मला आवडलेले आदरणीय देवेंद्रजी…

trupti desai with devendra fadanvis

२२ जुलै मा.देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस. प्रथम राज्यातील या दोन्ही नेत्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
राज्यातील राजकारणातील दोन्हीही मोठी व्यक्तिमत्वं आहेत.

पण आज मला देवेंद्रजी फडणवीस यांच्याविषयी लिहायचं आहे. देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचे तरुण मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष चांगल्या पद्धतीने राज्यकारभार चालवणारे ठरले.अनेक वेळेला आम्हीही त्यांच्या विरोधात आंदोलने केली परंतु कधीही आंदोलनकर्त्यांबरोबर, विरोधकांबरोबर कोणताही आकस नाही, आंदोलनकर्त्यांना सुद्धा मानसन्मान देणे आणि त्यांच्याशी प्रश्न समजावून सोडवणे ही त्यांची हातोटी. ते मुख्यमंत्री असताना हिलांना मंदिर प्रवेश मिळावा" यासाठी आमची अनेक आंदोलने झाली, आम्हाला अनेक वेळा पोलिसांनी ताब्यात घेतले.

हिंदुत्ववादी संघटना मुख्यमंत्र्यांना जाऊन वारंवार आमच्या विरोधात भेटायला येऊ लागल्या, परंतु स्त्री- पुरुष समानता आली पाहिजे, महिलांना समानतेचा अधिकार मिळाला पाहिजे ,यासाठी पुढाकार घेऊन राज्य सरकारने खूप चांगली भूमिका कोर्टात आणि जनतेसमोर मांडली.आम्ही महिला अत्याचारासंदर्भात केलेली आंदोलने,शेतकऱ्यांचे प्रश्नाबाबत केलेले आंदोलन असेल, दारूबंदीसाठी केलेले आंदोलन, असेल, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात दिलेल्या घोषणा असतील किंवा अनेक वेळेला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला असेल परंतु मुख्यमंत्री असताना आम्हाला यासंदर्भात जर काही फोनवर मेसेज द्यायचा असेल तर त्याचे तातडीने उत्तर देणारे आम्ही पाहिलेले पहिले मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी फडणवीस.

त्यांच्या जातीवरून अनेक वेळेला त्यांच्यावर टीका केली जाते , देवेंद्रजी यांनी कधीही जात-पात असे राजकारण केलेले आपल्याला दिसत नाही, काही लोक त्यांच्यावर नाराज असू शकतील पण कोणीही पक्ष सोडून गेले नाहीत हेही तितकेच खरे आहे.

सध्या देवेंद्रजी फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. राज्यात सर्वात जास्त आमदार ज्यांच्याकडे आहेत असे एकमेव नेतृत्व म्हणजे देवेंद्रजी आणि त्यांना खंबीर साथ सध्या मिळाली आहे ते म्हणजे त्यांची सावली म्हटले तरी चालेल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर.

महाविकास आघाडीची सत्ता आली आणि हे दोघेही विरोधी पक्षनेते झाले. काही काळातच कोरोनाचे संकट या राज्यावर आलं. परंतु वारंवार राज्य सरकारला सर्वसामान्यांना होणारा त्रास, अनेक ठिकाणी चाललेला भ्रष्टाचार यासाठी आवाज उठवून विरोधी पक्षनेते पद काय असते हे या दिवसात त्यांनी दाखवून दिले आहे. कोरोनाला अनेक अनेक जण घाबरत आहेत परंतु राज्याचा दौरा करणारी ही जोडी मात्र आपल्याला कधीही कोरोना होऊ शकतो या मनस्थितीत जनतेसाठी सध्या काम करत आहे.

देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना तीन ते चार वेळा माझी त्यांच्याबरोबर भेट झाली असेल. प्रत्येक वेळेला सकारात्मक प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला, आमच्या काही मागण्या मान्यही झाल्या नसतील पण विरोधकांना सुद्धा सहजपणे भेटणारे मुख्यमंत्री म्हणून नक्कीच देवेंद्रजी कायम आठवणीत राहतील.

मला या निमित्ताने एक आठवण सांगायची आहे. देवेंद्रजी फडणवीस यांचा पुण्यात कोंढवा भागात कार्यक्रम होता आणि आम्हाला आंदोलनासंदर्भात काही मागण्या संदर्भात त्यांना निवेदन द्यायचे होते. जेव्हा मी कार्यकर्त्यांसमवेत निवेदन द्यायला गेले तेव्हा पोलिसांनी आम्हाला बाहेरच अडवले होते आणि तुम्ही अचानक मुख्यमंत्र्यांना भेटू शकत नाही असे पोलिसांकडून आम्हाला सांगण्यात आले होते. माझ्याकडे देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यूजी पवार यांचा मोबाईल नंबर होता. त्यावर पोलिसांनी अडवल्यावर मी एक मेसेज मुख्यमंत्र्यांना पाठवला होता आणि आश्चर्य म्हणजे पाचच मिनिटात पोलिसांना फोन आला होता की तृप्तीताईंना सीएम साहेब कार्यक्रमानंतर भेटणार आहेत, त्यांना अडवू नये. तिथे असणारे पोलिस आश्चर्यचकित झाले होते आणि आम्ही सुद्धा. कारण इतक्या मोठ्या कार्यक्रमात स्टेजवर अनेक मान्यवर मुख्यमंत्र्यांबरोबर असताना देखील विरोधात सामाजिक कार्यकर्ते निवेदन द्यायला आले असले तरीसुद्धा त्यांना सन्मानाची वागणूक द्या, हे मुख्यमंत्री कायमच लक्षात ठेवून होते आणि अभिमन्यू जी पवार यांच्या माध्यमातून हे सर्व कृतीत घडतही होते.

आजपर्यंतच्या अनेक मुख्यमंत्र्यांच्या पत्नी या फक्त वर्षा बंगला आणि महत्त्वाचे कार्यक्रम इथपर्यंतच मर्यादित दिसत होत्या परंतु अमृताजींना ज्या क्षेत्राची आवड होती तिथे आवर्जून पती म्हणून सुद्धा त्यांनी खंबीर साथ देताना, कितीही टीका झाली तरी आम्ही देवेंद्रजीना पाहिलय.

सध्या त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते, त्यांची बदनामी वारंवार केली जाते पण या निमित्ताने हेच सांगायचं आहे, ‘देवेंद्रजी लंबी रेस का घोडा है इसीलिये उनको बदनाम करने की कोशिश की जाती हैl ‘

निवडणुकीच्या आधी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाचा करिश्मा जनतेने पाहिला आहे. विविध पक्षातील मान्यवर ,माजी मंत्री हे स्वतःहून त्यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित झाले आणि भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला.लॉकडाऊन मध्ये सुद्धा विविध क्षेत्रातील व्यक्तींना त्यांनी फोन करून ग्राउंड लेव्हलची माहिती घेतली होती. माझंसुद्धा त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले होते तेव्हा आवर्जून त्यांनी ताई तुम्ही सगळे काळजी घ्या हे सांगायला ते विसरले नाहीत.

मी कोणत्याही पक्षाची कार्यकर्ती नाही अनेक वेळेला मुख्यमंत्री म्हणून जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही त्यांना विरोध केला आहे.परंतु जे चांगले अनुभव आले ते सर्वांसमोर मांडणे गरजेचे वाटले. सध्या सरकार जरी महाविकास आघाडीचे असले तरी दररोज महाराष्ट्रात जोरदार चर्चा मात्र विरोधी पक्षनेत्यांचीच होत आहे कारण त्यांचं काम बोलतयं. अनेक असे अनुभव अनेक अशा गोष्टी आहेत त्या सर्व काही लिहिता येणार नाहीत परंतु त्यांच्या अशा चांगल्या गुणांमुळे तर देवेंद्रजी सर्वांचे लाडके आहेत अगदी आमचेसुद्धा.आम्ही त्यांना आदराने भाऊ म्हणतो…भाऊ,तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच शनिदेवा चरणी प्रार्थना– सौ.तृप्ती देसाई, संस्थापक अध्यक्ष भूमाता ब्रिगेड.

महत्वाच्या बातम्या-

५० टक्के कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ न दिल्यास कंपन्यांवर होणार कारवाई

भारतात कोरोनाच्या हाहाकार, मागील २४ तासांत रेकॉर्डब्रेक रुग्णाची वाढ

बकरी ईदच्या दिवशी प्रतीकात्मक कुर्बानी शक्य नाही – इम्तियाज जलील

‘स्वतःचे अपशय झाकण्यासाठी विरोधकांची मुस्कटदाबी करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’