घराणेशाहीमुळेच काँग्रेस टिकून आहे

राहुल गांधी

काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 132 वर्ष झाली असून  यात स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ गांधी आणि नेहरू घराण्याने पक्षाचे अध्यक्ष पद स्वतःकडे राखून ठेवलेल आहे, खरं तर काँग्रेस च्या अध्यक्षाची निवडणूक दरवर्षी होत असते आणि ती दरवर्षी व्हावी अशी सक्ती पण आहे, पण एका व्यक्तीने अध्यक्ष पदावर किती वर्षे राहावं याची सक्ती मात्र केलेली नाही त्यामुळेच गांधी घराण्याने याचा जास्तीत जास्त फायदा घेतला हेच दिसून येते

स्वातंत्र्यानंतरचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचा कालावधी

(1) आचार्य कृपलानी – 1947 (2) पट्टाभी सितारामय्या – 1948-49 (3) पुरुषोत्तमदास टंडन – 1950 (4) जवाहरलाल नेहरु – 1951-54 (5) यू. एन. धेबर – 1955-59 (6) इंदिरा गांधी – 1959 (7) नीलम संजीव रेड्डी – 1960–63 (8) के. कामराज – 1964–67 (9) निजलिंगअप्पा – 1968 (10) जगजीवनराम – 1970–71 (11) शंकर दयाळ शर्मा – 1972–74 (12) देवकांत बरुआ – 1975-77 (13) इंदिरा गांधी – 1978–84 (14) राजीव गांधी – 1985–91 (15) पी. व्ही नरसिंहराव – 1992–96 (16) सिताराम केसरी – 1996–98 (17) सोनिया गांधी – 1998 ते 2017

यात गांधी आणि नेहरू घराणे किती वर्षे अध्यक्ष राहिले ते पाहू
1) जवाहरलाल नेहरु – 1951-54 
2) इंदिरा गांधी – 1959
3) इंदिरा गांधी – 1978–84
4) राजीव गांधी – 1985–91
5) सोनिया गांधी – 1998 ते आजपर्यंत

वरील आकडेवारी पहाता गांधी आणि नेहरू घराण्यांनी जवळपास 35 वर्ष सतत काँग्रेस चे अध्यक्ष पद स्वतःच्या ताब्यात ठेवले आहे. 1998 नंतर म्हणजे सलग 19 वर्षानंतर काँग्रेस अध्यक्षाची  नेमणूक होत आहे, नेमणूक शब्द या ठिकाणी जाणून बुजून घेतला आहे कारण निवडणूक म्हटलं तर त्या ठिकाणी विरोधात एखादा उमेदवार असतो, त्याची एक प्रक्रिया पार पाडली जाते, पण इथं फक्त अर्ज भरल्या जातो अर्जही त्याच व्यक्तीचा असतो जो गांधी घराण्यातील व्यक्ती असतो, म्हणून तर घराणेशाही हाच काँग्रेसचा आधारस्तंभ आहे. भलेही काँग्रेस पक्षात राहुल गांधी यांच्या पेक्षा सरस लोक आहेत जे पक्षाला योग्य यश मिळवून देतील आणि काँग्रेसला पूर्वपदावर घेऊन जातील पण त्यांच्या सरसपणाचा या पक्षात जराही उपयोग नाही का तर त्यांचं आडनाव गांधी नाही.जोतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, पृथ्वीराज चव्हाण, यांच्या सारखे हुशार आणि चाणाक्ष नेते मागे ठेवून काँग्रेस पुढे जात आहे.  राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाचे काय होणार हे जरी सर्वांना माहीत असले तरी एका गोष्टीचा विचार करायला हवा की काँग्रेस पक्षाने अनेक वादळांचा सामना केला, पण त्या त्या वेळच्या राजकीय परिस्थितीत पक्ष पुन्हा उभा राहिला.

