शिक्षण विनोदाच्या नाही तर शिक्षकांच्याच विखुरलेल्या नेतृत्वाच्या तावडीत अडकलयं….!

प्राजक्त झावरे पाटील/मुंबई :- आजपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे, त्यानिमित्ताने सर्व शिक्षकांना पहिल्या प्रथम एकाच बळकट छत्राखाली संघटित होण्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा ….!

भारताचे नागरिक घडवण्याची सर्वात महत्वाची जबाबदारी शिक्षकांवर आहे. भारतीय लोककल्याणकारी राज्याचा अतिशय महत्वाचा खांब म्हणून शिक्षण व्यवस्थेकडे पाहिले जाते. या शिक्षण व्यवस्थेला गरिमा मिळवून देणारा महत्वाचा घटक म्हणजे शिक्षक होय. शिक्षकांच्या बळावर उज्वल भवितव्याची स्वप्नं देश पाहत असताना हा शिक्षक त्याच्याच विविध प्रश्नांनी बेजार झाला आहे. सर्वच बाजूने वेढला गेलेला हा शिक्षक त्याच्याच क्षेत्रातील अमाफ झालेल्या नेतृत्वाच्या गर्दीत हरवला आहे.

सरकारी धोरणे कालपरत्वे बदलत असून त्यामुळे अधिकच हे क्षेत्र ढवळून निघत आहे. या सरकारच्या काळात तर दिवसागणिक शासकीय निर्णय येत आहेत. या गेल्या १० – १२ वर्षातील जंत्रीतूनच एकंदरीत शिक्षकांचे जवळपास ३० – ३५ प्रकार पडले आहेत. शिक्षण क्षेत्रातील शिक्षक पदाची इतकी प्रतवारी जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात नसेल त्यातूनच अनेक क्लिष्ट समस्या निर्माण झाल्या आहेत. जसे १००% अनुदानित शिक्षक, अंशतः अनुदानित शिक्षक, विना अनुदानित शिक्षक, कायम विना अनुदानित शिक्षक, स्वयं अर्थसाहाय्यित शिक्षक, पायाभूत पदवाढ प्रस्तावित शिक्षक, पायाभूत पद मंजूर परंतु वैयक्तिक मान्यता प्रलंबित शिक्षक, पायाभूत पद मंजूर पण वैयक्तिक मान्यता प्राप्त परंतु आर्थिक तरतुदींच्या प्रतीक्षेतील शिक्षक, अनुदानास पात्र घोषित तुकडीवरील शिक्षक, विनाअनुदानित मूल्यांकनात पात्र परंतु अद्याप अघोषित शिक्षक, इंग्रजी माध्यमातील शिक्षक, रात्रशाळेतील शिक्षक, अल्पसंख्यांक शाळेतील शिक्षक, अर्धवेळ शिक्षक, घड्याळी तासिकेवरील शिक्षक, कंत्राटी शिक्षक, कला-क्रीडा शिक्षक, शिक्षणसेवक इत्यादी

‘जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती’ या पुलंच्या वचनाचा प्रत्यय या बाबतीतही आपल्याला येतोच अश्या वेगवेगळ्या पदांवरील शिक्षकांच्या वेगवेगळ्या संघटना उभ्या राहिल्या त्यात पुन्हा जिल्हा परिषद, मनपा, नपा, खाजगी, आश्रम शाळा हे भेद ही आपसूक येतातच. यांच्या प्रशासकीय यंत्रणा देखील वेगळ्या आहेत, हेच प्रशासकीय खत अगणित संघटनांच्या भरघोस उत्पादनाला अजून पोषक ठरले आहे. या सर्व गर्दीतून शिक्षक मात्र हरवत चाललाय, त्याचे प्रश्न न सुटता वाढत चाललेत. शाळा आणि त्यासंबंधीच काम हे एकच काम त्याला नसतंच निवडणूका, मतदार नोंदणी पासून शौचालय मोजणीपर्यंत सगळंच त्याच्या माथी मारलं जातंय, असं असताना देखील त्याच्या कित्येक प्रश्नांबाबत कोणीच आवाज उठवत नाही की उठवलेला आवाज अनेक नेतृत्ववांच्या श्रेयाच्या कल्लोळात विरून जातोय, हेच त्याला समजेनासे झालंय.

या सर्व समस्येंच्या जाळ्यातून जर शिक्षकांना बाहेर यायचं असेल तर त्यांना सक्षम होऊन आपली शक्ती दाखवून द्यावी लागणार आहे. या नेतृत्वाच्या गर्दीतील सक्षम नेतृत्व कोणत्याही स्वार्थ-लोभाशिवाय स्वीकारावे लागणार आहे. ‘एकीचे बळ’हा आपल्या परिपाठातला संस्कार आपल्या संघटनात्मक पातळीवर देखील दाखवून द्यावा लागणार आहे. नाहीतर विखुरलेल्या पर्यायाने शक्तीहीन झालेल्या घटकाला कोणीही सहज चिरडून पुढे जायला धजावत राहणारच.

पुन्हा एकदा नवीन शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक कामगिरीसाठी सर्व शिक्षकांना मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा ….!