fbpx

पीयूष मिश्रा-एक अष्टपैलू रंगकर्मी (भाग १)

ThePlaybackSinger

ख्वाहिशो को जेब में रख कर निकला कीजिए, जनाब, खर्चा बहुत होता है, मंज़िलो को पाने में।

पियुष मिश्राचे असे कित्येक शेर ,डायलॉग,गाणी सिने रसिकांच्या तोंडी असतात . हिंदी सिने सृष्टीत आपली वेगळी शैली निर्माण केलेला हा अवलिया . आपल्या अभिनयाच्या तसेच लोकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या लेखणीने जोरावर तो लोकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे .

13 जानेवारी 1963 ला मध्य प्रदेशातील ग्वालियर येथील प्रतापकुमार शर्मा यांच्या घरी एका अवलियाने जन्म घेतला, ज्याचं मूळ नाव प्रियाकान्त शर्मा असं होतं. हाच मुलगा आज भारतीय चित्रपट सृष्टीतील एक ‘चौकोनी चिरा’ म्हणून ओळखला जातोय. मूळचा प्रियाकांत शर्मा म्हणजेच आज आपल्या सर्वांना सुपरिचित असणारा पीयूष मिश्रा होय. त्याच्या बदललेल्या नावाचा किस्सा देखील मजेशीर आहे. प्रियाकांत असे मूळ नांव असलेल्या पीयूषला त्याचे नातेवाईक, स्नेही, मित्र प्रिया-प्रिया असे संबोधत असत आणि आपल्या नावाचं असं स्त्री संबोधन ऐकून वैतागलेल्या पीयूषने 10वी नंतर स्वतःचे नाव बदलायचे ठरवले. त्यावेळी त्याने 2नावांचा विचार केला होता- अनुराग आणि पीयूष पैकी पीयूष हे नांव त्याला अधिक आवडले आणि त्याने ते स्वीकारले. अफूच्या व्यसनाच्या आहारी गेलेले पीयूषचे वडील आणि त्याचा संपूर्ण परिवार पीयूषच्या आत्त्याच्या घरी राहत होते. तारादेवी मिश्रा नावाच्या त्याच्या आत्त्याला काही अपत्य नसल्याकारणाने आत्त्याने पीयूषला दत्तक घेतले होते त्यामुळे त्याचे पूर्वीचे शर्मा हे आडनांव बदलून मिश्रा असे झाले होते तर अशाप्रकारे प्रियाकांत शर्मा चा पीयूष मिश्रा झाला.

