रूढी प्रथांची दशक्रिया कधी ?

dashkriya

जेष्ठ लेखक बाबा भांड यांच्या कादंबरीवर आधारित दशक्रिया हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला अनेक पारितोषिके पण मिळाली आहेत. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. अर्थात पदमावती न्यूड आणि सैराट यांच्याप्रमाणे ह्या चित्रपटावर विशिष्ट वर्गाकडून टीका सुरु झाली. दशक्रिया या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये दाखवल्या प्रमाणे हा चित्रपट ब्राम्हण समाजावर टीका करणारा असल्याचा सांगत पुण्यातील ब्राम्हण महासंघाने यावर बंदी घालण्याची मागणी केली. ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी एका वाहिनीच्या चर्चेत बोलताना सांगितलं कि हा चित्रपट म्हणजे ब्राम्हण समाजाला बदनाम करणारा आहे. खरंतर साहित्य, कला, संस्कृती याला कोणत्याही जातीच बंधन नसत असं म्हटलं जात. मात्र या चित्रपटाच्या ट्रेलर मधील हे विधी करण थोतांड असून ह्या ब्राम्हणांनी आपल्या पोटापाण्याची सोय केलीये  अश्या प्रकारचा संवाद यात दाखवण्यात आला आहे. या संवादावर लक्ष केंद्रित करत ब्राम्हण महासंघाने यावर आक्षेप नोंदवला आहे.

या सगळया वादाच्या मुळाशी जाऊन विचार करायला लावणारा हा सगळा प्रकार आहे. हिंदू धर्मात विविध चाली रूढी परंपरा याना अनन्यसाधारण महत्व दिल जात. काही ठिकाणी तर मला वाटतं जरा वाजवी पेक्षा जास्त महत्व दिल जात… मनुष्य जन्माला आला म्हणजे त्याचा मृत्यू अटळ आहे. मात्र मृत्यूनंतर त्याचा पुढील प्रवास सुखकर व्हावा किंवा त्याच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी हे विधी केले जातात.. अश्या प्रकारची भावना प्रत्येकाच्या मनात रुजली आहे.. अर्थात याला दुसरे कारण म्हणजे गेल्या अनेक शतकांपासून या सगळ्या गोष्टींचा पगडा आपल्या डोक्यावर आहे. मनुष्याच्या मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या विधींना कोणताही शास्त्रीय आधार नाही. मग हि संकल्पना आली कुठून ? त्यामागे नेमकी भावना काय ? हा देखील प्रश्न उभा राहतो. या प्रश्नाच नेमक उत्तर तस बघायला गेल तर कोणीही देऊ शकणार नाही. हे सगळे विधी करण्यामागे श्रद्धा ही एक गोष्ट सोडली तर बाकी विशेष अस कारण मिळत नाही.

वास्तविक राज्यघटनेने प्रत्येकाला श्रद्धा उपासना अभिव्यक्ती स्वातंत्र बहाल केल आहे.त्यावर कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही आणि आपण ह्या गोष्टी दुसऱ्यावर लादू शकत नाही. महाराष्ट्राला आम्ही मोठ्या खुबीने पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो…पण या बाबत ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक कॉ . शरद पाटील असे म्हणायचे महाराष्ट्र हा पुरोगामी कधीच नव्हता आणि आजही नाही कारण जोपर्यंत या महाराष्ट्रातून जाती अंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्राला पुरोगामी कधीच म्हणता येणार नाही. आज दशक्रिया या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एका विशिष्ट जातीवरून सुरु झालेला हा वाद पाहता हे पुन्हा एकदा सिध्द झालं आहे…. विशेष म्हणजे या महाराष्ट्रात अनेक सुधारणावादी चळवळींची सुरुवात ब्राम्हणांनी केल्याचा इतिहास सांगितला जातो….. महात्मा फुलेंना वाडा देणारे भिडे असोत किंवा मनुस्मृती जाळणारे सहस्रबुद्धे असो अशी एक ना अनेक नावे घेता येतील…. मात्र या सुधारणावादी विचारसरणीच्या ब्राह्मणांच्यामागे किती ब्राम्हण समाज उभा राहिला ?हे पाहणं देखील महत्वाचं आहे. आपल्या समाजातुन एखादा समाजसुुधारक तयार व्हावा आणि त्यानेे समाजाची निर्माण झालेली प्रतिमा बदलावी असा विचार आजचा ब्राह्मण समाज का करीत नाही ?… वास्तविक पाहता या ब्राह्मणांना नंतर आपल्याच समाजातील लोकांनी वाईट वागणूक दिली .मागे म्हटल्या प्रमाणे सुधारणावादी व्यक्तींमध्ये खूप ब्राम्हण होते मात्र आज ब्राम्हण समाज त्याच सुधारणावादी विचारसरणीचा अवलंब का करीत नाही ? दशक्रियाविधी ,नारायण नागबली या सारख्या कोणताही शास्त्राधार नसलेल्या गोष्टींना आजचा ब्राम्हण समाज विरोध का करीत नाही ?हा देखील प्रश्न आहे. आज पैठण त्र्यंबकेश्वर किंवा छोटी मोठी तीर्थक्षेत्र या ठिकाणी या विधींच्या नावाखाली लाखो रुपयांची उलाढाल रोज होत असते …..मात्र ह्या पैशाचा उपयोग तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी, तेथील स्वच्छतेसाठी करावा या साठी कुणीही पुढाकार घेताना दिसत नाही… चित्रपटाला विरोध करून हा प्रश्न सुुटणार नाहीये. ब्राम्हण समाजाने आपले योगदान काय आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे …. दशक्रिया या चित्रपटातून आपण काय शिकलो ? हे पाहणं अत्यंत महत्वाच आहे ….

२१ व्या शतकात संपूर्ण जग आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना रोज नवनवीन शोध लागतायेत विज्ञान तंत्रज्ञान वाढत चालले आहे ….मात्र तरीही आपण या प्रथा परंपरांना कवटाळून बसलो आहोत हे सगळं बघताना मनात एक प्रश्न निर्माण होतो कि रूढी प्रथा परंपरांची दशक्रिया कधी होणार?

– धनंजय दीक्षित