भक्ती शक्ती संगम -श्रीसमर्थ रामदास स्वामी स्थापित अकरा मारुती..!

hanuman

ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी(युवा कीर्तनकार,बीड, महाराष्ट्र)- चाफळ ही श्रीसमर्थांची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. श्रीसमर्थ जेव्हा काश्मीरच्या नंदनवनापासून ते मलयगिरीच्या चंदनवनापर्यंतच्या अखिल हिंदुस्थानचे भ्रमण करुन पुन्हा कृष्णाकाठी आले तेव्हा ते मसूर, शहापूर, चाफळ ह्याच परिसरात हिंडत होते. श्रीसमर्थ स्थापित अकरा मारुती आणि चाफळचे प्रभू रामचंद्रांचे मंदिर हे ह्याच क्षेत्रात मोडते. या श्रीसमर्थ स्थापित अकरा मारुतींपैकी सात मारुती हे सातारा जिल्ह्यातील असून तेही चाफळच्या पंचक्रोशीतच आहेत. दोन मारुती हे सांगली जिल्ह्यात तर उर्वरित दोन हे कोल्हापूर जिल्ह्यात आहेत.

श्रीसमर्थांनी या अकरा मारुतीला उद्देशून अकरा मारुती स्तोत्रे रचलेली आहेत. दासनवमी झाल्यानंतर या अकरा मारुतींचे दर्शन घ्यावे अशी परंपरा रामदासी संप्रदायामध्ये रुढ आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायक यात्रेप्रमाणे या अकरा मारुतींची यात्रा करणारेही खूप समर्थभक्त आहेत व इतरांमध्येही दिवसेंदिवस ही यात्रा लोकप्रिय होत चालली आहे.

आमच्या बीड मठाचे मठपती समर्थशिष्य प. पू. गिरीधर स्वामींनी त्यांच्या ‘समर्थप्रताप’ ह्या ग्रंथात या अकरा मारुतींचा उल्लेख केला आहे. गिरीधर स्वामी हे श्रीसमर्थ रामदास स्वामी यांच्या सोबत राहिलेले असल्यामुळे श्रीसमर्थ चरित्राचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने त्यांचा ‘समर्थप्रताप’ हा ग्रंथ आज सर्वांत अधिक अधिकृत असा ग्रंथ समजला जातो. गिरीधर स्वामी म्हणतात –

बाहोग्रामी शक्तीग्रामी । मसुरग्रामी पूर्वग्रामी ।
उंबरग्रामी शृंगग्रामी । हनुमान स्थापिले समर्थे ।
बाहोग्रामी उपग्रामीस्थान । मानसग्रामी पारग्रामी हनुमान ।
अधिष्ठानी महारुद्र मुख्य प्राणनाथ । पूर्ण पश्चिमे स्थापिले समर्थे ॥

श्रीसमर्थशिष्या वेणाबाईंचेही ह्या अकरा मारुतींवर काव्य उपलब्ध आहे –

चाफळामाजि दोन, उंब्रजेसी एक । पारगांवी देख चौथा तो हा ॥
पाचवा मसुरी, शहापुरी सहावा । जाण तो सातवा शिराळ्यांत ॥
सिंगणवाडी आठवा, मनपाडळे नववा । दहावा जाणावा माजगांवी ॥
बाह्यात अकरावा येणे रीती गावा । सर्व मनोरथा पुरवील ॥
वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास । कीर्ती गगनांत न समावे ॥

सायंकाळचे कर्मधर्म आटोपून श्रीमारुतीचे दर्शन घ्यावे. बुद्धी, बळ, निर्भयत्व, यश, धैर्य, आरोग्य, अजाड्य, वाक्पटुत्व या गुणांची हनुमंताकडे मागणी करावी. हनुमंताच्या दर्शनाने या गुणांचा लाभ होतो. श्रीसमर्थांनी मारुतीची देवळे स्थापून आपल्या पंथाला मारुतीच्या उपासनेचा जो क्रम लावून दिला तो बुद्धी, बळ, निर्भयत्व, आरोग्य हे मारुतीच्या अंगचे जे गुण आहेत ते त्याच्या उपासकांच्या अंगी यावे याचकरिता लावून दिला हे उघड आहे. श्रीसमर्थांना महाराष्ट्रात धर्मस्थापना करावयाची होती, ती करण्याकरिता वरील सर्व गुणांची लोकांमध्ये आवश्यकता होती. मारुतीरायांच्या अंगी वरील सर्व गुण आणि बळच नव्हे तर तो बुद्धीमतां वरिष्ठम असा आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वरील सर्व गुण त्याने श्रीरामरायाच्या सेवेमध्ये वाहिलेले होते.

