कम्युनिस्ट विचारधारा आणी रक्तरंजित क्रांती

left vs right1

विचारधारा कोणतीही असुद्या त्याची हत्या करणे गैरच आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली ही रक्तरंजित कहाणी डाव्या विचारसरणीचे पुरस्कर्ते / कार्यकर्ते नवी आणि चुकीची असल्याचा केवळ वरवर आव आणत आहेत. गौरी लंकेश यांची हत्या दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या ओळीत बसवताना डाव्या विचारसरणीचे सरकार ज्या राज्यात गेली पस्तीस वर्षे राज्य करत होतं त्या पश्चिम बंगालसारख्या राज्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परीवारातील शेकडो कार्यकर्ते, प्रचारकांच्या हत्या भरदिवसा झाल्या आणि सुरूच आहेत त्यांनाही याच ओळीत का बसवत नाहीत?

left vs right

कुणाचीही हत्या झाली कि थेट संघ आणि परिवारातील संघटनांना आरोपी करून मोकळे होताना रक्तरंजित इतिहास कुणाचा आहे हे तपासले पाहिजे.एकीकडे व्यवस्था उध्वस्थ करून रक्त पाहणाऱ्या कम्युनिष्टांनी सामाजिक समतेच्या गोंडस नावाखाली “जय भीम – लाल सलाम” अशी थोतांड घोषणा अस्तित्वात आणून समाजातील दलितांना आकर्षित करण्याचा तोकडा प्रयत्न केला. या लाल सलाम अन जय भीमचा एकमेकांशी काडीमात्र हि संबंध नाही. एकीकडे डॉ. बाबासाहेबांना आदर्श मानणारे आम्ही दलित त्यांचे विचार समजून घेत नाही.बाबासाहेब म्हणाले होते कि “जोपर्यंत माझे अन बुद्धांचे विचार या देशात आहेत तोपर्यंत या कम्युनिष्टाना थारा देऊ नका. ठेचून काढा.” मग आम्ही कोणत्या विचाराने लाल सलामला भिक घालतोय..? याचे नवल वाटते. वाघासोबत कितीही कुटुंबासारखे राहायचे ठरवले तरी भूक लागली कि तो आपल्याला फाडून खाणार हे नक्की. कारण त्याचा तो धर्म आहे. तसाच या आमच्या दलित बांधवांचे झाले. जय भीम-लाल सलाम म्हणत कम्युनिष्ट छताखाली काही गेले खरे पण १४ एप्रिल २०१६ रोजी गडचिरोलीच्या छल्लेवाडा इथे डॉ. बाबासाहेबांच्या जयंती सोहळ्यावर त्यांचीच ढालकरून दलित बांधवावर नक्षलवाद्यांनी अंधाधुंध गोळीबार केला. एकीकडे कम्युनिष्ट नेते जय भीम-लाल सलाम म्हणतात अन दुसरीकडे तशाच कार्यक्रमात त्यांचीच पिल्ले म्हणजे “लाल सलाम हा जय भिमवर हल्ला करतो”. हे कधी लक्षात घेणार.

babasheb

आपल्याच कळपातील एखाद्या व्यक्तीला खायचं अन मग त्याचा भावनिक वापर करून आपली विचारधारा वाढवायची ही डाव्यांची पद्धत आहे. कालपर्यंत माहित नसलेल्या एका महिलेची हत्या होते आणि समाजमन हळहळत, मेणबत्या, शोकसभा अन राज्य सरकार सोडून थेट केंद्र सरकारवर दबाव, टीका सुरु होते. हळूहळू कार्यकर्ते द्वेषाने पछाडून उठतात चौकात येतात आणि मग त्या तथाकथित लेखकाने लिहिलेली पुस्तकं खपतात त्यातून विचारधारा समाजात जाते अशापद्धतीने हे अत्यंत्य जहरी विष याच लाल सलाम म्हणणाऱ्या कम्युनिष्टांनी पेरलं, आणि पेरण्याची प्रक्रिया सुरु आहे. एकीकडे कर्नाटक सरकार आपल्या पद्धतीने तपास करत आहे मात्र देशभरातील बोटावर मोजण्या इतके असलेल्या कम्युनिष्टांनी लगेच हिंदुत्ववादी संघटनांना आरोपी करून आपली अर्धवट बौद्धिक अक्कल पाजळली.

आता पश्चिम बंगालचा बालेकिल्ला गमावून बसले आहेत. केरळमधील सत्ताही त्यांच्या हातातून निसटली आहे. सोळाव्या लोकसभेमध्ये त्यांची संख्या हातावर मोजण्या इतकीही नाही. आज समस्त डावे पक्ष राष्ट्रीय राजकीय प्रवाहातून बाजूला पडलेले दिसतात. आणि याच निराशेतून समाजात स्थान निर्माण करायचं असेल, सहानुभूती मिळवायची असेल तर सशस्त्र क्रांतीमध्ये सामील असलेल्या एका चेहऱ्याला जावं लागेल हि प्रवृत्ती या सर्व हत्यांमागे असू शकते. जर माणूस म्हणून समाजात हळहळ होत असेल तर दाभोकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश आणि केरळ, पश्चिम बंगाल या भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील शेकडो कार्यकर्त्यांच्या कम्युनिष्टांनी केलेल्या हत्या विसरून चालणार नाही.

gauri collage

गौरी लंकेश या केवळ डाव्या विचारांच्या पत्रकार नव्हत्या तर त्या सक्रिय सशस्त्र माओवाद्याला समर्थन देणाऱ्या महिला होत्या हे विसरून चालणार नाही. नक्षलवादी हिंसेला उघड समर्थन देणाऱ्या, कारावासाची शिक्षा झालेल्या पण जामिनावर बाहेर असलेल्या गौरी लंकेश यांचा अंत्यसंस्कार पूर्ण सरकारी इतमामात करून कॉंग्रेसने आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केलाय. गौरी लंकेश यांना नक्षवाद्यांकडून धमक्या येत होत्या हे विधान नुकतंच त्यांच्या भावाने केलं. त्यांच्या हत्येपूर्वी काही वेळ सोशल नेटवर्किंगच्या पोस्ट पाहिल्या तर माओवाद्यांकडे याची दिशा वळते आहे. ते तपासात निष्पन्न होईलच. मात्र समाजात जहरी विष पेरण्याची वृत्ती कशा पद्धतीने पाय रोवताना दिसते आहे हे दिसते आहे.

लेखक: विकास विठोबा वाघमारे, सोलापूर

 

(महाराष्ट्र देशा लेखकाच्या मताशी सहमत असेलच असे नाही.)