आम्ही तर चावट विचारांचे पाईक, दिसली बाई की कर लाईक !

टीम महाराष्ट्र देशा : सुरवातीच्या काळापासूनच तमाशा ,यात्रा, सांस्कृतिक कला केंद्र अश्या ठिकाणी आंबट शौकीन लोकांचा राबता असायचा. मग त्याला अनेक सन्माननिय ही अपवाद राहिले नाहीत. त्यातल्या काहीची तर दिवसा वारीला अन रात्री बारीला अशी गत असायची.बाहेरून कीर्तन अन आतून तमाशा या प्रकारात मोडणारी ही मंडळी भलतीच आंबट शौकीन असायची. त्यातूनच मग पुढे बाई नाचवने, घुंगरू वाजवणे, वेगवेगळे फड असायचे, ( डान्स बार हे त्याचं अद्यावत मॉडेल होतं ) जुन्या काळात त्यातली एखादी बाई आवडलीच तर तिच्या सोबत लग्न करणे किंवा तशीच ठेऊन घेण्याचे प्रकार घडायचे त्याला ‘बाई ठेवली’ असं म्हटलं जायचं. बाई वाड्यावर या !! हा तो कालखंड होता.

हळूहळू काळाच्या ओघात असल्या काही प्रथा बंद झाल्या, बंद केल्या अन काही मोडकळीस आल्या आहेत. परंतु आंबट शौकिनांची संख्या मात्र कमी झालेली दिसत नाही. ऊलट बाई पाहून लगट करण्याच्या प्रकारामधे वाढ झालेली दिसतेय. अर्थात असल्या काही प्रकारात महिला ही अग्रेसर आहेत. पण त्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे.

त्यातुलनेत स्त्रीलंपट असणाऱ्या, लाळ घोटेपणा करणाऱ्या पुरुषांची संख्या कमालीची जास्त आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडिया सारखं प्रभावी माध्यम उपलब्ध झाल्याने आंबट शौकिनांचा मोर्चा इकडे वळला आहे. नको त्या कारणाने किंवा काही कारण नसतानाही अनेकजण हे ओळखीच्या अन अनोळखी ही स्त्रियांसोबत सलगी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यात पुन्हा ती मुलगी किंवा महिला सुंदर असेल तर यात कैक पटीने वाढ होताना दिसतेय.

एखाद्या स्त्री ने साधा फोटो, स्टेटस,पोस्ट अपलोड केली तरी त्याखाली हजारो लाईक अन कमेंट चा पाऊस पडताना दिसतो. नाईस पासून ऑसम पर्यंत नको नको त्या गोड गुलाबी शब्दांंचा भेदक मारा केला जातो. त्यात पुन्हा सोशल मीडियावर वेळवेगळ्या ईमेज ची उपलब्धता असल्याने त्यात कृत्रीम जिवंतपणा आणला जातो. एरव्ही इतर महत्वपूर्ण गोष्टीकडे ही ढुंकूनही न पाहणाऱ्या तथाकथित प्रतिष्टीत लोकांचा सुद्धा यात सिंहाचा वाटा असतो.

सोशल मीडिया वर एखादी महिला तुमच्या पोस्ट ,स्टेटस लाईक करते म्हणजे ती तुम्हाला लाईक करते असा अर्थ होत नाही. ती त्या विचारला लाईक करत असते. त्यामुळे महिलेने मित्र विनंती स्वीकारली अथवा पाठवली,लाईक,कमेंट केली तर त्याकडे फक्त आभासी अन स्वच्छ मैंंत्रीच्या दृष्टीने पहावे. तिला तुमच्यात स्वारस्य आहे असं होत नाही. वरवर काही प्रतिष्ठित वाटणारे व्यक्ती ही, वॉल वर महिलांचा सन्मान करताना दिसतात परंतु इनबॉक्स मध्ये जाऊन त्यांच्याशी जवळीक साधण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो.

घरी आपली बायको उपाशी झोपली तरी यांना कल्पना नसते मात्र पर-स्त्रीच्या इनबॉक्सात जाऊन जेवण झाले का ?? या राष्ट्रीय प्रश्नासह Hi, Hello, Nice DP, गुड मॉर्निंग, गुड नाईट, कशी आहेस, यासारख्या दळभद्री msg चा मारा केला जातो.त्या महिलांच्या घरच्या लोकांना नसेल एवढी काळजी हे आदरणीय करतात. त्यामुळे काही महिलांना तर इनबॉक्सात येऊ नये, फ्लर्ट करू नये, चॅटिंग करू नये, अश्या सूचना अधूनमधून द्याव्या लागतात.काहींच्या खऱ्या, आभासी प्रतिमेला काही महिला ह्या भुलतात देखील. यातूनच अनेक फसवणूकचे प्रकार घडले असून, देखील अश्या गंभीर प्रकरणांची संख्या वाढत आहे. त्यात पुन्हा विविध प्रकारचे फेक अकाउंट काढून नको ते उद्योग करण्याऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.

सोशल मीडियाचे अनेक फायदे ही आहेत पण अश्या गोष्टीकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. यावर येणाऱ्या बातम्या, लेख याला कुठलीही अधिकृतता अद्याप नाही. सोशल मीडियावरून मित्र होऊ शकतात. बऱ्याच गोष्टीची देवाण-घेवाण होऊ शकते. काहींना प्रेम देखील होऊ शकतं पण त्या खऱ्या प्रेमाचं प्रमाण अत्यंत कमी असून लफडेखोर वृत्तीचं प्रमाण लक्षणीय आहे.

अलिकडच्या काळात हनी ट्रॅप करणाऱ्या, आर्थिक, मानसिक, शारीरिक छळ व फसवाफसवी करणाऱ्या टोळ्याच्या टोळ्या इकडे सक्रिय झाल्या आहेत. ( तो लेखनाचा स्वतंत्र विषय होईल ) त्यामुळे या माध्यमावर सगळ्या खाजगी गोष्टी शेअर न करता प्रत्येकानेच व खासकरून महिलांनी या माध्यमाचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे.

– चांगदेव गिते

सरकार ‘मोदीं’चेच; संसदेतील अविश्वास दर्शक ठराव भाजपने जिंकला

मिठाई खरेदी-विक्री करताना खबरदारी घेण्याचे आवाहन