शक्ती, युक्ती, ब्रह्मचर्य किंवा नीती आणि भक्ती या चार पायांवर हनुमंताचे लोकोत्तर चरित्र उभे आहे. दास्यभक्तीचा तो आदर्श आहे म्हणूनच रामालाही त्याने जिंकले आहे. हनुमंताच्या भक्तिभावाने प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनाही गहिवरुन टाकले आहे.

रामायणात श्रीरामाशिवाय सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान ही महत्त्वाची चरित्रे आहेत पण त्यात देवतास्वरुपाला पोचलेला एकटा हनुमानच आहे. रामायणातील सीता – रामाशिवाय कोणाची मंदिरे – देवळे उभारली गेली नाहीत पण त्याला हनुमान हा एक अपवाद आहे. किंबहुना संख्येच्या दृष्टीने पाहिले तर हनुमान मंदिरांची संख्या राममंदिरांपेक्षा कितीतरी अधिक भरेल.

स्वधर्मस्थापनेसाठी हनुमंताच्या अंगच्या सर्व गुणांची व युध्दोत्सुक आवेशाची आवश्यकता होती. हे गुण व हा आवेश, ही युयुत्सुवृत्ती राष्ट्रात संचारावी म्हणून श्रीसमर्थांनी मारुतीची उपासना प्रचलित केली.

श्रीसमर्थांनी मारुतीची जशी स्थापन केली तसे हनुमंतांवर वाड्.मयदेखील पुष्कळ निर्माण केले. श्रीसमर्थांनी अकरा मारुतींवर ११ स्तोत्रे रचलेली आहेत. या व्यतिरिक्त आरत्या, सवाया, श्लोक, पदे इत्यादी विविध प्रकारचे वाड्.मय आहे.

आरत्या – १) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी २) जय देव जय देव जय जय बलभीम यांसारख्या उत्कृष्ट आरत्या सर्वश्रुतच आहेत.

अभंगरचना – १)स्वामी माझा ब्रह्मचारी २)नाव मारुतीचे घ्यावे । पाऊल पुढे टाकावे ॥ ३)काय सांगू मी या मारुतीचे बळ । गिळीले मंडळ मार्तंडाचे ॥

पदरचना – १) कैवारी हनुमान आमुचा २)सामर्थ्याचा गाभा । तो हा भीम भनायक उभा ॥ ३)अचाट बळ या भीमाचे
सारखी पदरचना.

भूपाळ्या –  १) उठी उठी बा मारुती ।

सवाया – १) नयनी पाहता हनुमंत । ज्यासी वर्णिती महंत ॥

व अनेक प्रार्थना हे थोडक्यात केलेल्या श्रीसमर्थ साहित्याचे दिग्दर्शन तर अशाप्रकारे हनुमंत विषयक श्रीसमर्थांचे मराठी साहित्य, श्रीसमर्थकालीन परिस्थितीचा संदर्भ ध्यानी घेता तत्कालीन मराठी साहित्यात सर्वाधिक महत्त्वाचे व प्रेरणादायक ठरते.

तीस – चाळीस वर्षांपूर्वी जेव्हा आपण पाहतो जेथे मारुतीचे, हनुमंताचे मंदिर असावयाचे तेथे आखाडा हा असावयाचाच. आखाडा म्हटले की, तिथे गावातील तरुण पिढी एकत्र जमून बलसंवर्धन करणारच असा बलसंपन्न झालेला तरुणवर्ग एकत्रित आल्यावर अन्यायाच्या प्रतिकारार्थ तो तुटून पडणारच. बालब्रह्मचारी, वज्रदेही हनुमंताची उपासना करुन श्रीसमर्थांनी स्वतः तर आधी वर सांगितलेले गुण संपादन केले होतेच पण ते आपल्या धर्मबांधवांतही उत्पन्न व्हावे, या गुणांच्या अभावी स्वधर्माची जी दुर्दशा झाली होती ती नष्ट व्हावी म्हणून ठिकठिकाणी हनुमंताची मूर्ती स्थापना करून त्याच्या पराक्रमाचे सविस्तर वर्णन समर्थांनी आपल्या वाड.्मयात केलेले आहे..!

(संदर्भ – श्री प्रमोद संत संकलित समर्थ स्थापित दैवते)

(आजपर्यंतच्या लेखमालेमध्ये आपण श्रीसमर्थांना श्रीमारुतीरायांची स्थापना करण्याची निकड का भासली यामागची पार्श्वभूमी पाहिली. आता पुढील लेखांकात पाहूया श्रीसमर्थ स्थापित अकरा मारुतीतील चाफळचे मारुतीराय..!)

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

“माझ्यापेक्षा राज्याच्या आरोग्याची काळजी घे”, सुप्रिया सुळेंनी सांगितली टोपेंच्या मातोश्रींची आठवण…

तडीपारीच्या नोटिशीनंतर आता मनसे नेते अविनाश जाधव यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

मुंबईत लवकरच अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारणार,मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा