महाराष्ट्र होरपळतोय,सत्ताधारी-विरोधक निवडणुकांच्या तयारीत व्यस्त

महाराष्ट्र राज्य भिषण दुष्काळाला सामोरं जातयं राज्यातील लोकांना पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या भेडसावत आहे.राज्यातील ग्रामीण भाग तर अक्षरशः दुष्काळाने होरपळतोय जगाचा पोशिंदा आज मोठ्या नैसर्गिक संकटात सापडलाय त्याला त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह पशुधन वाचवण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.परंतु राज्य सरकार दुष्काळ जाहिर करण्यासाठी अजुनही अॉक्टोबर महिना संपायची वाट पाहतयं असंख्य गावांमधील विहिरी , बोअरवेल कोरडे पडलेत गावांमधील लोक स्थलांतरित होऊ लागलेत पण सरकार मात्र याकडे गांभीर्याने पहायला तयार नाही हे दुर्दैव ! सत्ताधारी पक्षांबरोबर विरोधीपक्ष हि येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीत गुंतलेले दिसताहेत. राज्यातील जनतेला दुष्काळ रूपी महाकाय संकटातुन कसे बाहेर काढाता येईल या चिंतेपेक्षा २०१९ ला आपल्याचपक्षाची केंद्रात नि राज्यात कशी सत्ता येईल या चिंतेनेच त्यांना जास्त ग्रासलेले दिसत आहे.

खरतरं सत्ताधारी निष्क्रिय असतील तर विरोधी पक्षाने त्यांच्या निष्क्रियतेवर जोरदार हल्ला करत त्यांना उघडे पाडायला हवे परंतु विरोधीपक्ष हि येणाऱ्या निवडणुकीसाठी आघाडी करण्याच्या व त्या अनुषंगाने जागावाटपाच्या दुष्काळापेक्षा हि अतिसंवेदनशील विषयावर काम करताना दिसतोय. त्यामुळे राज्यातील तमाम शेतकरी बांधवांनी आणि शेतकऱ्यांच्या पोरांनी पुन्हा एकदा संघटित होत रस्त्यावरची लढाई लढण्यास सज्ज व्हावे.कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर फक्त राजकारण करणे हाच एककलमी कार्यक्रम विरोधी पक्षांचा गेली कित्येक वर्षांपासुन सुरू आहे त्यामुळे त्यांच्याकडुन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी भाबडी आशा करणे सुद्धा आता गैर आहे.राज्यातील बहुतांश गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे तसेच नव्याने टँकर सुरू करावा या मागणीचे हि हजारो प्रस्ताव महसुल प्रशासनाकडे ग्रामपंचायतींनी पाठवलेले आहेत परंतु त्यावर देखील पाहिजे त्या गतीने काम होताना दिसत नाही त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे

नागरिकांमधुन सातत्याने मागणी होतेय की , लवकरात लवकर चारा छावण्या , चारा डेपो सुरू करा , नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्या परंतु या मागण्यांकडे सरकार मात्र गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. सरकारच्या निष्क्रियपणामुळे राज्यातील पशुधन वाचण्याची शक्यता आता धुसर होऊ लागली आहे.सरकारकडुन वेळीच दुष्काळ जाहिर करून दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर मात्र राज्यात सरकारविरोधात जनक्षोभ निर्माण होऊन मोठा उद्रेक होऊ शकतो.कारण सरकारने खरीप हंगामातील पिकांना जाहिर केलेल्या बाजारभावाप्रमाणे व्यापाऱ्यांनी खरेदी न करता ते फारच निच्चांकी दराने खरेदी करून अक्षरशः शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लुट केलेली आहे.पण शेतकऱ्यांनी ते ही निमुटपणे सहन केलेले आहे. तसेच रब्बी हंगामातील सर्व पिके पाण्याअभावी जळुन चालली आहेत पण त्यांचे पंचनामे करण्यासाठी मात्र प्रशासनास अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही किंबहुना तसे आदेशही प्राप्त झालेले नसल्याने प्रशासन पंचनामे करण्यास धजावत नाही त्यामुळे शेतकरी बांधव प्रचंड चिंतेत असुन त्याला आता पुढील पावसाळा ऋतु सुरू होईपर्यंत सर्वस्वी सरकारच्या उपाययोजनांवरच अवलंबून राहण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.

सरकारने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना व राज्यातील जनतेला दिलासा देण्याची गरज आहे पण सरकारने जर याबाबत आता चालढकल केली तर मात्र शेतकरी पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.हे मात्र निश्चित !

– अनिल देठे पाटील
राज्य सुकाणू समिती
सदस्य महाराष्ट्र

पवारांनी दुष्काळ आणि टंचाई असे शब्दछळ करू नये : मुख्यमंत्री

औरंगाबादमध्ये कचऱ्यासोबत आता पाणी टंचाईही