती मागू नयेत. मुसलमानांनी शिक्षण, विवेकवाद व ज्ञानाची कास धरावी कारण त्यामुळे मुसलमानांची हिंदूंवर्चस्वाची भिती आपोआपच नाहीशी होण्यास व हिंदूसोबत गुण्यागोविंदाने राहण्यास सहाय्य होईल.

बुद्धीवादी आगरकर हिंदुत्ववादी असूच शकत नाही ही सेक्युलर अंधश्रद्धा समग्र आगरकर वाचल्यावर सहज दूर होते.

  • – अक्षय जोग

संदर्भः

आगरकर-वाडमय- खंड २, संपादक- म.गं. नातू व दि.य. देशपांडे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई प्रकाशन, १९८५, ऑनलाईन आवृत्ती
©2017 Akshay Jog

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!