मुख्यमंत्री ठाकरे झुंजार प्रा.रविंद्र गायकवाड यांचे राजकीय पुनर्वसन करणार का ?

ravindra gaikwad

प्रदीप मुरमे : १९९० च्या दशकातील शिवसेनेमधील एक झंझावात व मराठवाड्यातील एक अत्यंत लोकप्रिय आमदार म्हणजे उमरगा-लोहारा विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रा.रविंद्र गायकवाड होय.शिवसैनिक ज्यांना ‘सर’ या नावाने संबोधतात. सन.१९९५ च्या विधानसभा निवडणूकीत प्रा.रविंद्र गायकवाड हे शिवसेनेकडून प्रथमच आमदार म्हणून निवडून आले.जबरदस्त वकृत्वशैली,अवीट वाणी व तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांशी असलेला प्रचंड संपर्क याबळावर त्यावेळी ते आमदार झाले होते.

त्यानंतर किल्लारी सहकारी साखर कारखान्यावर ते प्रशासक म्हणून गेले.प्रशासकीय काळात त्यांनी आर्थिक डबघाईला आलेल्या या किल्लारी कारखान्याला कमालीची शिस्त लावल्यामुळे कारखान्याच्या सभासदांचा त्यांनी मोठा विश्वास संपादन केला.त्यांतर झालेल्या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत त्यांच्या नेतृत्वाखालील नलने प्रस्थापित नेत्यांच्या नेतृत्वाखालील पॕनलचा दारुण पराभव करुन अभूतपूर्व यश संपादन करुन सहकार क्षेत्रात शिवसेनेने शिरकाव करुन विक्रम प्रस्थापित केला होता.सुरुवातीचे काही वर्षे या कारखान्याचा चांगला कारभार करुन त्यांनी कारखान्याला अनेक पारितोषके मिळवून दिली होती.परंतु शेवटी त्यांची कारखान्याच्या कारभारावरील पकड सैल झाली होती हे देखील तेवढेच खरे. त्यानंतर झालेल्या १९९९ च्या निवडणूकीत ते पराभूत झाले.परंतु या पराभवाने ते अजिबात खचून न जाता मतदारसंघातील आपला संपर्क कायम ठेवला.

२००४ च्या विधानसभा निवडणूकीत ते दुस-यांदा आमदार झाले.२००९ च्या निवडणूकीत उमरगा विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्याने प्रा.गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे नेते डाॅॅ.पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात लोकसभा लढली.त्या निवडणूकीत ते पराभूत झाले.२०१४ च्या निवडणूकीत प्रा.गायकवाड यांनी डाॅॅ.पाटील यांना पराभूत करुन मागील निवडणूकीतील आपल्या पराभवाचा वचपा काढला .प्रा.गायकवाड हे स्वतः आमदार व खासदार झाले.परंतु त्याचबरोबर कल्पना नरहरे यांना उस्मानाबाद मतदारसंघ राखीव असताना खासदार केले. ज्ञानेश्वर पाटील,कल्पना नरहरे,ज्ञानराज चौगुले,दिनकर माने या सारख्या सामान्य शिवसैनिकांना मोठे बळ देवून आमदार करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान सर्वश्रूतच आहे.त्यामुळे साहजिकच शिवसेनेमध्ये प्रा.गायकवाड रुपी नेतृत्वाचा मोठा दबदबा निर्माण झाला.

कांद्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूत करणाऱ्या महामूर्खाला शोधलं पाहिजे – बच्चू कडू

ऐवढेच नव्हे तर प्रा.गायकवाड म्हणजे शिवसेना व शिवसेना म्हणजेच गायकवाड असे मराठवाड्यातील शिवसेनेच्या गोटात जणू एक समीकरणच बनले होते!परंतु २०१४ मध्ये प्रा.गायकवाड खासदार झाल्यानंतर मात्र नेमके कोठे माशी शिंकली हे माहीत नाही. प्रा.गायकवाड यांचा या मतदारसंघातील संपर्क कमी झाल्याच्या अनेक तक्रारी ऐकू येवू लागल्या.मतदारांचाच संपर्क नव्हे तर सतत कार्यकर्त्यांचा गराड्यात वावरणा-या नेत्याचा जिवाभावाच्या कार्यकर्त्यांशी असलेली अतूट नाळ देखील तुटल्याचा आरोप दरम्यानच्या काळात राजकीय जाणकारांकडून वेळोवेळी झाला.

त्यातच काही माध्यमांकडून प्रा.गायकवाड यांची ‘नाॅॅट रिचेबल खासदार’ अशी छबी उभी करण्यात आली होती.याचाही मोठा फटका खा.गायकवाड यांना बसला.परिणामी २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत प्रा.गायकवाड हे विद्यमान खासदार असतानाही शिवसेनेकडून त्यांच्या नावाचा विचार झाला नाही तर त्यांच्या उमेदवारीचा पत्ता कट करुन प्रा.गायकवाड यांच्या सारख्या अभ्यासू व जेष्ठ नेतृवाला निवडणूकीत जोरदार राजकीय धक्का दिला गेला.प्रा.गायकवाड यांचे समर्थक मात्र आपल्या नेत्याचा मतदारसंघातील संपर्क कमी झाला होता ही बाब मान्य करायला कदापि तयार नाहीत. प्रा.गायकवाड यांचे शिवसेनेतील वाढते प्राबल्य सहन न झाल्यामुळे त्यांच्याविरोधात मातोश्रीवर खोट्या – नाट्या तक्रारी करुन पक्षांतर्गत कुरघोडी करुन प्रा.गायकवाड यांचे तिकीट कापण्यात आल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांमधून केला जात आहे.

‘धनु भाऊ आता तुम्हीच आमचे माय बाप’ म्हणत पीडितांनी फोडला टाहो…

एकुणच मागील लोकसभा निवडणूकीत प्रा.गायकवाड यांचे तिकीट कापून पक्षश्रेष्ठीने एका हाडाच्या शिवसैनिकावर मोठा अन्याय केल्याची सल उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक शिवसैनिकांमधून व्यक्त केली जात आहे.प्रा.गायकवाड यांची उमेदवारी कापली जात असताना पक्षाकडून आपल्यावर अन्याय केला जाणार नाही.योग्यवेळी आपल्या नेतृत्वाचा निश्चितच सन्मान केला जाईल असा शब्द शिवसेनेचे सर्वेसर्वा दस्तूरखुद्द उध्दव ठाकरे यांनी प्रा.गायकवाड यांना दिला होता. सुदैवाने आज राज्यामध्ये उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार आहे.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे प्रा.गायकवाड यांचे राजकीय पुनर्वसन करुन लोकसभा निवडणूकी दरम्यान दिलेला शब्द पाळणार का ? याबाबत उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील शिवसैनिकामध्ये कमालीचे औत्सुक्य लागून राहिले आहे,हे मात्र निश्चित!

रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांसह अजित पवार यांच्यावरही केलं भाष्य म्हणाले…