fbpx

राहुल गांधी, त्यांची इटलीची नानी आणि सरप्राईज

rahul gandhi and amit shaha

नॉर्थ-इस्ट मध्ये अतिशय महत्वाच्या मानल्या गेलेल्या त्रिपुरा ,मेघालय आणि नागालॅंडचे निकाल जाहीर झाले असून संपूर्ण ईशान्य भारतात ‘मोदीलहर’ पहायला मिळाली.त्रिपुरात भाजपने माकपची तब्बल २५ वर्षांची सत्ता उलथवून लावत डाव्यांच्या गडाला सुरुंग लावला. मेघालयात भाजपाने मित्रपक्षांची जमवाजमव करत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे  तर नागालँडमध्येही भाजपाने एनडीपीपीसोबत युती करून तिथेही सत्ता आणली आहे.नरेंद्र मोदी, राम माधव, अमित शहा,सुनील देवधर यांच्यासह अनेक दिग्गजांनी सामुहिक आणि संघटनात्मकरित्या जे प्रयत्न केले त्याला यश आले आणि ईशान्येत कमळ फुलले.

सुरुवातीला काही दिवस प्रचारासाठी मोठ्या जोमात फिरणारे राहुल गांधी शेवटच्या क्षणी यासर्व घडामोडी होत असताना कुठेच दिसले नाहीत. अश्या निर्णायक क्षणी आपला नेता कुठे आहे असा सवाल सैरभैर झालेल्या कार्यकर्त्यांकडून दबक्या आवाजात विचारला जात होता. हातातोंडाशी आलेला घास भाजपा हिरावून घेत असताना राहुल गांधी इटली मध्ये निकालाच्या दिवशी आपल्या 93वर्षाच्या आजीला भेटायला आणि सरप्राईज देण्यासाठी गेले होते.त्यानंतर सध्या जे चित्र आहे त्यावरून कॉंग्रेसच्या हातून तेलही गेले तूपही गेले हाती हाती राहिले धुपाटणे असचं म्हणावं लागेल.

त्रिपुरा ,मेघालय आणि नागालॅंडचे निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल दोन दिवसांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना निकालावर भाष्य केलं . जनमताचा आपण आदर करत असून त्यांचा विश्वास आपण परत मिळवू असा लंगडा आत्मविश्वास कार्यकर्त्यांना देण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केला आहे. परिस्थिती हि आहे कि आधी गोवा,नंतर मणिपूर आणि आता मेघालय देखील हातातून गेलं आहे. भाजपला मेघालयमध्ये केवळ 2 जागांवर यश मिळवता आलं असलं तरीही सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला सत्तेपासून दूर रहावं लागणार आहे. 60 पैकी 21 जागा घेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तरीही मेघालयमध्ये एनडीएचा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला आहे.

conrod sangama

एका बाजूला राहुल गांधी आपल्या 93वर्षाच्या आजीला भेटायला आणि सरप्राईज देण्यासाठी इटलीला गेले होते मात्र इकडे भाजपने राजकीय डावपेच खेळत राहुल गांधीनाच सरप्राईज दिल्याचं चित्र आहे. ज्यावेळी आकड्यांचा खेळ खेळला जाणार होता तेव्हा अध्यक्ष परदेशी होते मग सरदारांना पाठवून काही पदरात पडतंय का याची चाचपणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या प्रदेशातील कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा विश्वास गमावून बसलेल्या पक्षाध्याक्षांवर इतर पक्षातील नेते कसे विश्वास ठेवतील?इकडे सुरुवातीपासून भाजपने आणि संघाने आकड्यांच्या गणितांचा विचार लक्षात घेऊन कॉंग्रेसविरोधी पक्षाची मोट बांधण्याची व्यूहरचना केली आणि आज ती यशस्वी होताना पहायला मिळत आहे.

narendra modi amit shaha

ईशान्य भारतात भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर बरसले . कोणताही नेता आपल्या कार्यकर्त्यांना अशा निर्णायक क्षणी सोडून पळून जात नाही तसेच राहुल गांधी हे गांभीर्य नसलेले पक्षाध्यक्ष आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केली जी अतिशय मार्मिक आणि राहुल गांधी यांना आरसा दाखवणारी होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गेल्यावर्षी नरेंद्र मोदी यांच्या पेक्षा राहुल गांधीच परदेशात जास्त दिवस होते याची आकडेवारी देखील मागे समोर आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त भारतचा जो नारा दिला होता, तो प्रत्यक्षात येताना दिसत आहे. 2014 साली यूपीएचं देशातील जवळपास 35 टक्के लोकसंख्येवर राज्य होतं, तर एनडीएचं केवळ 22 टक्के लोकसंख्येवर.. मात्र एनडीएचं सध्या जवळपास 68 टक्के जनतेवर राज्य आहे, तर यूपीएचं केवळ 8 टक्के जनतेवर राज्य आहे.इकडे भाजप अध्यक्ष अमित शहा भाजप कार्यकर्ते विजयाच सेलिब्रेशन करत असताना दुसऱ्याच दिवशी नागपूरला संघ दरबारी हजर झाले,तीन साडेतीन तास सरसंघचालकांबरोबर आगामी निवडणुकांच्या दृष्टीने व्यूहरचना आखून पुढच्या कामाला निघून गेले मात्र इकडे कॉंग्रेस अध्यक्ष नानीला सरप्राईज देण्यात व्यस्त होते .

लोकशाहीत विरोधी पक्ष टिकायला पाहिजे नुसता टिकून उपयोग नाही तर जागृत आणि मजबूत विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे .प्रचंड मेहनत घेण्याची तयारी असणारा ,कार्यकर्त्यांना बळ देणारा,व्हिजन असलेला, वास्तवाची जाण असलेला ,सत्ताधाऱ्यांच्या कमकुवत बाजूंवर घाव घालणारा चाणाक्ष नेताच सरकार उलथवून लावू शकतो. गांभीर्य नसलेल्या,स्वप्नाळू,आणि संघटनात्मक दृष्ट्या कमकुवत झालेल्या मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसने तसेच त्या पक्षाच्या अध्यक्षांनी निवडणुकांना गांभीर्याने घेतले नाही तर २०१९ ला जनता कॉंग्रेसला ‘सरप्राईज’ दिल्याशिवाय राहणार नाही.

– दीपक पाठक