पीयूषचे शालेय शिक्षण ग्वालियरच्याच कार्मेल काॅन्व्हेन्ट आणि नंतर जेसी मिल्स हाईअर सेकन्डरी स्कूल येथे झाले.पीयूषला लहानपणापासून एक प्रकारचे दबावाचे वातावरण मिळाले त्याची आत्त्या ही एक करारी अन् कजागअशी बाई होती. त्यामुळे बालपणातला निखळ आनंद, सुख या गोष्टी त्याच्या वाट्याला कधी आल्याच नाहीत आणि पुढे मग त्याचं हेच दुःख त्याने कागदावर उतरवायला सुरुवात केली-
ए उम्र कुछ़ कहाँ मैंनें शायद तूने सुना नहीं..
तू बेशक छीन सकती हैं बचपन मेरा पर बचपना नहीं..!
आश्रित असल्यामुळे एका आश्रिताच्या वाट्याला असलेल्या सर्व टोमण्यांना, हिणकस, तुच्छ अशा वागणुकीला पीयूष व त्याच्या परिवाराला सामोरं जावं लागलं. परिणामतः इयत्ता 8वी मध्ये असताना लिहिलेल्या त्याच्या पहिल्याच कवितेत त्यांच्या मनांतील सर्व भावना व्यक्त होतात.
ज़िन्दा हो हाँ तुम, कोई शक नहीं..!
(Yes you are alive, of this there is no doubt.)
पीयूषच्या प्रत्येक काव्यांत त्याच्या मनांतील आश्रितपणाचा तो एक न्यूनगंड, त्याने भोगलेल्या, सहन केलेल्या घटनांची जाणीव होते त्यामुळे सहजपणे त्याच्या काव्यांतील ती एक प्रकारची दुःखाची किनार आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहत नाही-
हर इन्सान बिकता हैं इस दुनियाँ में..
पर कितना सस्ता या महँगा..?
ये उसकी मज़बूरियत तय करती हैं..!
असा पीयूष शालेय अभ्यासक्रमांत फारशी गती नसलेला विद्यार्थी होता कारण शाळेत किंवा हायस्कूलमध्ये असताना सुद्धा फिजिक्स अन् केमेस्ट्री पेक्षा पीयूषचा ओढा हा गायन अभिनय, चित्रकला यांकडे अधिक होता. हायस्कूलला असतानाच तो  ग्वालियरच्याच कलामंदिर आणि रंगश्री लिट्ल बॅलेट ट्रूप्स यांच्यासोबत नाटकांत काम करु लागला. पुढे पीयूषचा जवळचा मित्र असणारी आणि नंतरच्या काळात पीयूषसाठी खरोखर Godfather ठरलेली व्यक्ती रवी उपाध्याय ही होय कारण त्यानेच पीयूषला NSD चा रस्ता दाखवला. NSD च्या ENTRANCE साठीचा फाॅर्म भरायला लावला. पीयूष आजही अत्यंत स्वच्छ मनाने ही गोष्ट कबूल करतो की, रंगकर्मी, अभिनेता, गायक, संगीतकार, लेखक व्हावं असं माझं अगदी बालवयापासून कधीही ठरलेलंच नव्हतं उलट पुढे काय करिअर निवडावं याबाबतीत मी प्रचंड संभ्रमावस्थेत असायचो पण त्यावेळी तो रवी उपाध्यायंच होता की ज्याने मला सांगितलं की आत्ता तू फक्त NSD चा फाॅर्म भर आणि पुढे काय करायचं ते आपण नंतर ठरवू..! (आज पीयूष ज्या काही उंचीवर आहे त्याला एका अर्थी रवी चं कारणीभूत आहे कारण रवीमुळे तो NSD मध्ये गेला आणि नंतरच खरं तर त्याचा संभ्रम दूर होऊन त्याला त्याचा योग्य करिअर पाथ गवसला.) आणि मग NSD ची ENTRANCE पास करुन तो मुलाखतीला गेला जी त्याच्या आयुष्यातील पहिली मुलाखत होती जी की तो अत्यंत चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाला आणि ते साल होते 1983. NSD सारख्या ठिकाणी शिकायला मिळतंय यापेक्षा ग्वालियरमधून बाहेर पडून घरातल्या घुसमटीतून आपण मुक्त होणार याच गोष्टीने पीयूषला जास्त समाधान वाटलं आणि यामुळेच 1983 ला तो National School Of Drama, New Delhi येथे आला आणि अभिनय क्षेत्रात पदवीचा अभ्यास त्याने तिथे सुरु केला.

ThePlaybackSinger piyush

1983 ते 1986 हाच तो काळ होता की, जेव्हा अत्यंत हुशार, आणि आपल्या कामांत तरबेज असलेल्या जर्मन नाटककार फ्रिट्ज बेनेविट्ज (1926-1995),अनुराधा कपूर अशा दिग्गज रत्नपारख्यांच्या हाती हे पीयूष मिश्रा नावाचं रत्न पडलं आणि मग याच दरम्यान या पीयूष नामक रत्नाला या रत्नपारख्यांनी पैलू पाडायला सुरुवात केली. NSD मध्ये गेल्यावर पीयूष ने विद्यार्थ्यांच्या एका नाटिकेसाठी मश्री की हूर नावाची एक रचना संगीतबद्ध केली आणि 2nd year ला असताना जर्मन नाटककार फ्रिट्ज बेनेविट्ज (1926-1995) यांच्या दिग्दर्शनाखाली विल्यम शेक्सपिअर च्या गाजलेल्या हॅम्लेट या नाटकांत पीयूषला अभिनयाची संधी दिली आणि पीयूषच्या त्या कामाची प्रचंड प्रशंसा झाली आणि NSD मध्ये एखाद्या कलाकाराची प्रशंसा झाली की ती बातमी अगदी सगळीकडे एखाद्या वणव्याप्रमाणे पसरते अगदी मुंबई बाॅलीवूडपर्यंत की An Actor Is Born आणि झालंही अगदी तसंच NSDच्या इतिहासात अगदी गिन्याचुन्या प्रशंसा झालेल्या कलाकारांच्या मांदियाळीत पीयूषची वर्णी लागली. त्या एका भूमिकेने त्याला नांव, प्रसिद्धी, प्रकाशझोत असं सर्वकाही दिलं.

क्रमशः

-ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी (युवा कीर्तनकार,बीड/महाराष्ट्र)

2 Comments

Click here to post a comment