१९६२च्या चीन युद्धानंतर काँग्रेसच्या विरोधात वातावरण तयार झाले. तेव्हा झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये पक्षाचा पराभव झाला. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांची लोकप्रियता तेव्हा कमी झाली होती. पक्ष बळकट करण्याकरिता कामराज यांनी एक योजना मांडली. त्यानुसार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मंत्रिपदांचे राजीनामे देऊन पक्ष बळकट करण्याकरिता पुढाकार घ्यायचा, अशी ती योजना होती. भुवनेश्वरच्या अधिवेशनात कामराज यांनी मांडलेल्या योजनेनुसार बहुतेक केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्र्यांनी नेहरू यांच्याकडे राजीनामे सादर केले. लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाई, जगजीवनराम, स. का. पाटील या केंद्रीय मंत्र्यांसह सहा मुख्यमंत्र्यांचे राजीनामे नेहरूंनी स्वीकृत केले होते. कामराज योजनेच्या यशस्वीतेबद्दल विविध मतप्रवाह आहेत. १९६७ मध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाली, पण पक्षाचा जनाधार आटला. यातून इंदिरा गांधी यांच्याविरोधात नेत्यांचा गट सक्रिय झाला होता. १९६९ मध्ये काँग्रेस पक्षात फूट पडली. तरीही १९७१ मध्ये काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले. १९७७ मध्ये आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. १९८०च्या निवडणुकीत इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. पक्षात फूट पडली, नेतेमंडळी सोडून गेली वा पक्ष संघटना कमकुवत झाली तरीही काँग्रेस पक्ष पुन्हा उभा राहिल्याची उदाहरणे आहेत.

या पाश्र्वभूमीवर २०१४च्या दारुण पराभवानंतर काँग्रेसला पुन्हा बरे दिवस येतील का? हा खरा प्रश्न आहे. १९६९ मध्ये काँग्रेस पक्षात पडलेली फूट किंवा १९७७च्या दारुण पराभवानंतरही इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाला कोणी आव्हान दिले नव्हते किंवा पक्षावरील त्यांची पकड अजिबात ढिली झाली नव्हती. आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल विचार करायला लागणार आहे असे म्हणणे देखील चुकीचे ठरेल. खरं तर पक्षातील नेते गांधीशाहीचा दबदबा बाळगून आहेत, सतत 19 वर्ष पक्षावर दबदबा निर्माण करून सोनिया गांधी यांनी पक्षात कुणालाही आपल्या विरोधात तोंड वर करू दिले नाही यातच त्यांच्या अध्यक्षपदाचे यश सामावलेले आहे पण राहुल गांधी यांना ते जमेल का? किंवा यानंतर पक्षांतर्गत बंडाळी जोर धरेल का? आणि बंडाळी निर्माण झालीच तर राहुल यांना त्यावर स्वतःची दहशत बसवता येईल का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. पक्षाबाहेर आणि पक्षांतर्गत अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी राहुल सज्ज झाले खरे पण मोदी सारखे प्रचंड शक्तिमान नेते समोर आहेत तर शरद पवार यांच्या सारखे चतुर राजकारणीही राहुल यांच्या मुळावर पाय देण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, आव्हाने अनेक आहेत म्हणून त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राहुल गांधी यांना स्वतःच्या कार्यशैलीत आक्रमकता आणणे गरजेचे आहे.

तत्त्वतः काँग्रेस पक्ष हा एक घराणेशाही वर चालणारा पक्ष आहे हे जरी सर्वज्ञात असले तरी गांधी घराण्याने ज्या पद्ध्तीने काँग्रेस जिवंत ठेवली त्या पद्धतीने कोणीही ठेवू शकत नाही, गांधी घराणे जर बाजूला झाले तर काँग्रेस पक्षात दुही माजणार हे मात्र नक्की त्यामुळे घराणेशाही का होईना पण काँग्रेस टिकून तर आहे.

                                                                                                                – श्याम पाटील (औरंगाबाद )Loading…
Loading...